नाशिक :
॥ ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी ॥
॥ दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ॥
भद्रकालीदेवी मंदिर अत्यंत प्राचीन असून, सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे चिमाजी पटवर्धन यांनी १७९० मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी मंदिराला भेट दिली आहे. भद्रकालीदेवी मंदिर संपूर्ण हिंदू समाजाचे शक्ती आणि ऊर्जेचे केंद्र आहे. (Navratrotsav 2022 Day 1 Sri Bhadrakali Devi Temple Nashik Latest Marathi News)
पौराणिक महत्त्व
पार्वतीच्या शरीराचे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले, त्या त्या ठिकाणी एक शक्तिपीठ निर्माण झाले. या शक्तिपीठांच्या सुरक्षेसाठी महादेवांनी भैरवाची स्थापना केली. या ५१ शक्तिपीठांपैकी हनुवटीच्या म्हणजेच चिबुक स्थानाचा भाग हा जनस्थान म्हणेजच भद्रकालीदेवी होय.
मूर्ती, उत्सव आणि धार्मिक सेवा
भद्रकालीदेवीच्या गाभाऱ्यात नऊ ते दहा इंच उंचीच्या नऊ प्राचीन मूर्ती आहेत. या मूर्ती पंचधातूंच्या असून, त्या नवदुर्गा आहेत. या मूर्तींबरोबरच एक दशभुजांचा गणपतीही आहे. या सगळ्या मूर्ती अतिशय प्राचीन असून, आजही त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. वासंतिक, शारदीय असे दोन नवरात्रोत्सव भद्रकालीदेवी मंदिरात होतात. अत्यंत पारंपरिक पद्धतीने सर्व वार्षिक उत्सव येथे होतात.
पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्ती मार्गाने देवीची सेवा होते. यात प्रातः महाअभिषेक पूजन, सप्तशतीपाठ, महानैवेद्य, देवी भागवत पुराण, शुक्ल यजुर्वेद संहिता पारायण, आध्यात्मिक व संगीत सेवा, भजन, कीर्तन सेवा, सामूहिक स्त्रोत्रपठण, संस्कार वर्ग अशा पारंपरिक पद्धतीने उत्सव होतात. मंदिरात उत्सवांमध्ये रोज कुमारिका पूजन, ब्राह्मण भोजन, कुंकुमार्चन आदी विशेष पूजनही होते.
वार्षिक उपक्रम, समाजोपयोगी सेवाकार्य
भद्रकालीदेवी मंदिर धार्मिक अधिष्ठान आहे. आपल्या भागातील गरजू विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, यासाठी अत्यंत अल्पदरात बालशिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्थेच्या मदतीने बालविद्यालय चालविण्यात येते. मंदिराच्या इतर आयामापैकी नाशिक प्राच्य विद्यापीठामार्फत संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर वर्षी गुणगौरव आणि शिष्यवृत्ती देण्यात येते.
वर्षभर मंदिरात बालसंस्कार केंद्र चालविले जाते, असे अनेक उपक्रम मंदिरातर्फे होतात. कोविडसारख्या महामारीत भद्रकाली देवस्थानतर्फे संपूर्ण नाशिक शहरातील तीन हजारांहून अधिक पुरोहित, नाभिक, समाजसेवेचे कार्य करणाऱ्या महिला, फुलेविक्रेते अशा अनेक लोकांना दोन महिने पुरेल इतके धान्य वाटप करण्यात आले. कोविड केअर सेंटरसाठी व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून आवश्यक गोष्टींची मदत मंदिर देवस्थानतर्फे करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.