पाथर्डी : पाथर्डी परिसरात पोटाला चिमटा घेऊन, कर्ज काढून मोठ्या अपेक्षेने घराचे स्वप्न पूर्ण झाले. या आनंदात राहण्यास आलेल्या शेकडो कुटुंबीयांना तीन ते पाच वर्षानंतरदेखील रस्ते, पथदीप, पाणी आणि ड्रेनेज या मूलभूत सुविधा न मिळाल्याने रहिवाशांनी मनस्ताप व्यक्त केला आहे.
बिल्डरला परवानगी देताना त्यांच्याकडून सर्व नागरी सुविधांसाठी असलेले कर आकारले जाते. मग पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर सुविधा देण्यास महापालिका टाळाटाळ का करते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. (New settlers in Pathardi expect civic amenities Citizens deprived despite paying taxes Nashik News)
‘हॉटेल एक्स्प्रेस इन’च्या बाजूने पाथर्डी शिवारात प्रवेश केला की पोद्दार शाळा आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रो हाऊस आणि इमारतींमध्ये नागरिक राहतात. रेडिसन ब्लू हॉटेलपर्यंत साधारण एकदम चकाचक रस्ता आहे.
या ठिकाणी नेहमीच आता व्हीआयपी लोकांचा वावर असल्याने वारंवार एवढा पॅच दुरुस्त केला जातो, असे नागरिक सांगतात. पुढे मात्र अक्षरश ठेचकाळतच ये- जा करावी लागते. पावसाळ्यात नागरिकांचे अतोनात हाल होतात.
शहराच्या विविध भागात नोकरीसाठी तर विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जावे लागते. मात्र रस्तेच नसल्याने हाल नागरिकांना सोसावे लागतात.
या भागातील तीन मोठे डीपी रस्ते आणि बारा मीटर चे सर्व रस्ते डांबरीकरण करण्यासाठी मंजूर झाले असून, त्याच्या निविदा आता निघतील अशी चर्चा होती.
मात्र त्यालाही आता कित्येक महिने उलटून गेले आहेत. अशीच स्थिती ड्रेनेजबाबत आहे. नाही म्हणायला पाथर्डी गौळाणे रस्ता, सर्व्हे क्रमांक २०२, २०३, २४१ आदी ठिकाणी ड्रेनेज टाकले आहेत. पाथर्डी-गौळाणे हा मुख्य रस्ता सोडला तर कुठेही पाणी पोचलेले नाही.
पाथर्डी मळे भागात पाणी पोचले आहे. मात्र नववसाहत झालेल्या कोणत्याही इमारतीमध्ये महापालिकेच्या पाण्याचा थेंबदेखील पोचलेला नाही. एसएसके वर्ल्ड क्लब परिसरात बोटावर मोजण्याइतके अपवाद आहेत मात्र त्यांनीदेखील थेट मुख्य वाहिनीतून जोडणी घेतल्याचे समजते.
यामुळे बोअरवेलचे पाणी प्यावे लागते. या क्षारयुक्त पाण्यामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या त्या वेगळ्या. काही महिन्यांपूर्वी विजयलक्ष्मी रो हाऊस परिसरातील नागरिकांनी पाण्यासाठी मोठे आंदोलन केले.
त्या वेळी गाजावाजा करून नवीन पाण्याच्या लाइनच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, ते काम पोद्दार शाळेपर्यंत आणून ठेवले आणि पुढे त्याचेही काही झाले नाही. यंदा पाण्याची परिस्थिती संपूर्ण शहराची कठीण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
येथे आताच बोअरवेलचे पाणी कमी होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे येथे तर अत्यंत बिकट स्थिती होणार असून वेळ आली तर पुढच्या महिन्यापासूनच या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येईल असे नागरिक सांगतात. प्रशासन सोबतच येथील माजी नगरसेवकांबाबत नागरिक आता तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
"महापालिका अधिकारी, माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सर्वांकडे कैफियत मांडली. तात्पुरती व्यवस्था करून समजूत काढण्यात येते. त्यामुळे आता कुणाकडूनच अपेक्षा राहिलेली नाही."- रितेश शेलार, स्थानिक
"लाखाचे कर्ज काढून मोठ्या अपेक्षांनी घर घेतले. मात्र भाड्याच्या घरातच बरे होते असे आता वाटते. तेथे किमान पाणी आणि रस्ते तरी नशिबात होते. येथे पैसे खर्च करून मनस्ताप विकत घेतला आहे असे वाटते."- नितीन वाजे
"महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधितांनी या भागात एकदा फेरफटका मारावा. म्हणजे आम्ही कोणत्या परिस्थितीत राहतो, याची त्यांना कल्पना येईल. उन्हाळा तोंडावर असताना पाण्यासाठी यंदा काय वणवण करावी लागेल हे मनात आले तरी भीती वाटते. माणुसकीच्या दृष्टीने तरी आता येथे रस्ते, पाणी आणि ड्रेनेज कामे मार्गी लागली पाहिजे."- नीलेश खैरनार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.