"गेल्या काही वर्षांत नाशिकची औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. त्यात निमाचा (नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) मोठा हातभार आहे. जिल्ह्यातील उद्योजकांचे नेतृत्व ही संघटना करते. गेल्या ५२ वर्षांत नाशिकच्या उद्योजकांना दिशा दाखविण्याचे काम निमाने केले आहे.
आज जिल्ह्यात निमाचे साडेतीन हजारांहून अधिक सभासद आहेत. जिल्ह्यात साडेसतरा हजारांहून अधिक उद्योग आहेत. जिल्ह्याच्या विकासात या सर्वांचे योगदान मोलाचे राहिले आहे. दर तीन वर्षांनी भरणारे निमा इंडेक्स हे तर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. निमाने नुकतेच बँक समीट घेतले.
त्यात सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँका, तसेच काही वित्तीय संस्थांनी सहभाग नोंदविला. यात एक हजाराहून अधिक आणि ३०० कोटींहून अधिक कर्जाचे प्रत्यक्ष वितरण होऊन उद्योजकांच्या कर्ज प्रकरणांचा मार्ग मोकळा झाला. आता लवकरच निमातर्फे निमा पॉवर २३ हे भव्य औद्योगिक प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे."
- धनंजय बेळे, अध्यक्ष, नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
(NIIMA Dhananjay Bele artcle Nashik best option for industrial expansion in state Nashik News)
मुंबई आणि पुण्यात आता औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराला वाव नाही. त्यामुळे आगामी काही वर्षांत नाशिक हे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे मोठे औद्योगिक डेस्टिनेशन ठरावे, यासाठी निमाने आग्रही भूमिका घेतली आहे.
औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, अनुकूल हवामान, पाण्याचा मुबलक साठा, समृद्धी महामार्ग, होऊ घातलेला सुरत-चेन्नई औद्योगिक कॉरिडॉर आणि मुंबई ते नागपूरदरम्यान प्रस्तावित असलेली बुलेट ट्रेन, होऊ घातलेला प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वे मार्ग,
मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, तसेच ओझर विमानतळावरून दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, तिरुपतीसह विविध ठिकाणांसाठी सुरू झालेली विमानसेवा, तसेच इंडिगो आणि स्पाईसजेट कंपन्यांनी विमानसेवेचे व्यापक जाळे विणण्याचे दिलेले अभिवचन आणि त्यादृष्टीने त्यांच्यातर्फे टाकण्यात आलेली पावले यामुळे येथे गुंतवणुकीसाठी मोठ्या कंपन्यांची चढाओढ सुरू आहे.
नाशिकमध्ये वर्षभरापूर्वी झालेल्या औद्योगिक प्रदर्शनात त्याचा प्रत्यय आला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या औद्योगिक वसाहतींना चालना देण्यासाठी शासनस्तरावरून निमाच्या पुढाकाराने पावले उचलली जात आहेत, ही बाबही स्तुत्यच म्हणावी लागेल.
खरंतर नाशिक हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. बिटिशकाळात येथे इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोटप्रेस आणि देवळाली तोफखाना केंद्र, तसेच भव्य असे रेल्वेस्थानक उभे राहिले. दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा यामुळे नाशिकचे महत्त्व फक्त देशाच्याच नव्हे, तर जगाच्या नकाशावर अधोरेखित झाले. ही मंत्रभूमी यामुळे तंत्रभूमी म्हणूनही ओळखली जाऊ लागली. लाखो हातांना काम मिळाले.
नाशिक हे उद्योगवाढीसाठी अनुकूल ठिकाण आहे, याची प्रचीती आल्याने १९६२ मध्ये येथे नाईसची स्थापना झाली. भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना नाशिककरांनी १९६३ मध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून दिल्यानंतर त्याची परतफेड म्हणून त्यांनी १९६४ मध्ये ओझर (नाशिक)ला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची भेट दिली.
स्थानिकांसाठी नोकऱ्यांचे दालन खुले झाले. या दोन घटनांमुळेच नाशिक जिल्ह्यात उद्योगधंदे निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. एचएएलमुळे नाशिकचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात गेले.
पद्मश्री बाबूभाई राठी आणि पत्रकारमहर्षी दादासाहेब पोतनीस, मामासाहेब अनगळ, आप्पासाहेब कुलकर्णी, दादासाहेब अंधृटकर, मामा शुक्ल यांच्या सारख्याच्या दूरदृष्टीमुळे १९६८ मध्ये सातपूर आणि त्यानंतर १९७० च्या दशकात अंबड येथे औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या. नाशिकची ओळख त्यामुळे मंत्रभूमी ते तंत्रभूमी अशी झाली.
थोड्याच अवधीत येथे मायको (आत्ताची बॉश), एबीबी, महिंद्रा, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, ग्लॅक्सो, एक्सलो, गरवारे, लार्सन ॲण्ड टुब्रो, ज्योती स्ट्रक्चर्स, सिमेंस आदी नामांकित कंपन्यांनी नाशिकमध्ये आपले प्रकल्प उभारले आणि
नाशिकची ओळख खऱ्या अर्थाने उद्यमनगरी अशी झाली. अनेक नामांकित कंपन्यांनी नाशिकमध्ये विस्ताराच्या योजना आखल्या आहेत. रिलायन्सचा प्रकल्प दिंडोरी तालुक्यात आकारास येत आहे.
प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे क्लस्टर, तसेच टेस्टिंग लॅब उभारण्यात येत आहे. त्यामुळे आणखी मोठ्याप्रमाणात रोजगार व स्वयंरोजगारनिर्मिती होऊन लाखो हातांना येथे काम उपलब्ध झाले आणि भविष्यात त्याची व्याप्ती आणखी वाढणारच आहे.
औद्योगीकरण अन् कामगार वसाहती
वाढत्या औद्योगीकरणामुळे अंबड, सिडको, सातपूर आणि जिल्ह्याच्या बहुसंख्य भागातही मोठ्याप्रमाणात कामगार वसाहती उभ्या राहिल्या. राज्य, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगारासाठी लोक येथे येऊ लागले आणि पर्यायाने अनेक पूरक उद्योगही सुरू झालेत.
हॉटेलसह पर्यटन क्षेत्राला बरकत आली. जमिनीचे भावही वाढू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचीही आर्थिक उन्नती झाली. टोलेजंग इमारती येथे उभ्या राहिल्यात. नाशिकची लोकसंख्याही झपाट्याने वाढत गेली. अंबड आणि सातपूर हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्वाधिक महसूल देणारे अविभाज्य अंग ठरले.
त्यानंतर जिल्ह्यातील सिन्नर, गोंदे (इगतपुरी), कळवण, शिंदे, वाडीवर्हे, मुंडेगाव, अजंग, रावळगाव, पालखेड, अक्राळे, तळेगाव, खतवड, पिंपळगाव, येवला, माळेगाव, मुसळगाव, पाडळी आदी ठिकाणीही औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. निफाड तालुक्यातील विंचूर येथे वायनरी पार्क साकारले आहे.
द्राक्ष उत्पादकांच्या हातात यामुळे दोन पैसे अधिक खुळखुळू लागलेत. दिंडोरी तालुक्यात लवकरच कृषी हब साकारणार आहे. येवला येथे पैठणी उद्योगाला चालना मिळाली आहे. त्यामुळेच नाशिक जिल्हा हा उद्योग क्षेत्रात किती अग्रेसर झाला आहे, याची प्रचीती येते. नाशिकमध्ये आज प्रत्येक तालुक्यात औद्योगिक वसाहती आहेत.
त्यामुळे आज जिल्ह्यात किमान दहा लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहत परिसरात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा पुरविण्याचे अभिवचन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे.
दळणवळणाची सुविधा अन् विविध महाविद्यालय
जिल्ह्यात आज जवळपास ३०/४० अभियांत्रिकी, तर २०/२५ हून अधिक व्यवस्थापन महाविद्यालये आहेत. आयटीआय विद्यालयांची संख्याही मोठी असल्याने कंपन्यांसाठी लागणारा कुशल आणि अकुशल कर्मचारीवर्ग तातडीने उपलब्ध होतो.
एअर कनेक्टिव्हिटी असल्याने, तसेच दळणवळणाची मोठ्याप्रमाणात सोय उपलब्ध झाल्याने नाशिकहून जलदगतीने माल इतरत्र नेण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे आणि नाशिक ते गुजरात हे राष्ट्रीय महामार्ग आता चार ते आठपदरी झाल्याने वाहतूकही जलद आणि विनाअपघात होण्यास मदत झाली आहे.
त्यामुळे वाहतूकदारही खूश आहेत. नाशिकमध्ये केंद्राचा टायरबेस्ड निओ मेट्रो प्रकल्प लवकरच साकारणार आहे. त्यामुळे उद्योगवाढीसाठी हा प्रकल्पही जमेची बाजू ठरणार आहे. जिल्ह्यात आज साधारण दहा हजार उद्योग पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, सुमारे दहा लाख लोकांना यामुळे रोजगार उपलब्ध होतो, ही बाब निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.
हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
नाशिकमध्ये निमा आणि आयमाच्या पुढाकाराने हिरानंदानी ग्रुप, जिंदाल सॉ, ज्योस्टिक, ब्राईट सिनो प्रा. लि., ॲडव्हान्स एंजाइम आदी कंपन्यांनी नाशिकमध्ये दोन हजारांहून अधिक कोटींची गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याला पूरक म्हणून अप्रत्यक्षरीत्या ही गुंतवणूक दहा हजार कोटींच्या घरात जाईल.
औद्योगिक क्षेत्रासाठी सात हजार हेक्टर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. चुंचाळे येथील एक हजार ३०० एकर जागा औद्योगिक क्षेत्रासाठी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. ती जागा मिळाल्यास नाशिकचा चेहरामोहराच बदलून जाईल आणि जिल्यातील औद्योगिकीकरणाला अधिक गती मिळेल, यात शंका नाही.
नाशिक ते घोटीदरम्यान नवीन औद्योगिक वसाहतीची जाग शोधण्याचे काम सुरू असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सूतोवाच केले आहे. ही जागानिश्चिती लवकर झाल्यास तेथे आणखी उद्योग येतील आणि रोजगारनिर्मितीबरोबरच मोठ्याप्रमाणात आयात-निर्यातीलाही चालना मिळेल आणि राज्याबरोबरच देशाचाही आर्थिक विकास होईल.
औद्योगिकवाढीचे डेस्टिनेशन
नाशिकला महापालिकेच्या माध्यमातून शेकडो एकर जागेत आयटी हब, तसेच लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. तसे झाल्यास मुंबई, बेंगळुरूप्रमाणे नाशिकमध्येही मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील आणि नाशिकचे नाव सातासमुद्रापार जाईल, यात शंका नाही.
सर्व अनुकूल गोष्टी लक्षात घेता भविष्यात नाशिकला औद्योगिकवृद्धीसाठी मोठा वाव आहे. मालक-कामगार यांचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत. कामगार नेते समंजस आहेत. आता गरज आहे ती लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधित क्षेत्रातील लोकांनी जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाबाबत सामंजस्याची भूमिका घेऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यास पुढाकार घेण्याची.
तसे झाले तर नाशिक हे देशातील सर्वांत मोठे औद्योगिक वाढीचे डेस्टिनेशन म्हणून नावारूपास येईल, हे निश्चित.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.