निमगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी आरोग्य केंद्रच सलाईनवर आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र या दर्जेदार नव्या इमारतीचे लोकार्पण केले.
इमारत असूनही पुरेसे कर्मचारी नसल्याने दुपारनंतर आरोग्य केंद्र बंद असते. दुसऱ्या दिवशी सकाळी दहानंतरच रुग्णांना सेवा मिळते. मुख्यालयी फक्त वर्ग दोनचे अधिकारी राहतात. वैद्यकीय अधिकारी वर्ग एकचे पद रिक्त असल्याने खालच्या अधिकाऱ्यांनाच आरोग्य केंद्र सांभाळावे लागते.
विशेष म्हणजे ते सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरलेले आहेत. ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन कायमस्वरूपी वर्ग एकच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी गाव व परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. (Nimgaon wants health workers Primary health center on saline for lack of staff Nashik News)
निमगाव, निंबायती, जळगाव हे उपकेंद्र आहेत. कर्मचारी विना मुख्य केंद्र आजारी असल्याने उपकेंद्रांची अवस्थाही बिकट आहे. रोज ८० ते १०० रुग्ण उपचारासाठी येतात. निमगावसह पंधरा ते वीस खेड्यांचे रुग्ण येतात.
निमगाव, निंबायती, जाटपाडे, चौकटपाडे, मेहुणे, घोडेगाव, ज्वार्डी आदी भागातील रुग्ण येत असतात. मुख्यालयात राहण्यासाठी सुसज्ज इमारती बांधल्या आहेत, मात्र कर्मचारीच नसल्याने त्या ओस पडल्या आहेत.
लोकार्पण सोहळ्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, अनुभवी कर्मचारी नियुक्त करावेत.
दुपारी एकनंतर कोणीही जबाबदार व्यक्ती थांबत नाही. कंत्राटी शिपायाच्या भरवशावर संपूर्ण केंद्र अवलंबून असते. बायोमेट्रिक मशीन, कॅमेरे यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.
"पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी आरोग्य केंद्रात पूर्णवेळ रुग्णसेवा मिळत नाही. अनेक जण खासगी डॉक्टरकडे जातात. आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसतो. दुसऱ्या केंद्राचे कर्मचारी येऊन औषध गोळ्या वाटप करतात. साथीचे आजारांची कुठलीही जनजागृती होत नाही. कंत्राटी कर्मचारींचे वेतन दहा महिन्यांपासून थकीत असल्याने तेही नाममात्र काम करतात."
- डॉ. मनोज हिरे, ग्रामपंचायत सदस्य, निमगाव
"करार पद्धतीने वर्ग दोनचे आम्ही दोन अधिकारी आहोत. तीन-तीन दिवस जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रावर कोणाचाही वचक नसल्यामुळे आहे ते कर्मचारी बेशिस्त राहतात. लसीकरण, नेत्र तपासणी व सर्व रोगनिदान शिबिर घेता येत नाहीत. मुख्यालय वसाहत पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी ओस पडली आहे."
- डॉ. संदीप पाचपुते, वैद्यकीय अधिकारी वर्ग २, निमगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.