सिन्नर (जि. नाशिक) : नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे टोलनाका येत्या काही दिवसात बंद करण्याबाबत सकारात्मक हालाचाली सुरू असून त्याबाबतचे आश्वासन केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे भाजप उद्योग आघाडीने म्हटले आहे. याचबरोबर शिर्डी रोडवरील वावी वेस ते हॉटेल गुलमोहरपर्यंतचा साडेतीन किलोमीटरचा रस्ता दुभाजकासह चौपदरीकरण करण्यासाठी व्लॅक स्पॉट काढण्यात येतील. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे ब्लॅक स्पॉट काढून ते त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिल्याची माहितीही भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे यांनी दिली आहे.
गडकरी नाशिक येथे आले असता त्यांना शिंदे टोलनाका व शिर्डी रस्त्यावरील वावी वेस ते हॉटेल गुलमोहोर हा रस्ता चौपदरीकरणाबाबत भेट घेत निवेदन दिले. त्यावर चर्चेअंती मंत्री गडकरी टोलनाका बंद करण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यासाठीच्या आवश्यक त्या तरतुदी करून हा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल असे आश्वासन दिल्याचे जपे यांनी म्हटले आहे.
वायबॅक करून बंद करावा
जपे यांनी या भेटीबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार ५ डिसेंबर २००८च्या राजपत्रात म्हटल्यानुसार टोल प्लाझा १० किलोमीटर अंतरावरच्या पुढे असणे आवश्यक असल्याने माळेगाव, मुसळगांव तसेच सिन्नर शहरातील स्थानिक वाहनधारकांना टोलमध्ये सूट असताना गेली ३ वर्षे ९ महिने टोलचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा टोलनाका सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने वाय बॅक करुन बंद करावा अशी मागणी करण्यात आली.
नाका चुकीचा अन वसुली बेकायदा
शिंदे टोल नाका भारत सरकारच्या नियमानुसार नाशिक शहराच्या हद्दीपासून दहा किलोमीटर असणे आवश्यक होते. परंतु तो फक्त ५ किलोमीटरवर असल्याने तो संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहत, माळेगाव शासकीय औद्योगिक वसाहत, सिन्नर शहर येथील सर्व वाहनधारक, स्थानिक वाहनधारकांकडून गेली तीन वर्ष बेकायदेशीररित्या टोलवसुली केली जात आहे. तो टोल भरत सरकारने वाय बॅक करुन बंद करावा. सिन्नर शिर्डी रोडवर वावी वेस ते हॉटेल गुलमोहोर हा साडेतीन किलोमीटरचा रस्ता चौपदरीकरण करावा अशी मागणी श्री.जपे यांनी केली आहे. त्यांच्या समवेत भाजप उद्योग आघाडीचे राज्याध्यक्ष प्रदीप पेशकार, मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे माजी संचालक नामकर्ण आवारे उपस्थित होते.
शिर्डी रस्त्यावर अपघातांची मालिका
सिन्नर शिर्डी रस्त्यावरील वावी वेस ते गुलमोहर हा परिसर अपघाताचा रस्ता म्हणून कुप्रसिध्द बनला आहे. या रस्त्यावर आतापर्यंत अनेकजण बळी गेले आहेत. शिर्डीला जाणारे असंख्य भाविकही अपघातग्रस्त झाले आहेत. सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१६ ते २०२० या कालावधीत ७४ अपघात झाले असून त्यात ३४ जणांचा मृत्यू तर ७९ जण जायबंदी झाले. सिन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१६ ते २०२० या काळात ३९ अपघात झाले त्यात २७ जणांचा मृत्यू तर २१ जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे बऱ्याच कालावधीपासून हा रस्ता दुभाजकासह चौपदरीकरण करण्याची मागणी होती. श्री. गडकरी यांनी टोल बंद करण्याच्या व शिर्डी रस्ता चौपदरीकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्री. जपे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.