नाशिक : कामे दर्जेदार झाले पाहिजे, ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा व या अपेक्षेला प्रशासनाकडून शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे. हे खरे असले तरी नागरिकांची भूमिका फक्त सल्ला देण्यापूर्ती नसावी. ज्या वेळी महापालिकेकडून एखादे काम सुरू असते, त्या वेळी त्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारीसुद्धा नागरिकांची आहे. याचाच अर्थ नागरिक म्हणून प्रत्येक कामात नागरिकांचा सहभाग असला पाहिजे, अशी अपेक्षा महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केली. (NMC Commissioner Expectations from Nashik People in Sakal Samvad Nashik News)
महापालिकेचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी ‘सकाळ संवाद’ उपक्रमांतर्गत ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. या वेळी विविध प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी वरील अपेक्षा व्यक्त केली. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी आयुक्तांचे स्वागत केले. या वेळी आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, हवामान, शहराची भौगोलिक स्थिती, निसर्ग, पायाभूत सुविधा व नागरिक याचा विचार केल्यास सर्वार्थाने नाशिक सुंदर आहे.
महापालिकेसंदर्भात कुठलीही मोहीम असेल तर नाशिककरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. उदाहरणे द्यायचे झाल्यास स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे देता येईल. उपक्रमांना प्रतिसाद मिळतो, ही अभिमानाची व शहर जिवंत असल्याची उदाहरणे आहेत. परंतु नाशिककरांनी महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांवर देखील देखरेख ठेवली पाहिजे. सध्या संपूर्ण शहरांमध्ये रस्त्यांचा प्रश्न गाजत आहे. नाशिक शहरांमधील रस्ते खरोखर चांगले आहे.
मात्र मागील दोन वर्षांत तयार करण्यात आलेले रस्ते यंदाच्या पावसाळ्यात उखडून जात आहे, ही बाब देखील तितकीच खरी आहे. काम सुरू असतानाच त्या कामांकडे जाणीवपूर्वक किंवा काळजीपूर्वक लक्ष दिल्यास चुकीच्या पद्धतीने काम करण्याची हिंमत ठेकेदार करणार नाही. कामे दर्जेदार झाली पाहिजे. त्या कामांवर महापालिकेच्या यंत्रणेबरोबरच नागरिकांनी देखील लक्ष ठेवले पाहिजे, हे देखील महत्त्वाचे आहे.
रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचा पर्याय सांगताना यापुढे महापालिकेमार्फत होणारे सर्व कामांची गुणवत्ता त्रयस्थ संस्थेमार्फत तपासली जाणार असल्याचे सांगितले. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रत्येक विभागाकडून त्रयस्थ संस्था नियुक्तीचा प्रस्ताव मागविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली. त्या अनुषंगाने त्यांनी समृद्धी महामार्गावर बुलेट ट्रेन चालविण्यासाठी ७० टक्के संधी असल्याची माहिती दिली. या माध्यमातून नाशिकच्या विकासाला चालना मिळेल, असा दावा त्यांनी केला. नाशिक महापालिकेत डिझास्टर मॅनेजमेंटचे काम योग्यरीतीने चालते, त्याचे उदाहरण आयुक्तांनी औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरचीजवळ घडलेल्या दुर्घटनेचा संदर्भ देत दिले. कंट्रोलरूमच्या माध्यमातून सर्वप्रथम यंत्रणा हलविण्याचे काम झाल्याचे त्यांनी सांगितले.
गोदावरी प्रदूषणमुक्त करू
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कामांचे नियोजन सुरू करण्यात आले असून, त्यासाठी सेवानिवृत्त अनुभवी अधिकाऱ्यांना सामावून घेतले जाणार आहे. आगामी सिंहस्थापर्यंत गोदावरी नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त होईल, याची खात्री देताना निरीने प्रदूषणमुक्तीसाठी योजलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गोदाकिनारी वनस्पती लागवड
स्वच्छ भारत अभियानात इंदूर शहर कायम पुढे राहिले आहे. या शहरातून वाहणारी नदी यापूर्वी प्रदूषित होते. मात्र पाण्यातील विषारी द्रव्य शोषून घेणारी वनस्पती नदीकिनारी लावण्यात आली त्या धर्तीवर गोदावरीच्या किनारी देखील अळू, बांबू किंवा अन्य वनस्पतीची लागवड करण्याचे नियोजन केले जाणार आहे. साबरमती व उज्जैन येथील नद्यांच्या विकासाचा आराखडा मार्गदर्शक म्हणून अमलात आणला जाईल. नमामि गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून देखील गोदावरी स्वच्छतेकडे लक्ष दिले जाईल.
नाशिक-त्र्यंबक कॉरिडॉर व्हावा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन केले. त्या धरतीवर नाशिक-त्र्यंबक कॉरिडॉर विकसित करणे शक्य असल्याचे मत आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी व्यक्त केले.
महापालिका आयुक्त म्हणतात
- नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम शक्य
- शहरातून जाणारे महामार्गांवर उड्डाणपूल हवेत
- विनंती करूनही कर वसूल होत नसेल तर त्यासाठी कठोर होणे गरजेचेच
- शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा प्रयत्न
- मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर झोपडपट्ट्यांसाठी एस. आर. ए. स्कीम
- नगररचना विभागात बांधकाम परवानगीचे टप्पे कमी करणार
- सिंहस्थाचे नियोजन करताना सेवानिवृत्त अनुभवी अधिकाऱ्यांची मदत घेणार
- जलसंपदा विभागासोबत पाणी करारासाठी शासनाकडे पाठपुरावा
- नागरिकांना महापालिके संदर्भातील तक्रारीसाठी सोयी उपलब्ध करून देणार
- २०४१ ची लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून पाणीपुरवठा व मलनिसारणाचा आराखडा
- मुंबईच्या धर्तीवर वाहनतळे निश्चित करणार
- रविवार कारंजा येथील ‘यशवंत मंडई’च्या जागेवर पार्किंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.