NMC News : दिल्ली महापालिका हद्दीमध्ये पावसाचे पाणी तळघरात शिरून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका हद्दीतील तळघरदेखील पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यापूर्वी करण्यात आलेले सर्वेक्षण कागदावरच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. अग्निशमन विभागाकडून नगर रचना विभागाकडे बोट दाखवले जात असून नगररचना विभागाने मात्र तळघरात सुरू असलेल्या बेकायदा व्यवसायाबाबत कानावर हात ठेवले आहे. (NMC ignorance about illegal basement business Survey on paper)
दिल्ली शहरामध्ये एका तळघरात पाणी साचले. त्या तळघरात अनधिकृतपणे शालेय क्लासेस सुरू असल्याची बाब समोर आली. यामुळे दिल्लीत त्यावरून राजकारण पेटले आहे. दीड वर्षांपूर्वी नाशिक महापालिका हद्दीत रविवार कारंजा येथील रे क्रॉस इमारतीच्या तळघरांमध्ये आग लागण्याची घटना घडली होती. या आगीमध्ये संगणकीय साहित्य जळून खाक झाले होते. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली व त्यानंतर इमारतीच्या तळघराचा पार्किंगसाठी उपयोग न होता व्यवसायासाठी होत असल्याची बाब स्पष्ट झाली होती.
त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन आयुक्तांनी सर्वेक्षण करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शहरात दरवर्षी हजारो इमारतींना परवानगी दिली जाते. इमारतीला परवानगी देताना पार्किंगसाठी जागा सोडणे आवश्यक असते, परंतु बाजारपेठांमधील इमारतींमध्ये निवासीऐवजी व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तेथील इमारतींच्या तळघरांमध्ये पार्किंगसाठी जागा राखीव असताना त्या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होतो. (latest marathi news)
रविवार कारंजा व अशोकस्तंभ भागात क्लासेससाठी व गोडाऊन म्हणून वापर केला जातो. व्यावसायासाठी वापर होत असल्याने आग लागण्याच्या घटना घडतात. त्याचबरोबर वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतुकीचीदेखील समस्या निर्माण होते. त्यामुळे शहरातील सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून ज्या कारणासाठी इमारतीला परवानगी देण्यात आली आहे. त्याच कारणासाठी वापर होत आहे की नाही हे तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पार्किंगच्या जागेत त्यांना अधिकृतपणे बांधकाम आढळल्यास कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश दिले होते.
घटनेनंतर परिस्थिती जैसे-थे
दिल्ली येथील घटनेनंतर महापालिका हद्दीमधील तळघरांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यापूर्वी गंजमाळ व रविवार कारंजा येथे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर करण्यात आलेले सर्वेक्षण, त्याचप्रमाणे सुरत व कोलकता येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सर्वेक्षण करून तळघरात व्यावसायिक कारणासाठी वापर होत असलेल्या मालमत्तांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
तसेच सूचना आतादेखील दिल्या जातील. मात्र सर्वेक्षण हे फक्त कागदावरच राहते. यापूर्वी करण्यात आलेले सर्वेक्षणदेखील कागदावरच राहिले असून घटनेचा विसर पडल्यानंतर परिस्थिती जैसे थे होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यासंदर्भात महापालिकेने काय कारवाई केली, या संदर्भात नगर रचना विभागाने मात्र कानावर हात ठेवले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.