Nashik News : मुंबई, ठाणे पाठोपाठ नाशिकमध्ये डेंगीचा उद्रेक झाला असून, सप्टेंबरमध्ये १०६६ रुग्ण आढळले. परतीच्या पावसाच्यादेखील आशा संपुष्टात आल्याने नदीपात्र संकुचित होत आहे.
पात्र संकुचित होत असताना गोदावरी व उपनद्यांच्या खाच- खळग्यांमध्ये पाणी साचून डेंगी वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांच्या अळी आढळत आहे. त्यामुळे या भागात औषध फवारणी आवश्यक झाली आहे.
परंतु औषध फवारणीचे काम दिलेल्या मक्तेदारांकडून त्या भागात कसे पोचायचे असा सवाल केला जात असून महापालिकेचा मलेरिया विभागाचेदेखील दुर्लक्ष होत आहे. (NMC News Aedes worms in cracks of Godavari tributaries Dengue scare Medicine smoke spray required nashik)
शहरात डेंगी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डेंगीचे बहुतांशी नियंत्रण नागरिकांच्या हाती असले तरी महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून धूर फवारणी व औषध फवारणी होणेदेखील तितकेच गरजेचे आहे.
मात्र कामकाज फक्त कागदावर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या वर्षी जानेवारीत १७, फेब्रुवारीत २८, मार्चमध्ये २८, एप्रिलमध्ये आठ, मे नऊ तर जूनमध्ये १३ डेंगी रुग्ण आढळून आले होते.
त्यानंतर डेंगी रुग्णांची संख्या सातत्याने वाढली. जुलैत १४४ रुग्ण होते. ऑगस्टमध्ये हाच आकडा ११७ पर्यंत पोचला. सप्टेंबरमध्ये शहरात १०६६ संशयित रुग्ण आढळले आहे. त्यापैकी २६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
गोदावरी, उपनद्या परिसरात धोका
नाशिक शहरातून गोदावरी व उपनद्यांचा प्रवास १९ किलोमीटरचा आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेवटच्या टप्प्यातील मुसळधारेमुळे नदी प्रवाह वाहता झाला. परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने नदीपात्रातील पाणी आकुंचन पावत आहे.
त्यामुळे नदीकाठ कोरडे होत असून, येथील खाच-खळग्यात स्वच्छ पाणी साठत असल्याने त्यात डेंगी अळी साचून गोदावरी व उपनद्यांच्या परिसरात डेंगीचा धोका निर्माण झाला आहे.
फवारणी कागदावरच
डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून नष्ट करण्यासाठी शहरात ६२ पथके आहेत. त्या पथकांचे पाऊल नद्यांच्या भागाकडे पोचत नाही. त्यामुळे धूर व औषध फवारणी कागदावरच दिसून येत आहे.
एनएमसी ई-कनेक्टकडे दुर्लक्ष
डेंगीची उत्पत्ती स्थळे शोधून काढण्यासाठी महापालिकेच्या एनएमसी ई-कनेक्ट अॅपवर मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. डास उत्पत्ती स्थळांची माहिती देवूनही धूर फवारणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
डेंगीची लक्षणे
- फणफणून ताप येणे.
- स्नायू व सांध्यामध्ये वेदना.
- डोळ्यांच्या मागील भागात वेदना.
- प्लेटलेस झपाट्याने कमी होणे.
- भूक नाहीशी होणे.
विभागनिहाय सप्टेंबरची डेंगीची स्थिती
विभाग रुग्ण
पूर्व ४०
पश्चिम १४
नाशिक रोड ५९
सिडको ४९
पंचवटी ५८
सातपूर ४१
-----------------------
एकूण २६१
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.