नाशिक : साडेबाराशे थकबाकीदारांकडून थकबाकी वसुली करण्यासाठी दारासमोर ढोल वाजविण्याची टोकाची भूमिका घेणाऱ्या महापालिकेच्या विविध कर वसुली विभागाला राजकीय पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने दहा दिवसातच मोहीम गुंडाळण्याची वेळ आली. आता फक्त २८ लाख रुपयांची वसुली झाली. (NMC Property Tax Recovery Due to political pressure municipal dhol bajao drive stopped nashik news)
राज्य शासनाकडून महापालिकेला जीएसटीच्या रूपाने अनुदान प्राप्त होते. त्यामुळे उत्पन्नाचा हा सर्वात मोठा स्रोत आहे. त्या पाठोपाठ घरपट्टीच्या माध्यमातून महापालिकेला शाश्वत उत्पन्न मिळते. दरवर्षी विविध कर विभागाला घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. थकबाकी धरून जवळपास अडीचशे कोटी रुपये घरपट्टी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, त्या प्रमाणात वसुली होत नाही. विविध विभागाकडून घरपट्टी थकीत असलेल्या थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली.
२५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत १२५८ थकबाकीदारांकडून जवळपास तीनशे कोटी रुपये अपेक्षित आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली होती. थकबाकीदार यादीत नाव वाचून थकबाकी देतील, असे विविध विभागाला अपेक्षित होते. परंतु, एकही थकबाकीदाराने थकबाकी न भरल्याने अखेर थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजवण्याचा निर्णय घेण्यात आला.
१७ ऑक्टोबरपासून थकबाकीदारांची घरे व आस्थापना समोर ढोल वाजून वसुली मोहिमेला सुरवात झाली. पहिल्या दिवशी ७३ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाल्याने विश्वास दुणावला. त्यानंतर पुढील पाच दिवसात जवळपास चार कोटी रुपये जमा झाले. थकबाकीदारांच्या दारासमोर दिवाळीत ढोल वाजवण्याची मोहीम सुरू केल्याने प्रशासनावर राजकीय दबाव वाढू लागला. त्यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर २२ नोव्हेंबरला मोहीम स्थगित करण्यात आली.
१ नोव्हेंबरपासून पुन्हा ढोल बजावो मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेला प्रतिसाद मिळाला नाही. ३ नोव्हेंबरपर्यंत ६९२ थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजवून पाच कोटी ३४ लाख रुपये वसूल करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात मात्र फक्त पश्चिम विभागात मोहीम राबवण्यात आली. तेथून २८ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली. त्यामुळे ही मोहीम गुंडाळल्यात जमा आहे.
नेत्यांनाच अधिक भीती
थकबाकी वसूल करण्यासाठी विविध कर विभागाने ढोल बजावो मोहिमेचा फंडा वापरला खरा, मात्र सर्वसामान्य नागरिकांपेक्षा राजकीय नेत्यांनाच या मोहिमेची अधिक भीती वाटू लागली. त्यामुळे सदर मोहीम बंद करावी यासाठी दबाव वाढू लागला. या वाढत्या दबावामुळे मोहीम गुंडाळण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.