नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नाशिक शहराचा विकास होण्याचा दावा करताना त्यामुळेच आपण शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्या माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे. असे असले तरी प्रत्यक्षात प्रवेशकर्त्यांनी वैयक्तिक विकासाचे मॉडेल विकसित करण्यासाठीच प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात घेतलेल्या आढाव्यातून ही बाब स्पष्ट होत आहे. (Not development of Nashik but model of individual development ex corporators join cm shinde group Nashik Political News)
बोरस्ते यांना राहायचे कायम ‘अजय’
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रवेशकर्त्या माजी नगरसेवकांचे नेतृत्व केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गटाचे १५ नगरसेवक निवडून आले तरी उपमहापौर, विरोधी पक्षनेते किंवा स्थायी समिती सभापती पदावर दावा सांगता येणार आहे. त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास महापौर पदावरदेखील शिंदे गटाचा दावा होऊ शकतो. एका अर्थाने महापालिकेवर शिंदे गटाची पकड निर्माण करण्यासाठी बोरस्ते यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अर्थात बोरस्ते यांना महापालिकेवर पकड हवी आहे.
भोसले कुटुंबात फूट
शिवसेना व मनसे असा प्रवास केलेल्या भोसले कुटुंबात सचिन भोसले यांच्या निमित्ताने फूट पडली आहे. सचिन यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतल्याने माजी आमदार नितीन भोसले काय भूमिका घेता, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सचिन भोसले यांचा पिंड ठेकेदारीचा आहे. जिथे सत्ता असते, तेथे मोठ्या प्रमाणात कामे मिळण्याची संधी असते. त्यामुळे सचिन भोसले यांना ही संधी वाया जाऊ द्यायची नसल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
मटालेंचे राजकीय भवितव्य सुवर्ण
सिडको विभागातून एकदा मनसे व दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या सुवर्ण मटाले यांना तिसऱ्यांदा निवडून यायचे आहे. महापालिकेच्या सत्तेतील तिसरी एन्ट्री त्यांना भविष्यातील विधानसभेचा मार्ग मोकळा करून देणारी ठरेल. मटाले या शिवसेनेतच राहिल्या असत्या, तर
महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मोठा अडथळा ठरला असता. त्यामुळे शिंदे गटाचा मार्ग त्यांनी स्वीकारल्याचे बोलले जात आहे. भविष्यात शिंदे गट भाजपमध्ये विलीन झाला तरी आमदारकीसाठी त्यांची दावेदारी होऊ शकते.
नाशिक रोडला स्वयंघोषित पॅनल
रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, ज्योती खोले व प्रताप मेहोरोलिया यांचा शिंदे गटातील प्रवेशामुळे नाशिक रोडच्या जुन्या २१ प्रभागात स्वयंघोषित पॅनल जाहीर झाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट व भाजपची युती झाल्यास संपूर्ण पॅनलकडून शिंदे गटासाठी जागा मागितली जाईल. त्यासाठीच संयुक्तपणे प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे गट भाजपमध्ये विलीन झाल्यास आयता पॅनल तयार होईल. युती न झाल्यास भाजपच्या इच्छुकांना मुरड घालावी लागेल.
खाडेंना आमदारकीचे डोहाळे
आदिवासी विकास विभागात अधिकारी पदावर काम केलेल्या चंद्रकांत खाडे यांना सिडकोतील प्रभाग राखीव असल्याने नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची संधी देण्यात आली. त्यात ते निवडूनदेखील आले, मात्र आता त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. सिडकोतून नगरसेवक म्हणून निवडून येतानाच महानगरप्रमुख बडगुजर यांच्याशी त्यांना दोन हात करायचे आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून संधी मिळाल्यास इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची त्यांच्यात महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आहे.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
खर्जुल, मोगरेंचा प्रवेश निश्चित
जयश्री खर्जुल यांचे दीर गोरख खर्जुल खासदार हेमंत गोडसे यांचे नजीकचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे खर्जुल यांचा प्रवेश नक्की मानला जात होता, तर पूनम मोगरे या पालकमंत्री दादा भुसे यांच्या गटातील असल्याने त्यांचा शिंदे गटातील प्रवेशदेखील निश्चित मानला जात होता. शिवसेनेकडूनदेखील त्यांना फारसे थांबविण्याचे प्रयत्न झाले नाही. त्यामुळे त्यांनी एकत्रितपणे प्रवेश केला.
वादातून डेमसेंचा प्रवेश
पाथर्डी भागातून प्रथमच शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आलेले सुदाम डेमसे यांचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पटलेले नाही. बोरस्ते यांचे खंदे समर्थक तसेच बडगुजर यांच्याशी असलेल्या वादातून डेमसे यांनी शिंदे गटात प्रवेशाचा मार्ग स्वीकारला.
व्यवसाय वृद्धीसाठी सत्ता महत्त्वाची
स्थायी समितीचे माजी सभापती अमोल जाधव व त्यांच्या पत्नी संगीता जाधव या दोघांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला. कायम सत्तेत राहणे हा यांचा स्थायीभाव असला तरी राजकारणापूर्वी व्यवसायाकडे प्राधान्यक्रमाने लक्ष दिले जाते. व्यवसाय वृद्धीसाठी सत्तादेखील महत्त्वाची ठरते. त्यातून दोघांचे प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.