नाशिक : इयत्ता दहावीच्या (SSC Exam 2022) लेखी परीक्षा यंदा ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या आहेत. सोमवारी (ता. ४) शेवटचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. आता विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष निकालाकडे लागून राहणार आहे.
कोरोना महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्र प्रभावित झालेले असताना गेल्यावर्षी दहावी (SSC), बारावीच्या (HSC) लेखी परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे बहुतांश अध्ययन ऑनलाइन पद्धतीने झालेले असल्याने परीक्षादेखील ऑनलाइन (Online exam) पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या धोरणानुसार ऑफलाइन (Offline exam) पद्धतीने परीक्षा पार पडली.
इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला गेल्या १५ मार्चपासून प्रथम भाषा विषयाच्या पेपरने सुरवात झाली होती. यानंतर टप्याटप्याने लेखी परीक्षा पार पडली. सोमवारी (ता. ४) सामाजिक शास्त्र पेपर २, भूगोल या विषयाचा पेपर झाला. अखेरच्या पेपरनंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असले तरी आता सुट्यांचा आनंद घेण्याकडे अनेकांचा कल दिसतो आहे.
विभागात यंदा अवघे चार कॉपीबहाद्दर
लिखाणाची सवय प्रभावित झालेली असताना यंदा विद्यार्थ्यांना पेपरसाठी वाढीव वेळ दिलेला होता. दरम्यान यंदा दहावीच्या परीक्षेत संपूर्ण नाशिक विभागातून अवघे चार कॉपीबहाद्दर आढळून आल्याची माहिती मिळते आहे. नाशिक व धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एक आणि नंदुरबार जिल्ह्यात दोन असे एकूण चार कॉपीबहाद्दर नाशिक विभागात आढळून आले. जळगावला एकही कॉपीचा प्रकार आढळून आलेला नसल्याची नोंद आहे. दरम्यान कॉपीचे प्रकारच घडले नाही, की तपासणीत शिथिलता ठेवण्यात आली, याविषयी पालक, शिक्षकांमध्ये चर्चा रंगते आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.