जुने नाशिक : भद्रकाली ठाकरे गल्ली परिसरातील दीडशे वर्षांपूर्वीचा कुंटणखाना भद्रकाली पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. या वेळी कुंटणखान्यावर महिलांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्यांची समजूत काढल्याने अनर्थ टळला.
सात दिवसांपूर्वी कुंटणखाना चालकांना नोटीस पाठवून कुंटणखाना बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच, देहविक्री करणाऱ्या महिलांना येथून स्थलांतरित होण्यास सांगितले होते. पोलिसांनी नोटीस देऊन देखील कुंटणखाना बंद झाला नाही. गुरुवारी (ता.९) दुपारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, निरीक्षक दीपक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किशोर खांडवी, प्रणिता पवार, उपनिरीक्षक जितेंद्र माळी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी
कुंटणखान्यातील महिलांना बाहेर पडण्यासाठी काही वेळ दिला. त्यांनी काही वेळ विरोध करत येथून कुठे जाणार कुठलीही व्यवस्था नाही, असे म्हणत स्थलांतर होण्यास नकार दिला. महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत काढत त्यांना बाहेर काढले. शासकीय पंच यांच्या उपस्थितीत ठाकरे गल्ली येथील दर्शनी भागातील तसेच संदर्भ रुग्णालयाच्या मागील भिंतीस लागून असलेल्या कुंटणखान्यावर कारवाई करत सील करण्यात आले.
दर्शनी भागातील कुंटणखान्यात चालकांनी न्यायालयाची स्थगिती असल्याचे कागदपत्र पोलिसांसमोर सादर केले. संबंधित कागदपत्र वेगळे असल्याने पोलिसांनी त्यांची कारवाई सुरू ठेवली. परिसरातील या महिलांना वारंवार त्रास देणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कारवाई झाल्याचा आरोप महिलांनी केला. त्याच्याविरुद्ध परिसरात घोषणाबाजी करत शिवीगाळ केली. पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी महिलांना तेथून काढून दिले. दरम्यान काही महिलांनी आम्हास कोणी नाही. कुठे जायचे. अशी याचना करत अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याची धमकी दिली.
व्यावसायिकांमध्ये समाधान
कुंटणखाना चालत असल्याने गुन्हेगारी संबंधित घटना, मारहाण, चोरी असे प्रकार घडत असल्याने येथील व्यवसायांवर त्याचा परिणाम होत होता. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडून कुंटणखाना बंद करण्याची मागणी केली जात होती. गुरुवारी प्रत्यक्षात कुंटणखाना सील करण्यात आल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.