Onion : कांद्याला प्रतिकिलो २५ पैशांची बोली

अनुदानासाठी मोठी आवक; व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
Onion 25 paise per kg Greater revenue for scam with farmers trader agriculture
Onion 25 paise per kg Greater revenue for scam with farmers trader agricultureesakal
Updated on

नाशिक : यंदा जानेवारी अखेरपासून कांद्याने शेतकऱ्यांना रडविले. उत्पादन खर्चाखाली दर मिळत असल्याने आर्थिक गणिते कोलमडली आहेत. अनुदान मिळविण्यासाठी कांदा विक्रीसाठी शुक्रवारी (ता.३१) अंतिम मुदत होती.

त्यामुळे शेतकऱ्यांकडून कांद्याची मोठी आवक झाली. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी घेत अवघ्या २५ पैशांची बोली प्रतिकिलो कांद्यास लावली. त्यामुळे दिलासा तर दूरच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची मोठी लूट करून थट्टाच केली.

कांदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा रोष पाहता अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ मार्च रोजी केली. त्यानंतर अनुदान देण्यासंबंधी २७ मार्च रोजी शासन निर्णय आला. त्यामध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान कांदा विक्रीची मुदत देण्यात आली .त्यानंतर अवघे ४ दिवस शिल्लक असताना कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. मात्र त्याचा फायदा व्यापाऱ्यांनीच घेतला आहे.

एकीकडे कांद्याला भाव नसल्याने अनुदानाची रक्कम पदरी पडेल, या आशेने शेतकऱ्यांनी शेवटच्या टप्प्यात शिल्लक कांदा बाजारात विक्रीची घाई केली. त्यामुळे २८ ते ३१ मार्च दरम्यान बाजार समित्यांमध्ये आवक वाढली. मात्र शेतकरी दराची अपेक्षा करत असताना व्यापारी त्यावर टपूनच होते. त्यांनी संधी साधून पडत्या दराने खरेदी करून शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेतला आहे.

नांदगाव येथे अवघा २५ पैसे, सटाणा व सिन्नर येथे ५० पैसे, तर करंजाड, येवला आणि कळवण येथे १ रुपया प्रतिकिलो असा मातीमोल किमान दर कांद्यास मिळाला. हा प्रकार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळावरील माहितीतून समोर आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात मिळालेला सरासरी दर ४ ते ६ रुपये प्रति किलो होता.

एकीकडे कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो १२ ते १४ रुपये येत आहे. त्यामुळे मिळणाऱ्या दराची स्थिती खर्चाच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. मिळणारी अनुदानाची रक्कम व मिळालेला दर एकत्र बेरीज करूनही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघू शकणार नाही, अशी स्थिती आहे.

एकीकडे रद्दीला चांगला भाव आहे; मात्र शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या कांद्याला भाव नाही, अशी वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दर ठरविण्याची कुठलीही यंत्रणा नसल्याने खुल्या लिलावाच्या नावाखाली दर पाडून व्यापाऱ्यांनी लूट केली, असा संताप शेतकऱ्यांमध्ये आहे.

मार्चअखेर बाजार समित्यांमधील स्थिती

  • उमराणे, नांदगाव, देवळामध्ये मोठी आवक

  • नांदगाव येथे २५ तर सटाणा येथे अवघा ५० पैसे प्रतिकिलो किमान दर

  • खुल्या लिलावात मनमानी बोली लावून व्यापाऱ्यांकडून खरेदी

  • मुंगसे येथे लिलाव बंद असल्याने शेजारच्या बाजार आवारात गर्दी

शासन निर्णय जाहीर करण्याची वेळ चुकली?

शासनाने २७ मार्च रोजी कांदा अनुदान देण्यासंबंधी अटी-शर्ती जाहीर केल्या. मात्र पुढे लाभ घेण्यासाठी चार दिवस विक्रीची मुदत शिल्लक होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदाच गर्दी केली. या परिस्थितीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी मातीमोल दराने खरेदी केली. त्यामुळे शासन निर्णय जाहीर करण्याची वेळ चुकली का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

व्यापाऱ्यांनी संकटकाळात शेतकऱ्यांना लुटले आहे. यामध्ये व्यापारी व बाजार समित्या दोषी आहेत. शेतकरी हतबल असताना दिलासा कुठेच मिळालेला नाही.

- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

मुंबईला २० रूपये किलोने कांदा विकला जातोय आणि नाशिक जिल्ह्यात २५ पैसे मिळत असतील तर दुर्दैव आहे. कांदाप्रश्नी विधानसभेत सातत्याने आवाज उठवला. मात्र सरकारशी पुन्हा एकदा याप्रश्नी बोलावे लागेल.

- छगन भुजबळ, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.