Onion Rates : भारतीय चलनातील ७० रुपये किलो असा कांद्याचा भाव होताच, आयात आजपासून खुली करण्याचा निर्णय बांगलादेश सरकारने घेतला. त्यामुळे त्याचे पडसाद आजच कांद्याच्या आगारातील बाजारपेठेत उमटले असून किलोला सर्वसाधारपणे साडेतीन रुपयांचा अधिकचा भाव उन्हाळ कांद्याला मिळाला.
कांद्याच्या भावातील ही वृद्धी कायम राहण्यातून देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या भावात सुधारणा होते, असा गेल्यावर्षीपर्यंतचा अनुभव जमेस आहे. (Onion Rates Bangladesh imports open decision increase in price of onion by three half rupees nashik news)
बांगलादेशमध्ये या महिन्याच्या अखेरीस ईद अल-अधा असल्याने कांद्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि विशेषतः मर्यादित उत्पन्न असलेल्यांसाठी कांद्याची आयात खुली करण्यात येत असल्याचे बांगलादेश सरकारच्या कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
बांगलादेशच्या बाजारपेठेत किमतीत अस्थिरता वाढली असून बांगलादेशच्या राजधानीत देशी कांद्याचा भाव किलोला ८० ते ९० टकापर्यंत पोचला आहे. बांगलादेश सरकारने देशातील शेतकऱ्यांना पैसे मिळावेत म्हणून १५ मार्चपासून कांद्याची आयात बंद केली होती.
आता मात्र आयात खुली होत असल्याची माहिती भारतात धडकताच, बांगलादेशच्या सीमेवर कांद्याचा भाव किलोला १२ रुपयांवरुन २० रुपयांपर्यंत पोचला होता. बांगलादेशकडून आयात खुली करण्याचे संकेत मिळत असल्याने देशातून जवळपास शंभर ट्रकभर कांदा सीमांवर पोचला आहे.
पाकिस्तान कांद्याची शिजणार नाही डाळ
मंदी आणि युरोपमधील ‘स्लो-डाऊन’ मुळे जहाजाचे भाडे कमी झाले आहे. कंटेनरसाठी जहाजाचे भाव अकराशे डॉलरपर्यंत पोचले होते. ते आता ९०० ते ९५० डॉलरपर्यंत कमी झाले आहे.
परिणामी, देशांतर्गत कांद्याच्या भावात वाढ झाली, तरीही जहाज भाडे कमी झाल्याने पाकिस्तानच्या कांद्याला भारतीय कांद्याला भावात टक्कर देणे तूर्त शक्य नसल्याची स्थिती तयार झाली आहे. मुळातच, निर्यात होणाऱ्या भारतीय कांद्यापैकी जवळपास ३० टक्के कांदा बांगलादेशमधील ग्राहकांसाठी पाठवला जातो.
तसेच जवळपास २० टक्के कांदा श्रीलंकेतील ग्राहकांना पाठवण्यात येतो. श्रीलंका आणि बांगलादेशची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने पाकिस्तानच्या कांद्याची भावाच्या बाबतीत डाळ शिजणार नाही, अशी परिस्थिती तयार झाली आहे. पाकिस्तानकडून अरब राष्ट्रांमध्ये कांद्याची निर्यात मोठ्याप्रमाणात होते.
भारतीय कांद्याचे भाव वाढल्याने अरब राष्ट्रांमध्ये अधिकचा कांदा विकून पैसे मिळवता येतील, असे आडाखे पाकिस्तानच्या निर्यातदारांनी बांधले होते. पण आता पाकिस्तानमध्ये झालेल्या पावसामुळे तेथील कांद्याचे नुकसान झाले आहे काय? याची माहिती भारतीय निर्यातदारांनी घेण्यास सुरवात केली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पिंपळगावमध्ये ११०० रुपये भाव
पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज उन्हाळ कांद्याला क्विंटलला सरासरी अकराशे रुपये असा भाव मिळाला. शनिवारी (ता. ३) ८५०, शुक्रवारी (ता. २) ८००, तर गुरुवारी (ता. १) ७५१ रुपये क्विंटल अशा सरासरी भावाने उन्हाळ कांद्याची विक्री झाली होती.
उन्हाळ कांद्याची आवक सुरु झाल्यापासून सरासरी ७०० ते ८०० रुपये क्विंटलच्या आसपास भाव राहिले आहेत. राज्यातील इतर बाजारपेठांमधील कांद्याचा क्विंटलचा आजचा सरासरी भाव रुपयांमध्ये असा : कोल्हापूर-१ हजार, मुंबई-९५०, सातारा-१ हजार, पुणे-९००, येवला-८००, लासलगाव-९००, चांदवड-७८०, देवळा-९००, सिन्नर-७००, कळवण-८५१. बांगलादेशमधील ग्राहकांकडून छोट्या आकारातील (गोल्टी) कांद्याला अधिक पसंती मिळते.
छोट्या आकारातील कांद्याच्या भावात किलोला तीन ते साडेतीन रुपयांनी वृद्धी होऊन आज साडेसहा ते सात रुपये किलो भावाने विकला गेला.
निर्यात मूल्यात वाढ (आकडे सरासरी टनाचे डॉलरमध्ये दर्शवतात)
० श्रीलंका-२७५
० सिंगापूर-२७०
० मलेशिया-२३५
० दुबई-२७०
(निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यात मूल्यात टनाला सरासरी ३० ते ४० डॉलरने वाढ झाली आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.