सिन्नर : अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोलकत्ता स्थित पत्ता असलेल्या एका कंपनीकडून ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची बाब सहन न झाल्यामुळे वावी ता. सिन्नर येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. (Online fraud with lure of higher returns Suicide of youth from Vavi Nashik Cyber Crime)
राहुल योगेश वाघ 22 याने मोबाईल ॲप च्या साह्याने एका कंपनीकडे अधिक परतावा मिळेल म्हणून 11 हजार रुपये भरले होते. त्याला किरकोळ रक्कम कंपनीकडून परत देखील मिळाली होती.
मात्र, अधिक फायदा हवा असेल तर आणखी 25 हजार रुपये भरण्याची मागणी कंपनीच्या प्रतिनिधीकडून फोनद्वारे त्याच्याकडे करण्यात येत होती.
मोलमजुरीचे काम करणाऱ्या व सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या राहुल कडे एवढे पैसे नसल्याने त्याने अगोदर भरलेली रक्कम परत करण्याची विनंती कंपनीच्या प्रतिनिधीकडे केली होती.
त्याकडे दुर्लक्ष करत कंपनीच्या प्रतिनिधीकडून वारंवार फोन करून अधिक रक्कम भरण्यास सांगितले जात होते. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे पाहून निराश झालेल्या योगेशने बुधवारी सकाळी वावी येथील गणपती मंदिर परिसरातील राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यापूर्वी त्याने स्वतःच्या डायरीत कंपनीकडून झालेल्या आर्थिक फसवणुकीबद्दल मजकूर लिहिल्याचे आढळून आले.
गावात मजुरीने एका गाडीतील साहित्य खाली करायचे असल्यामुळे राहुलचा मित्र त्याला साडेअकरा वाजेच्या सुमारास फोन करत होता. त्याच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर मिळाले नाही. त्यामुळे जेवण केल्यावर हा मित्र जवळच असलेल्या राहुलच्या घरी गेला.
त्याला घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. त्याने राहुलला आवाज देत डोकावून पाहिले असता राहुलने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकिस आला. घाबरलेल्या मित्राने तातडीने राहुलच्या आईला मोबाईल फोनवर माहिती देऊन तात्काळ घरी यायला सांगितले.
तसेच माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या त्याच्या बहिणीला देखील घरी घेऊन आला. त्यांच्याकडून इतर नातेवाईकांना कळविण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर पारस वाघमोडे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
त्यानंतर स्थानिक तरुणांच्या मदतीने दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात राहुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. रात्री उशिरा वावी येथे शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाभिक समाजातील असलेल्या राहुलचे आई-वडील देखील मोलमजुरीचे काम करतात. त्याच्या एका बहिणीचे लग्न झाले असून दुसरी शाळेत शिकते आहे. आई कामाला गेल्यावर त्याने बहिणीला शाळेत जायला लावले व मी घरी थांबतो असे म्हणाला.
वारंवार कॉल करूनही न घेतल्यामुळे मित्र घरी आला व आत्महत्येचा प्रकार उघड झाला. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन तपासासाठी ताब्यात घेतला आहे.
फोनवर संबंधित कंपनीचे नावे पाठवलेले पैसे व कंपनीकडून आलेले पैसे असे ट्रांजेक्शन दिसते मात्र परत मिळालेली रक्कम अगदीच किरकोळ होती.
पोलीस मृतदेह तपासणी करत असताना देखील राहुलच्या फोनवर कंपनीच्या प्रतिनिधीकडून कॉल येत होते मात्र कॉल रिसीव केल्यावर बदललेला आवाज ऐकून सदर कॉल कट केला जात होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.