पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याबाबतचे सहकार विभागाचे आदेश सत्ताधाऱ्यांच्या चांगलेच पथ्यावर पडल्याचे चित्र आहे. एरवी वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी गटात आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमक, खडाजंगी व्हायची. काही संस्थांमध्ये मुद्याची लढाई गुद्यावर यायची. कोरोनामुळे ऑनलाइन सभा होत आहे. एखादा विषय अंगलट येताच तंत्रज्ञानाचा वापर करून विरोधकांचा आवाज म्यूट केला जात आहे.
संधी मिळेल त्यालाच म्हणणे मांडण्याची संधी
बहुतांश संस्थांचा संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या सभा वादळी होतात. तेथे हवे ते प्रश्न विचारत सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामावर बोट ठेवले जायचे. यंदा कोरोनाच्या संक्रमणामुळे सहकार विभागाने वार्षिक सभा ऑनलाइन घेण्याचे आदेश आहेत. त्यानुसार सभा ऑनलाइन बोलविण्यात येत आहे. पण त्याबाबत जनजागृतीचा अभाव दिसतो. बऱ्याच सभासदांना सभा झाल्यानंतर माहिती मिळते. माहिती मिळालेले सभासद लिंकद्वारे बैठकीत सहभागी होतात. विषयपत्रिकेनुसार संस्थेचे अध्यक्ष मनोगतात कामकाजाचा लेखाजोखा ठेवतात. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. विरोधक प्रत्यक्ष सत्रेत सहभागी होत नाहीत. ज्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यांचेच म्हणणे कानावर पडते. काही मिनिटात औपचारिकता पार पडते व सभा गुंडाळली जाते.
ऑनलाइन सभा सताधाऱ्यांना तारणाऱ्या
सहकारी संस्थांचे सभासदच खऱ्या अर्थाने मालक असतात. त्यांनी निवडून दिलेल्या संचालकांनी विश्वस्त म्हणून काम करावे, अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्ष काही संस्था राजकारणाचा अड्डा बनल्या आहेत. वार्षिक सभा वर्षातून एकदा होते. वर्षभरातील कामकाजाचा आढावा, ताळेबंद यावर चर्चा होऊन ठरावाला मंजुरी द्यावी, असा हेतू यामागे असतो. मात्र अलीकडे सभेत जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचे प्रकार घडतात. विरोधक दंगा करणार हे माहीत असल्याने मर्जीतील लोकही सभेला बसविले जातात. एखादा नुसता उठुन उभा राहिला, तर दुसरा त्याला खाली बसा म्हणायला तयार असतो. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी करता येतो. मात्र सभेत आपल्याच लोकांना बोलण्याची संधी देऊन कामकाज किती छान चालले, याची माहिती दिली जाते. विरोधकांपैकी कोणी बोलण्यास इच्छुक असला तरी यंत्रणेमार्फत त्याला म्यूट केले जाते. निवडणुका तोंडावर आल्याने ऑनलाइन सभा सताधाऱ्यांना तारणाऱ्या ठरल्या आहेत. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सभा हायजॅक करण्याचा प्रयत्न होत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ऑनलाइन सभेचा पर्याय दिला आहे. यामागील हेतू स्वच्छ आहे. मात्र यंत्रणेचा गैरवापर करून सभा गुंडाळण्याचा प्रयत्न होत असेल, तर संबंधितांना सूचना करण्यात येईल.
-अभिजित देशपांडे, सहाय्यक निबंधक, निफाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.