नाशिक : आजपर्यंत मिळालेल्या नारीशक्ती, पद्मश्री (Padmashree) यांसारख्या पुरस्कारांपेक्षाही मला काळ्या आईची सेवा करायला मिळतेय, हाच माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे. ऊसतोड कामगार म्हणून काम करत असताना सुचलेली बेणे बनविण्याची कल्पना आणि त्यातून साकारलेली बीज बँक हेच माझ्या यशाचे रहस्य असून, भविष्यात प्रत्येक गावात प्रत्येक बियाण्याच्या बँका तयार व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याचे स्वप्न आहे, असे प्रतिपादन बीजमाता राहीबाई पोपेरे (Seedmother) यांनी गुरुवारी (ता. ९) येथे केले. (Padmashree Rahibai Popere statement about seed bank in sakal idol of maharashtra award Nashik News psl98)
‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे (Sakal Media Group) गुरुवारी (ता. ९) हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये रंगलेल्या ‘आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ या मान्यवरांच्या दिमाखदार सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर व्यासपीठावर होते. आयडॉल्स ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘ॲवॉर्ड इन हेल्थकेअर ॲन्ड वेलनेस’ व ‘ॲवॉर्ड इन वुमन इन्फुएन्सर’ या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. श्रीमती पोपेरे म्हणाल्या, की आरोग्याची काळजी म्हणून आपण सुरवातीपासूनच सेंद्रिय शेतीवर भर दिला. काळ्या आईची सेवा केल्यास येणाऱ्या पिढीचे आरोग्य आपण अबाधित राखू शकतो. आज या ठिकाणी पुरस्कारार्थींमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांनीसुद्धा सेंद्रिय शेती आणि त्यातून उत्पादित अन्नधान्याच्या सेवनाचाच सल्ला सर्वांना दिला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
सुगरणीचाही सन्मान आनंददायी : तांबे
घरात अगदी पणजोबा, पणजी, आजी-आजोबा, वडील यांच्यापासून तर सासरीदेखील राजकीय वारसा लाभला आहे. मात्र, त्या अनुषंगाने आमदार होण्याची अजिबात इच्छा नाही. त्याऐवजी आयुष्यभर पर्यावरण संवर्धनासाठी काम करायला आवडेल, असे मत श्रीमती तांबे यांनी या वेळी मांडले. त्या म्हणाल्या, की पर्यावरणासाठी काम करण्याची प्रेरणाही वडिलांपासूनच मिळाली आहे आणि याच कामाने मला संगमनेरचे नगराध्यक्षपद दिले आहे. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर दोन मोठे पुरस्कारही याच कामामुळे मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. आजच्या काळात पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास बघवत नाही. याच तळमळीतून आम्ही आतापर्यंत ३० कोटी बीजारोपण केले आहे, तसेच एकट्या संगमनेर तालुक्यात ८० लाख रोपांची लागवड केली आहे. दरम्यान, ‘सकाळ’ने नेहमीच महिलांच्या कर्तृत्वाची यथोचित दखल घेतली आहे.
राजकीय, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सन्मानित करताना अगदी सुगरण या महिलांच्या प्रमुख कार्याचीही प्रातिनिधिक स्वरूपात दखल घेतली गेली, ही बाब आनंददायी आहे. तसेच, राजकीय घराण्यात वावरताना येणाऱ्या अडचणी मी जाणून आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील महिलांचा सन्मानदेखील निश्चितच गौरवास्पद आहे. अशा सर्वगुणसंपन्न महिलांचा सत्कार आम्हा महिलांच्या हस्ते व्हावा, हेदेखील मी भाग्यच समजते, असेही त्या म्हणाल्या.
लोकसेवा हक्क आयोगाचा लाभ घ्यावा : कुलकर्णी
दैनंदिन व्यवहारात, सरकारी कामकाजात सामान्य माणसाला अनंत अडचणी येतात. अनेक वेळा शासकीय कार्यालयांत चकरा माराव्या लागतात. या सर्वांपासून सुटका व्हावी यासाठी राज्य शासनाने माहिती अधिकार कायद्याचे पुढचे पाऊल म्हणून डिसेंबर २०२१ पासून विभागीय स्तरावर राज्य लोकसेवा हक्क (राइट टू सर्व्हिस ॲक्ट) आयुक्तालय सुरू केले आहे. याशिवाय आपले सरकार या पोर्टलद्वारे शासनाच्या एकूण ३६ विभागांशी संबंधित तब्बल ५०६ प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात. मात्र, याबाबत सर्वसामान्यांना माहिती नसते. या सेवांचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्याचप्रमाणे आयुष्यात ताणतणाव घालविण्यासाठी छंद जोपासणे फार मोलाचे ठरते. हे छंद आपल्याला जसा वेळ मिळेल, तसे जोपासता येतात. अगदी किरकोळ बाबींमधूनही आयुष्य घडविता येते, याबाबत सांगताना त्यांनी स्वत:चा अनुभव विशद केला.
त्या म्हणाल्या, की पदवीचा निकाल घेण्यासाठी जेव्हा आम्ही मैत्रिणी विद्यापीठात गेलो, त्या वेळी ‘लोकसेवा आयोग माहिती केंद्र’ असा फलक पाहून सहजच उत्सुकता म्हणून चौकशी केली. त्या वेळी मिळालेल्या माहितीनुरूप राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा अर्ज घेतला. तो भरला, परीक्षा दिली अन् पास होऊन नियुक्तीही मिळाली. एवढ्या सहजासहजी आपण उच्चपदापर्यंत पोचू शकतो, अशी कधी कल्पनाही केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
समाजसेवा हाच उद्देश : डॉ. थोरात
वैद्यकीय क्षेत्रातील पदवीसाठी प्रवेश घेणारा प्रत्येक उमेदवार हा ‘इनबॉर्न सोशल वर्कर’ म्हणजेच जन्मत:च समाजसेवक असतो. मात्र, पुढे प्रत्यक्ष जीवनात या सेवेचे दोन प्रकार पडतात. खासगी प्रॅक्टिस करायची तर रुग्णांकडून अल्प प्रमाणात का होईना शुल्क घ्यावे लागते. शासकीय सेवेत मात्र मोबदला म्हणून शासनाकडून वेतन मिळते. मात्र, शासकीय रुग्णालयांत येणारे रुग्ण हे एकतर गरिबीतून आलेले असतात किंवा त्यांचा शासकीय सेवेवर पूर्ण विश्वास असतो. यातील दुसऱ्या प्रकारातून म्हणजेच विश्वासातून रुग्णांनी शासकीय रुग्णालयात यावे, यासाठी प्रयत्न करावे लागतात. या प्रयत्नांनाही जेव्हा यश येते, तो खरा आनंद वाटतो. मुळातच समाजसेवेचा वसा घेतलेला असल्यानेच आपण खासगी प्रॅक्टिसमधून पैसा कमावण्यापेक्षा शासकीय सेवेत येणे पसंत केल्याचेही त्यांनी या वेळी अधोरेखित केले.
यांचा झाला सत्कार
* ताराबाई वांबळे (सरपंच, सर्वतीर्थ टाकेद)
* कल्याणीताई सपकाळ (संचालिका, सपकाळ नॉलेज हब)
* दीपिकाताई चव्हाण (माजी आमदार)
* डॉ. मुकेश धांडे (न्यूरो सर्जन)
* डॉ. साईनाथ डेमसे
* आरती दिवे (राजकीय घराणे)
* सुनंदाताई गाढवे (यशस्वी सुगरण)
* अंजनाताई गांगुर्डे (संस्थापक, मोना एज्युकेशन सोसायटी, सटाणा)
* योगिता हिरे (महिला सक्षमीकरण)
* डॉ. अक्षय अलिझाड (निफाड)
* डॉ. मृणाल कापडणीस (संचालिका, निम्स हॉस्पिटल)
* डॉ. किरण कुंवर (शिक्षण उपनिरीक्षक)
* तेजश्री लासुरे (शिक्षण)
* डॉ. विशाल पगार
* डॉ. महेश खैरनार (सिन्नर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.