नामपूर : ऑलिम्पिक, आशियाई यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशातील प्रतिभावंत खेळाडूंनी पदकांची लयलूट करावी, यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत.
केंद्र सरकारमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रम ही खेळाडूंसाठीच्या योजनांची एक सुधारित उपयोजना नुकतीच निर्माण करण्यात आली.
या योजनेंतर्गत खेळाडूंना १० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. दरम्यान, खेळाडूंनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Pandit Dindayal Upadhyay Scheme Players will get financial assistance of 10 lakhs Encouragement for international competitions nashik)
गरीब खेळाडूंना योग्य ती मदत करणे, त्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत आणि स्पर्धांदरम्यान झालेल्या दुखापतीच्या स्वरूपानुसार योग्य सहाय्य प्रदान करणे, खेळाडूंना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, खेळाडू व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय यांना त्यांच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करणे, गरीब खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा साहित्य खरेदी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग आदींसाठी मदत करणे या बाबींचा या योजनेत समावेश असणार आहे.
या बाबींकरिता खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांना २ ते १० लाख रुपये इतकी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यात खेळाडूंना इतर माध्यमाद्वारे मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याबाबतही माहिती पुरविणे आवश्यक आहे.
खेळाडूंनी केलेल्या ऑनलाइन अर्जाची माहिती खालील संकेतस्थळावर भेट देणाऱ्या सर्वांसाठी उपलब्ध असेल. आर्थिक सहाय्यासाठी आवश्यक असणारे खेळाडू पात्रतेचे निकष व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी केंद्र सरकारच्या https://dbtyas-sports.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेस प्राधान्य
केंद्राप्रमाणे राज्यातही क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन परिणामकारक करण्यासाठी तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करून पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत, यासाठी क्रीडाविषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख यासाठी क्रीडा धोरण तयार करण्यात आले आहे.
यात राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. ही योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वित आहे.
यासाठी मिळतो खर्च
शासनाच्या निर्णयानुसार अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन, तसेच देश-विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे,
तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात किंवा खरेदी करणे, गणवेश आदी बाबींसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
राज्य सरकारकडूनही बक्षिसांचा वर्षाव
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करून राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
त्यानुसार आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत दहापट वाढ करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला. त्यामुळे विजेत्या खेळाडूंना ५० लाख ते एक कोटी रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.