नाशिक : एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जच्या कारखान्यांपाठोपाठ अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रींमुळे शहर राज्यात चर्चेत आलेले असताना अजूनही नवनवीन एमडी ड्रग्जचे डिलर अन् पेडलर्स पोलिसांच्या हाती लागत आहेत.
चुंचाळे पोलीस चौकीच्या पथकाने अंबड परिसरात एमडी विक्री करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या डिलरसह शहरातील पेडसर्लला शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे तीन लाखांचे २७.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे एमडीचे जाळे शहरभर पसरले आहे की काय, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. (Peddlers jailed along with MD drug dealers in Ambad area 27 half gram of material seized Nashik Crime)
मुश्ताक शौकत अली शेख उर्फ भुऱ्या (३०, रा.अभियंतानगर, पदमा हॉटेलच्या पाठीमागे, कामटवाडे, सिडको, नाशिक) असे एमडी ड्रग्ज खरेदी करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
तर, ठाण्यातील मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या मोहम्मद शोएब शकील शेख (२०, रा. गोवंडी ईस्ट डंपिंग रोड, डॉ. झाकिर हुसैननगर, मुंबई. मुळ रा. गुडसायगंज, जि. कन्नोज, उत्तर प्रदेश), रिजवान खुर्शिद खान (३३, रा. गोवंडी रिंग रोड, डॉ. झाकीर हुसैननगर, गोवंडी पूर्व), शफीगफूर रहमान मन्सुरी (३१, रा. गोवंडी रिंग रोड, गोवंडी पूर्व), मेराज सज्जाद कुरेशी (२८, रा. गोवंडी रिंग रोड, गोवंडी पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
अंबडजवळील एक्सलो पॉईंटजवळ मुंब्रा येथून काही संशयित अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय खबर अंबड पोलीस ठाण्याच्या चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीचे अंमलदार अनिल कुऱ्हाडे यांना मिळाली होती.
परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चुंचाळे पोलीस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २४) सापळा रचण्यात आला.
त्यावेळी संशयित रिक्षाचालक भुऱ्या हा मुंबईवरून आलेल्या संशयितांना पैसे देऊन त्यांच्याकडून पाकिटातून एमडी ड्रग्ज खरेदी करताना आढळून आला. त्याचवेळी दबा धरून असलेल्या पोलिस पथकाने सर्व संशयितांना चौहीकडून घेऊन ताब्यात घेतले.
संशयितांकडून २७. ५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, चार मोबाईल, ३४ हजार रुपये, दुचाकी (एमएच ०४ एलयू ३४६४), रिक्षा (एमएच ०३ डी. एस. ४३८९) असा ३ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहायक निरीक्षक गणेश मुगले, उपनिरीक्षक संदीप पवार, समाधान चव्हाण, जाधव, कांदळकर, नेहे, कुर्हाडे, जनार्दन ढाकणे, विराजदार खैरनार, सोनवणे, महिला पोलीस खर्डे, भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पुन्हा नाशिक हॉटस्पॉट
गेल्या काही महिन्यांपासून नाशिक एमडी ड्रग्जच्या कारवाईमुळे प्रकाशझोतात आलेले आहे. नाशिकमध्ये दोन कारखाने तर, नाशिक पोलिसांनी नाशिकच्या टोळीचे सोलापुरातील दोन कारखाने उदध्वस्त केले आहेत.
त्यापाठोपाठ सातत्याने ड्रग्जपेडलर्स पोलिसांच्या हाती लागत आहेत. त्यामुळे पोलिस कारवाईनंतरही शहरातील ड्रग्सच्या नशेखोरीला अद्याप आळा बसलेला नसल्याचेच या कारवाईतून स्पष्ट होते आहे.
वडाळ्यातील छोटी भाभी, पाथर्डी फाटा परिसरातून अटक केलेल्या सराईत गुन्हेगार आणि आता अंबड एमआयडीसीतील कारवाईची लिंक मुंबईपर्यंत जात असून, मुंबईतील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहे.
"एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेले संशयित मुंबईतील आहेत. त्यांनी ड्रग्ज कोणाकडून घेतले याचा पोलिस तपास करीत आहेत. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल."
- मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.