PESA Teacher Recruitment : जिल्ह्यातील आदिवासी तालुका (पेसा) क्षेत्रातील शिक्षकांच्या भरतीस शासनाने परवानगी दिल्यावर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यस्तरावरून शिक्षकांची यादी प्राप्त झाली असून, पडताळणी वेळापत्रक विभागाने जाहीर केले.
त्यानुसार यादीची १६ सप्टेंबर व १८ सप्टेंबरला पडताळणी केली जाणार आहे. गुणवत्ता यादी व कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे.
यादीतील उमेदवारांनी वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले आहे. (PESA Teacher Recruitment Schedule Announced nashik news)
अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ३ एप्रिल २०२३ च्या शासन आदेशानुसार वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी मिळाली आहे. यात अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भरतीस परवानगी मिळाली आहे.
त्यानुसार, नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, बागलाण, देवळा या तालुक्यांतील साधारणतः ४५० पदसंख्या आहे. याच्या ८० टक्के म्हणजेच ३०९ जागा भरल्या जातील. या रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना प्राधान्य राहणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०२२ मध्ये पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून टीईटी (टेट-२०२२) परीक्षा घेतली होती.
तिच्या अनुषंगाने एसटी-पेसामधील उमेदवारांतून सेवाज्येष्ठतेप्रमाणे ‘मेरिट लिस्ट’ तयार करून शासनाने ही यादी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ही यादी प्राप्त झाल्यावर पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियेस सुरवात झाली. राज्य स्तरावरून प्राप्त गुणवत्ता यादीतील पेपर २- इयत्ता सहावी ते आठवीसाठी- १ ते २०० उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी शनिवारी (ता. १६) सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय, नाशिक येथे होणार आहे.
पेपर- १, इयत्ता १ ली ते ५ वी साठी १ ते ३०० उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी सोमवारी (ता. १८) सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय, नाशिक येथे होणार आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी गुणवत्ता यादी व कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झाले. यादीतील उमेदवारांनी वेळापत्रकानुसार कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे बच्छाव यांनी सांगितले.
"पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेस सुरवात झाली असून, शासनाकडून यादी प्राप्त झाली. प्राथमिक शिक्षण विभागाने वेळापत्रक तयार केले असून, त्यानुसार कागदपत्रांची पडताळणी होणार आहे." - नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.