नाशिक : जागतिक हवामान बदलामुळे वर्षभर अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून, गारपिटीने शेतकरी बेजार झाले आहेत. पाऊस नित्याचा झाला असल्याने त्यावर उपाय म्हणून द्राक्ष बागायतदार संघाने तळेगाव (ता. दिंडोरी) येथील शेतावर हेक्टरभर द्राक्षांचे उत्पादन आच्छादित घेण्याचा पथदर्शी प्रयोग राबविण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी गुजरातमधील कंपनीकडून चार लाखांचा प्लॅस्टिकचा कागद उपलब्ध करण्यात आला आहे.
आच्छादनासाठी लागणाऱ्या ‘स्ट्रक्चर’ची उभारणी करण्यासाठी दोन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. आच्छादित द्राक्षांच्या उत्पादनासाठी संघाला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, कृषी विभाग आणि राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहाय्य लाभणार आहे, अशी माहिती राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी बुधवारी (ता. ८) येथे ‘सकाळ’ला दिली. ते म्हणाले, की आच्छादित उत्पादनासाठी लागणारा प्लॅस्टिकचा कागद पूर्वी आयात करावा लागायचा. त्यासाठी ४० टक्के आयात शुल्क द्यावे लागत असल्याने प्लॅस्टिकच्या कागदाचा भाव वाढायचा आणि तो शेतकऱ्यांना परवडत नव्हता. त्यामुळे गुजरातमधील कंपनीने आच्छादनासाठी लागणाऱ्या प्लॅस्टिकच्या कागदाचे तंत्रज्ञान अवगत करून देशात कागदाच्या निर्मितीला सुरवात केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कमी खर्चात आच्छादित द्राक्षांचे उत्पादन करण्यासाठी तळेगावमध्ये ‘रोल मॉडेल’ तयार केले जाणार आहे.
कृषिमंत्र्यांचा पुढाकार
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आच्छादित द्राक्षांच्या उत्पादनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि राहुरी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना याकामी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगलीमध्ये सुरू असलेल्या आच्छादित द्राक्ष उत्पादनाची माहिती घेतली. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील उत्पादनाची माहिती संकलित केली आहे. त्याच्या आधारे राज्याचे धोरण तयार होणे अपेक्षित आहे. आच्छादित उत्पादनासाठी शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान मिळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशीही माहिती श्री. भोसले यांनी दिली. ते म्हणाले, की स्पेनमध्ये शंभर टक्के द्राक्षांचे उत्पादन आच्छादित स्वरूपात घेतले जाते. त्याच वेळी दक्षिण आफ्रिका, चिली, ग्रीसमध्ये द्राक्षांच्या बागा आच्छादित आहेत. अशा उत्पादनाशी भारतीय द्राक्षांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करावी लागते.
साडेबाराशे कोटींचा फटका
सटाणा भागातील दीड हजार हेक्टरपैकी ‘अर्ली’ द्राक्षांची ४० टक्क्यांपर्यंत काढणी झाली होती. उरलेल्या एक हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षांचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झाले. द्राक्षांचे मणी तडकले आहेत. एकरी ९ ते १० टन उत्पादन आणि किलोचा ८० ते १०० रुपये भाव गृहीत धरल्यास हे नुकसान २५० कोटींच्या पुढे पोचल्याचे दिसते. याशिवाय जिल्ह्यातील उर्वरित दीड लाख एकर क्षेत्रावरील द्राक्षबागांमधील २० टक्के नुकसान गळ आणि घडकूजमुळे एक हजार कोटींच्या पुढे पोचले आहे. गळ आणि घडकूज अजूनही सुरू आहे. शिवाय ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्याच्या किमान तापमानाचा पारा १५ अंश सेल्सिअसच्या पुढे असल्याने त्याचा फायदा द्राक्षांच्या उत्पादनासाठी होतो आहे. पण किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आणि ते कायम राहिल्यास त्याचा फटका द्राक्षांना बसणार आहे, अशीही माहिती श्री. भोसले यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.