पिंपळगाव बसवंत (नाशिक) : पिंपळगाव शहरात गेल्या सहा महिन्यापासनू चोरी, गुन्हेगारीचा आलेख वाढलेला होता. दर चार-आठ दिवसांनी अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेची तीन तेरा वाजत चालले होते. यामुळे पिंपळगाव पोलिसांची अब्रू वेशीला टांगली गेली होती. या विषयावर ‘सकाळ’ने २२ एप्रिलच्या अंकात पिंपळगावात जनतेच्या सुरक्षेचा येळकोट या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. हे वृत्त पोलिस प्रशासनाच्या जिव्हारी लागल्याने खडबडून जाग्या झालेल्या खाकी वर्दीने गुन्हेगारांना दणका दिला आहे. आठच दिवसात पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन संशयित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहे.
घरफोड्या, सोनसाखळी चोऱ्या, वाहनाच्या चोरी अशा घटनांनी पिंपळगाव शहरात चोरांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. चोरांनो या पिंपळगावात आपले स्वागत आहे, असा फलक लावण्याचेच फक्त शिल्लक होते. पोलिसांचे स्वारस्य चोरांना पकडण्यापेक्षा भलत्याच गोष्टीत असल्याचे चर्चा शहरभर होत्या.
अवैध ढाबे, दारू विक्री बोकाळली असून त्यातून होणाऱ्या कमाईत खाकी वर्दी अडकलेली होती. पिंपळगावकराचा जनक्षोभ व ‘सकाळ’ने ही चोरीच्या घटनांना दिलेल्या प्रसिध्दीनंतर पिंपळगाव पोलिस अधिकच टिकेचे धनी झाले होते. चोरट्यांनी घरफोडीची मालिकाच सुरू केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी शंका घेतली जात होती.
यावरून पिंपळगाव पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या 8 दिवसात पिंपळगाव पोलिसांनी 3 गुन्ह्यामधील संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. वाहने चोरी करणारा अंकुश खैरनार याला पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. पाठोपाठ भावाच्या खुनातील आरोपीचा छडा लावला. पोलिस ठाण्यासमोर सोनसाखळी ओरबाडणाऱ्या अविनाश केंदळे, सोनू पवार (रा. नायगाव, ता. सिन्नर) या दोघांनी केलेल्या चोरीचा छडा लावला. सुरेखा धोंडगे यांची साठ हजार रूपये किंमतीची सोनसाखळी सन्मानाने त्यांना परत केली.
श्रीमंतीची झालर लाभलेल्या पिंपळगावची सुरक्षितता अबाधित राखावी यासाठी पिंपळगाव पोलिसांनी अशीच दंबग भूमिका घ्यावी, असा सूर जनतेतून उमटत आहे. यानिमित्त पिंपळगाव पोलिस प्रशासन हे शाब्बासकीस पात्र ठरले आहे.
"वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपळगाव शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण होते. पिंपळगाव पोलिसांनी आठ दिवसात तीन गुन्ह्यातील संशयितांच्या मुसक्या आवळल्याने गुन्हेगारी वृत्तीला जरब बसणार आहे. कर्तव्य निभावणारे पोलिसांचे कौतुक आहे."
- उल्हास मोरे, ज्येष्ठ नागरिक.
"चोरी, गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांची करड नजर आहे. यापुढे रात्रीच्या वेळी शहरात गस्त वाढविली जाणार आहे. नागरिकांनीही बेफिकीर न राहता सहकार्य करावे. सदरक्षणाय, खलनिग्रहणाय...हे ब्रीदवाक्य पिंपळगाव पोलिस सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नशील आहेत."
- भाऊसाहेब पटारे, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.