पिंपळगाव बसवंत : शहराच्या विस्तारीकरणाने बुलेट ट्रेनचा वेग घेतला आहे. त्यामुळे झपाट्याने उपनगर विस्तारत असून, लोकसंख्या पाऊण लाख झाली. नागरिकांची तहान भागविण्यासाठी सध्या असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्याच घशाला कोरड पडली आहे.
नव्याने मंजूर झालेली जलजीवन योजना जून २०२४ मध्ये कार्यान्वित होऊन शहर ओलेचिंब होईल. तोपर्यंत नवीन नळकनेक्शनसाठी नागरिकांना चातक पक्ष्याप्रमाणे येणाऱ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागेल. (Pimpalgaon will become wet through Jal Jeevan Scheme Augmented Water Supply Scheme to be implemented in June 2024 nashik)
तत्कालीन सरपंच (कै.) नामदेवराव बनकर यांनी १९८३ मध्ये शहराची तृष्णा भागविण्यासाठी पालखेड धरणातून पाणीपुरवठा योजना राबविली. २००७ मध्ये आमदार दिलीप बनकर व सरपंच भास्करराव बनकर यांच्या प्रयत्नातून राबविली गेलेली वाढीव पाणीपुरवठा योजना पिंपळगावला वरदान ठरली.
१५ वर्षांत तब्बल २५ हजारांहून अधिक वाढ होत लोकसंख्या ७५ हजारांवर गेल्याने ती योजनाही तोकडी ठरत आहे. पाच हजार नळकनेक्शनची क्षमता असताना, सहा हजार ३१३ कनेक्शन दिले. त्याचा परिणाम नळकनेक्शनला कमी दाबाने पाणी येते.
तेही अवघे २० ते २५ मिनिटे पाणी येत आहे. आहे त्या नळकनेक्शनला पुरेसे पाणी नसल्याने नव्याने जोडण्या बंद करण्याचा निर्णय पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.
जलवाहिन्यांचे ८० टक्के काम पूर्ण
गेल्या वर्षी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पिंपळगाव शहरातील भविष्यातील २५ वर्षांची पाण्याची निकड पूर्ण करणारी जलजीवन मिशन अंतर्गत ३६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली.
त्या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले. पालखेड धरण ते पिंपळगावच्या जलशुद्धीकरण केद्रांच्या जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहर व उपनगरातील जलवाहिन्यांचे ८० टक्के काम पूर्ण झाले.
उंबरखेड रस्त्यावर नव्याने जलशुद्धीकरण केंद्र, तर घोडकेनगर, जोपूळ रोड, शिरसगाव रोड आदी पाच जलकुंभ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. जून २०२४ मध्ये ही योजना कार्यान्वित होईल.
दररोज दोन लाख लिटर अधिकचे पाणी पिंपळगाव शहरात उपलब्ध होणार आहे. त्यातून जुन्या नळकनेक्शनला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल; तर चार हजार नव्याने कनेक्शन देता येतील.
कामाची पाहणी
सरपंच भास्करराव बनकर, उपसरपंच किशोर मोरे, ग्रामपंचायत सदस्य केशव बनकर, विनायक खोडे, सत्यजित मोरे, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब अहिरे आदींनी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली.
"सध्या कार्यान्वित पाणीपुरवठा योजनेवरून शहरातील लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे नव्याने नळकनेक्शन देणे तूर्त स्थगित केले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने होण्यासाठी मी स्वत: लक्ष देत आहे. येत्या जूनमध्ये पिंपळगाव शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होईल."
- भास्करराव बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.