Nashik Parking Problem : पंचवटीतील रामतीर्थ, गोदाघाट परिसरात नेहमीच भाविकांची रेलचेल असते. अधिकमासाचा महिना असल्याने रामतीर्थावर प्रचंड गर्दी आहे.
त्यामुळे रामतीर्थ व गोदाघाट परिसरात पार्किंगचे महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी एकत्र येत नियोजन करणे, ही काळाची गरज आहे.
प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे पंचवटी होय. गोदाघाट परिसरातील रामतीर्थावर दररोज हजारोच्या संख्येने स्थानिक व भाविक येत असतात. रामतीर्थावर अनेक धार्मिक विधी करण्यासाठी भाविक देशभरातून येतात.
परंतु या ठिकाणी वाहन घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी महापालिकेच्या, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने या भागात वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे.
तसेच जगप्रसिद्ध कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. परंतु या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय नाही.
रामतीर्थ आणि कपालेश्वर मंदिरासमोरील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्किंग केल्या जात असल्याने त्या ठिकाणी‘नो पार्किंग’ फलकासमोरच दुचाकी पार्क केल्या जातात.
‘वाहतूक पोलिस’विषयी चर्चा
रामतीर्थावर पूर्वी वाहतूक पोलिस कार्यरत असायचा; मात्र वाहतूक सुरळीत करण्याऐवजी बाहेरगावच्या आलेल्या वाहनांवर कारवाई करत आपले कर्तव्य पार पाडत असे.
वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे पर्यटकांनी नाशिक पोलिसांबद्दल खंत व्यक्त केली होती. त्यामुळे की काय याठिकाणी वाहतूक पोलिस कार्यरत नसतो, अशी चर्चा आहे.
रिक्षा थांबा अधिकृत होणे आवश्यक
या भागात काळाराम मंदिर, सीतागुंफा, रामकुंड, तपोवन अशा ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन जवळपास ७० ते ८० रिक्षा थांबतात. परंतु या ठिकाणी अधिकृत असा रिक्षा थांबा प्रादेशिक परिवहन, महापालिका किंवा वाहतूक शाखेकडून देण्यात आलेला नाही.
त्यामुळे या अनधिकृत रिक्षा थांब्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. भाविकांना आपले वाहन लावण्यासाठी जागा मिळत नाही. रिक्षाचालक आणि पर्यटक यांच्यात वाद होतात. त्यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना सुरक्षित असे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न नाशिक पोलिसांना करावे लागणार आहे.
वाहतूक नियमांची पायमल्ली
रामकुंडाकडून मालेगाव स्टॅण्डच्या सिग्नलकडे जाण्यासाठी वाहनास प्रवेश बंदीचा फलकही लावण्यात आलेला आहे.
मात्र, या मार्गाने सर्रासपणे वाहतूक सुरू आहे. या मार्गाचा वापर पोलिस, महापालिका, तसेच शासकीय अधिकारी करत असल्याने सर्वसामान्य जनता त्यांचे अनुकरण करत असल्याचे बोलले जात आहे.
भाविकांची सर्रास लूट
पंचवटी परिसरातील कपालेश्वर, काळाराम मंदिर, सीतागुंफा, तपोवन, भक्तिधाम या धार्मिक स्थळांना भेटी देऊन परत गोदाघाटावर सोडण्यासाठी रिक्षाचालक पाचशे ते हजार रुपये आकारतात.
भाविकांसमोर दुसरा कोणताही मार्ग राहात नाही. त्यामुळे अनेकदा वादविवादाच्या आणि हाणामारीच्या घटना घडल्या आहे.
उपाययोजना करणे आवश्यक
-भाविकांसाठी महापालिकेने पार्किंगची व्यवस्था करून देणे गरजेचे आहे. महापालिकेच्या ज्या पार्किंग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग फी वसूल केली जात आहे.
- गोदाघाट परिसरात अधिकृत रिक्षा थांबे मंजूर करून त्या ठिकाणी एक मदत कक्ष उभारावा. या रिक्षा थांब्यांवर परिवहन विभागाने दर पत्रक लावावे जेणे करून पर्यटकांची लूट होणार नाही.
- रामतीर्थाकडून मालेगाव स्टँडकडे जाण्यासाठी इंद्रकुंडाकडील मार्गावर दुचाकीची पार्किंग व्यवस्था केल्यास रामकुंड परिसरातील रस्ता मोकळा श्वास घेईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.