सिन्नर (जि. नाशिक) : गावाला लाभलेली भली मोठी गायरान, गावठाण जमीन पडीक पडण्यापेक्षा किंवा त्यावर अतिक्रमणे होण्यापेक्षा त्यावर गट पद्धतीने झाडांची लागवड करत त्यांचे संरक्षण, संगोपन करून पर्यावरण संतुलनास हातभार लावण्याचा उपक्रम सिन्नर तालुक्यातील शहा ग्रामपंचायतीने राबवला आहे.
सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी पहिल्या टप्प्यात दहा हेक्टर क्षेत्रावर २५ हजार झाडांची लागवड करून त्यातील ९० टक्के म्हणजेच तब्बल २२ हजार ५०० झाडे जगवण्यात यश आले आहे. (Plantation of 25 thousand trees in 10 hectares area at sinnar nashik news)
शहा ग्रामपंचायतीच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच शुभांगी जाधव, त्यांचे पती लोकविकास मंचचे अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच संभाजी जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाला २०१९ ला ग्रामपंचायत मालकीचे पडीक असलेले गट नंबर ४५० वरील १० हेक्टर क्षेत्र प्रायोगिक तत्त्वावर गट वृक्ष लागवड शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.
जुलै २०१९ मध्ये पावसाळ्यात या जमिनीत २५ हजार रोपांची लागवड करण्यात आली. खड्डे न करता जेसीबीच्या साहाय्याने चर खोदून या झाडांची लागवड करण्यात आली होती. शेजारील एका बंधाऱ्यातील पाणी पंपाच्या साहाय्याने या झाडांना देण्यात आले.
संगोपनासाठी एका मजुराची नेमणूक करण्यात आली होती. तीन वर्षांत बहुसंख्य झाडे ३ ते ७ मीटर उंचीपर्यंत वाढली. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मे २०२२ मध्ये २२ हजार ५०० झाडे सुस्थितीत वाढ झाल्यावर सामाजिक वनीकरण विभागाने ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली.
नव्याने ४० हजार झाडांची लागवड
पडीक जागेचे वनीकरणात रूपांतर झाल्याने आणि परिसर हिरवाईने नटल्याने ग्रामपंचायतीने सामाजिक वनीकरणाचे वन परिक्षेत्र अधिकारी नीलेश पाटील यांच्या माध्यमातून आणखी १५ हेक्टर क्षेत्रावर गट वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला. या जागेत सुमारे ४० हजार झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे एरवी वेड्या बाभळीचे जंगल असलेला हा परिसर आता हिरवाईने नटला आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
फळझाडांची लागवड
बांबू, करंज, शिवण, अंजन, शिसू, कायजिलीया पिनाटा, कॅन्सरवर गुणकारी असलेल्या लक्ष्मीतरु या झाडांची लागवड करण्यात आली आहे. यातील बहुतेक झाडे जंगली असून कमी पाण्यात जलद वाढणारी आणि जास्त सावली देणारी आहेत.
या शिवाय जांभूळ, सीताफळ, आंबा, चिकू, आंबट चिंच, विलायती चिंच, बोर, शेवगा आदी विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. त्या माध्यमातून ग्रामपंचायतीला भविष्यात आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे.
पर्यटनाच्या दृष्टीतून विकास साधणार
"पडीक माळरान जमिनीवर वेड्या बाभळी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. या जागेचा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विकास करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडेल, त्या हेतूने विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. पर्यटन क्षेत्र म्हणून हा परिसर विकसित करण्याचा मानस आहे."-संभाजी जाधव, सरपंच, शहा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.