Nashik News : सर्वांगीण विकासाचा बिंदू : नाशिक शहर

नाशिकच्या विकासाला दिशा देण्यासाठी सक्षम नेतृत्व नसले, तरी सध्याची होणारी प्रगती ही नैसर्गिक पद्धतची आहे.
Nashik City
Nashik City esakal
Updated on

Nashik News : नाशिकच्या विकासाला दिशा देण्यासाठी सक्षम नेतृत्व नसले, तरी सध्याची होणारी प्रगती ही नैसर्गिक पद्धतची आहे. मुंबई, पुणे या शहरांच्या विकासाला मर्यादा आल्याने आता या दोन्ही शहरांच्या जवळचे शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाते. त्यामुळे पुढचा दहा ते पंधरा वर्षांचा काळ नाशिकच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरेल. विकासाला दिशा देण्यासाठी शहराचे सुयोग्य नियोजन होणेही गरजेचे आहे.

शहर श्रीमंत होत असताना सक्षमतेचा विसर पडता कामा नये. अन्यथा मुंबई, पुण्याप्रमाणे नाशिकची स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. औद्योगीकरण होत असताना क्लायमेट चेंज प्रोग्रामवर लक्ष दिले पाहिजे. स्वच्छ, सुंदर, हवेशीर ही नाशिकची ओळख पुसली गेल्यास बकालपणाचा शिक्का लागल्याशिवाय राहणार नाही.- विक्रांत मते, प्रिन्सिपल करस्पॉडंट, ‘सकाळ’, नाशिक

(Point of Comprehensive Development is City of Nashik news)

ना शिक शहर किंवा आजूबाजूचा भाग, तालुक्यांच्या विकासाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आतापर्यंत झालेला विकास हा नैसर्गिक पद्धतीनेच झाला, असेच म्हणावे लागेल. त्याला कारण म्हणजे नाशिकला मुंबई, पुण्याप्रमाणे नेतृत्व मिळाले नाही.

या दोन्ही महत्त्वाच्या शहरांप्रमाणे नेतृत्व मिळाले असते तर कदाचित सुवर्ण त्रिकोणाचा विकास कधीच साध्य झाला असता; परंतु तसे झाले नाही, हे नाशिककरांचे दुर्दैव म्हणावे लागेल. विशेष म्हणजे, या दुर्दैवाच्या चर्चा ज्यांना विकासासाठी पुढाकार घ्यायचा, त्यांच्याकडून रात्रीच्या पार्ट्यांमध्येच झडायच्या.

सकाळ झाल्यावर जो-तो आपल्या कामाला रवाना झाल्यावर विकास हा चर्चेपुरताच मर्यादित राहिला. असो... जुन्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्याला अर्थ नाही. ऑल वेज थिंग पॉझिटिव्ह म्हणून पुढे गेलेले बरे. मात्र, नाशिकचा आतापर्यंत विकासच झाला नाही, असेही म्हणता येणार नाही. मुद्दा एवढाच की राजकीय पाठबळ मिळाले असते तर कदाचित वेगाने प्रगती झाली असती; परंतु ती झाली नाही, एवढेच.

‘समृद्धी’ने वाढला वेग

नाशिकच्या विकासाला राजकीय पाठबळ मिळाले नाही, हे खरे आहे; परंतु आतापर्यंतचा विकास हा नैसर्गिक पद्धतीने झाला आहे. याचे उत्तम उदाहरण समृद्धी महामार्गानिमित्त समोर आले आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर अंतर कमी झाले. त्याप्रमाणे नाशिक-नागपूर अंतरही कमी झाले असून, ते पाच तासांवर आले आहे.

Nashik City
Nashik News : मेळा बसस्थानकाचे शनिवारी फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक-मुंबई अंतरही अवघ्या दोन तासांवर येईल. विदर्भाच्या कुठल्याही जिल्ह्यात जाण्यासाठी ‘समृद्धी’मार्गे जाणे सोपे झाले आहे. परंतु, ‘समृद्धी’चा सर्वाधिक फायदा नाशिकला होणार, हे निश्‍चित. ते असे ः मुंबईहून लोणावळा, खंडाळा या भागात वीकेंडला पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. पनवेल ओलांडताना दक्षिण मुंबईतील व्यक्तीला दोन तास लागतात. पुढे पनवेलपासून जेवढा वेळ लागेल तेवढा.

लोणावळा, खंडाळाप्रमाणेच नाशिकच्या इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वरचे वातावरण आहे. उलट त्र्यंबकेश्‍वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने धार्मिक पर्यटनालाही येथे संधी आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईचा क्राउड घोडबंदरमार्गे ठाणे व ठाण्याहून समृद्धी महामार्गावरून अवघ्या दोन तासांत इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर भागात पोहोचून वीकेंड साजरा करणार असल्याने पर्यटन, हॉस्पिटीलिटी, धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकचे महत्त्व वाढणार आहे.

ग्रीनफिल्ड महामार्ग गुजरातला जोडणार

‘समृद्धी’प्रमाणेच सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे भूसंपादन सध्या सुरू आहे. लवकरच हा महामार्ग आकाराला येईल. या महामार्गामुळे मुंबईप्रमाणेच सुरत शहर अवघ्या दोन तासांच्या अंतरावर येणार असल्याने समृद्धी व ग्रीनफिल्ड महामार्गांमुळे नाशिकला ‘अच्छे दिन’ येणार, यात शंका नाही.

महामार्गाचे जाळे निर्माण होणार असल्याने व व्यवसायाच्या संधी निर्माण होणार असल्याने आतापासूनच महामार्गालगत जागा घेऊन खासगी लॉजिस्टीक पार्क तयार होताना दिसत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयानेही नाशिकमध्ये लॉजिस्टीक पार्कसाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Nashik City
Nashik News : नाशिकमध्ये कारागृह उपमहानिरीक्षणालय कार्यालयाचे उद्या उद्‌घाटन

महामार्गांना जोडणारे रस्ते

समृद्धी महामार्गाला नाशिककरांना वेगाने जोडण्यासाठी गोंदे ते पिंप्री सदोपर्यंत ७५० कोटी रुपये खर्च करून २० किलोमीटरचा सिमेंट-काँक्रीटचा महामार्ग तयार केला जात आहे. पिंपळगाव बसवंत ते गोंदे या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व मुंबई महामार्गाचे विस्तारीकरण यामुळे नाशिकचा प्रवास वेगवान होताना दिसत आहे.

भविष्यात नाशिकच्या अंतर्गत वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून बाह्य वळण रस्ता महत्त्वाचा ठरेल. वाडीवऱ्हे व शहरात प्रवेश करताना महापालिका हद्दीला लागून बाह्यवळण रस्त्याचे काम सिंहस्थात हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे रस्ते कनेक्टिव्हीटी नाशिकच्या विकासाला बूस्टर डोस देणारी ठरेल.

विमाने दुरुस्तीचे भंडार

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने नुकताच एक करार केला असून, त्या करारांतर्गत डिसेंबर २०२४ पासून नाशिकच्या ‘एचएएल’मध्ये प्रवासी विमानांची देखभाल दुरुस्ती केली जाईल. परिणामी, नाशिकच्या अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस मिळेलच, त्याशिवाय प्रवासी विमान वाहतूक सेवेलाही बळ मिळणार आहे.

देशभरातील विमाने दुरुस्तीसाठी नाशिकला आल्यावर येथून देशांतर्गत विमानसेवा अधिक वेगाने सुरू होण्यास मदत होण्याबरोबरच संपूर्ण देशातील विमानतळांना जोडणारी एकमेव सेवा नाशिकच्या ओझर विमानतळावरून होण्यास मदत होणार आहे.

Nashik City
Nashik News : परवाना शुल्काच्या माध्यमातून उत्पन्नवाढ; वाणिज्य आस्थापनांकडून शुल्क आकारणीचा निर्णय

अन्न-प्रक्रिया उद्योगाचे माहेरघर

नाशिकमध्ये विकासाच्या क्षमता मोठ्या प्रमाणात आहेत. शेती विकासात जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. द्राक्ष, कांदा, ऊस, डाळिंब, स्ट्रॉबेरी या नगदी पिकांनी शेतीला बळ दिले. अर्ध्याहून अधिक जिल्हा येथील पाणीदार असल्याने बागायतदारांची संख्या येथे भरपूर आहे. सध्याचा काळ शेतीव्यतिरिक्त अन्नप्रक्रिया उद्योगांचा आहे.

नगदी पिकांबरोबरच मिरच्या, टोमॅटो, चिंच, फळभाज्यांचे नाशिक आगार आहे. त्यामुळे शेतीला फार मोठे भवितव्य नाशिकमध्ये आहे. शासनाने सन २०१९ च्या अंतिम अर्थसंकल्पात नाशिकमध्ये फूड प्रोसेसिंग युनिटची घोषणा केली; परंतु अद्यापही ती कागदावरच राहिली आहे. मात्र, या निमित्ताने नाशिकमध्ये अन्नप्रक्रिया उद्योगाचे भवितव्य शासनाच्या निर्णयाने अधोरेखित केले आहे.

नाशिक-पुणे महामार्ग, रेल्वेचा विस्तार

नाशिक-पुणे रेल्वेसाठी भूसंपादनाचे काम सध्या सुरू आहे. कामाची गती समाधानकारक नसली, तरी आता महारेल कंपनी या कामात फार पुढे गेली. केंद्र सरकारच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी जवळपास ५० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे घोषित करण्यात आले. त्यात नाशिक-पुणे रेल्वेचा समावेश आहे.

रेल्वेमार्ग सुरू झाल्यास नाशिक, सिन्नर, संगमनेर, राजगुरूनगर, चाकण, पुणे या औद्योगिक टापूचा विकास होईल. पुणे-नाशिक अंतर दोन तासांनी कमी होऊन तीन तासांवर येईल. त्याचप्रमाणे रस्तेमार्गाचे विस्तारीकरण हाती घेण्यात आले असून, महामार्गाचे रुंदीकरण झाल्यावर रस्तेमार्गाचे अंतरही कमी होणार आहे. रेल्वे व महामार्ग विस्तारीकरण झाल्यावर मुंबई- पुणे- नाशिक या सुवर्णत्रिकोणाचा विकास खऱ्या अर्थाने होईल.

Nashik City
Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसैनिकांशी साधला संवाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.