Nashik Ganesh Visarjan : शहराने गेली दोन दशके शांततेची कूस धरली आहे. अशातच गणेश विसर्जन व ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणूक एकाच दिवशी आल्याने अनेकांच्या पोटात गोळा उठला.
समाजकंटकांना संधी मिळू नये यासाठी मुस्लीम समाजातील मौलाना व धर्मगुरूंनी ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक २८ सप्टेंबरऐवजी २९ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यात स्वागत झाले. शांतता व एकात्मतेचे आणखी एक पाऊल उचलले गेले.
२७ सप्टेंबरला गणेश विसर्जनासाठी दुपारी लागलेला पोलिस बंदोबस्त २९ सप्टेंबरला दुपारी तीनला ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक व जुमाची नमाज पार पडल्यानंतर संपुष्टात आला. शहर व जिल्हा पोलिस प्रशासनाने ७२ तास अविरत परिश्रम घेतल्यानंतर त्यांना आराम व सावधानतेतून विश्राम मिळाला. (police administration work 72 hours for ganesh visarjan and eid nashik news)
शहराचा असंवेदनशीलतेचा शिक्का पुसून शांतता व विकासाकडे वाटचाल सुरू आहे. तरीदेखील लहान-मोठ्या अप्रिय घटनांमुळे धुसफुस सुरू असते. शहराकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून असते. येथील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकांची वेगळीच धूम असते.
विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी २७ सप्टेंबरलाच स्थानिक सातशेहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्हाभरातून बंदोबस्तासाठी आलेला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सज्ज झाला. सकाळीच नियंत्रण कक्ष आवारात बंदोबस्तासाठी आलेल्यांची नोंद झाली. एरव्ही विसर्जनाच्या पूर्वसंध्येला होणारे सशस्त्र संचलन दुपारीच झाले.
२७ सप्टेंबरला दुपारी एकपासूनच पोलिस प्रशासन सावधान झाले. संचलनानंतर चौका-चौकात बंदोबस्त तैनात झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहनेही सातत्याने गस्त घालत होती. तत्पूर्वी गेली पंधरा दिवस जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती व सहकाऱ्यांनी स्थानिक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मध्यवर्ती गणेशोत्सव समिती, ईद-ए-मिलादुन्नबी कमिटी यांच्याशी बैठकी व संवादातून सौहार्दाचे वातावरण निर्माण केले होते. श्री. उमाप यांनी अनेक मोठ्या गणेश मंडळांना थेट भेटी देत आरतीत सहभाग घेतला होता. जिल्हाभरातून अवैध धंद्यांना चाप लावल्याने समाजकंटक गर्दी व उत्सवाची संधी साधून गालबोट लावतील या हेतूने पोलिस दक्ष व सज्ज होते.
गणेश विसर्जनाची २८ सप्टेंबरला सकाळपासूनच धामधूम सुरू झाली. मिरवणूक मार्गाचे नियोजन, बॅरीकेटींग, चौक, गणेश कुंड, संवेदनशील भागात बंदोबस्त तैनातच होता. पहाटे चारपर्यंत विसर्जन पार पडले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरी जाऊन तासाभराची विश्रांती व आंघोळीची संधी मिळते न मिळते तोच २९ सप्टेंबरला पहाटे सहालाच ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीचा बंदोबस्त सुरू झाला. दुपारी पाऊणेदोनला ही मिरवणूक संपली. येथे जुम्माच्या नमाजचे मोठे महत्त्व असते. प्रत्येक मशिदीत एक ते दोन हजार नमाजी नमाज पठणाला येतात. गुळबाजार भागातील जुमा मशिदीत सुमारे पाच ते दहा हजार नमाजी
येतात. ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक संपताच दुपारी दीड ते तीन दरम्यान शहरातील विविध भागातील मशिदीतील जुम्माची नमाज आटोपल्यानंतरच पोलिस बंदोबस्त संपुष्टात आला. २७ सप्टेंबर दुपारी दोन ते २९ सप्टेंबर दुपारी तीन असे ७२ तास पोलिस प्रशासनाने जागते रहोची भूमिका घेत डोळ्यात तेल घालून कामकाज केले. शहरात एकही अनुचित प्रकार घडला नाही. अथवा विसर्जनच्या वेळीही कुठलीही दुर्घटना घडली नाही. चोख नियोजन व अविरत परिश्रमामुळे हे शक्य झाले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.