येवला (जि.नाशिक) : साहेब घरी पेशंट आहे, मेडिकलमध्ये चाललोय.., हे बघा हातात पिशवी आहे, किराणा-भाजीपाला आणायला चाललोय, पेट्रोल टाकण्यासाठीही बाहेर पडू नको का..! असे असंख्य काही बनावट, तर काही सयुक्तिक उत्तरे देत नागरिक बिनधास्तपणे शहरात मुक्तसंचार करत असल्याने कलम १४४ कुठे आहे, असा प्रश्न पडला आहे.
‘इकडे चाललो... तिकडे चाललो’
वाढत्या कोरोनाची साखळी खंडित व्हावी, यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदी लागू झाली आहे. मात्र, येथे नागरिकांचा मुक्तसंचार दिसून येतोय. दुचाकीवर तसेच पायी फिरणारे शहरातील विविध रस्त्यांवर तसेच गल्लीबोळात दिसतात. संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर बंदी असतानाही वेगवेगळी कारणे देत घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले. भाजी मंडई, किराणा, मेडिकल, दवाखाना या अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने ‘इकडे चाललो... तिकडे चाललो’ अशी सबब सांगून मोकळे होत होते. गंभीर म्हणजे शहरातील शनिपटांगणात भरणाऱ्या भाजी बाजारात रोजच गर्दी होत असल्याने बाजार विभागण्याचीही मागणी केली जात आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. १६) येथे महसूल, पोलिस व पालिका प्रशासनाने एकत्रित येत विंचूर चौफुलीवर जोरदार मोहीम राबवत कारवाई केली. दोन दिवसांत ५० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
प्रशासनाचा कारवाईचा धडाका
वयोवृद्ध नागरिक, प्रतिकारशक्ती कमी असलेले नागरिक, लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची जास्त लक्षणे आहेत. त्या नागरिकांनी अतिशय काळजी घेणे आवश्यक असतानादेखील नागरिक बाहेर पडत आहेत. रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली, मॉर्निंग वॉक, देवदर्शन, भाजी मंडई, किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. पोलिस जाब विचारतात. मात्र, महत्त्वाचे काम आहे, असे सांगून नागरिक निघून जातात. कलम १४४ लागू असताना मनसोक्तपणे नागरिक फिरत असल्याचे लक्षात येताच गुरुवार व शुक्रवारी येथील विंचूर चौफुलीवर प्रशासनाने कारवाईचा धडाका धरला.
पोलिसांचा दंडाचा दणका
विनाकारण फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, शहर पोलिस निरीक्षक संदीप कोळी, नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज चव्हाण आदींनी कारवाईची मोहीम राबविली. प्रत्येक दुचाकीचालकाला कारणांची विचारणा करण्यात आली. अनावश्यकपणे फिरत असल्याचे लक्षात येताच दंडात्मक कारवाईही केली. कारवाईचा दणका रोजच सुरू ठेवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जीव धोक्यात घालून बाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक वस्तू घराजवळील दुकानातून खरेदी कराव्यात. भाजी खरेदीसाठी रोजच फिरू नये. कारणांशिवाय बाहेर पडू नये. असे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. -सोपान कासार, प्रांताधिकारी, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.