Nashik MD Drug Case : नाशिक रोड हद्दीतील शिंदे गाव औद्योगिक वसाहतीत अमलीपदार्थ एमडी ड्रग्ज बनविणारे दोन अड्डे मुंबई पोलिसांपाठोपाठ नाशिक रोड पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत. मात्र, जागामालकांकडून भाडेतत्त्वावर ज्यांनी जागा भाड्याने घेतली, तो संशयित कांबळे नामक व्यक्ती अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
दोन्ही कारखान्यांसाठीच्या जागा या कांबळे यानेच भाड्याने घेतल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहे. या कांबळेचा तथाकथित मुख्य सूत्रधार भूषण पानपाटील याच्याशी संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिक रोडच्या शिंदे गावात ठाण मांडून गेल्या गुरुवारी (ता. ५) श्री गणेशाय इंडस्ट्रीज या कारखान्यावर छापा टाकून ३०० कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. (police in search of kamble in md drug case nashik crime)
त्याच रात्री अमलीपदार्थविरोधी पथकाने वडाळागावात कारवाई करीत ५४ ग्रॅम एमडी ड्रग्ससह दोघांना अटक केली होती. शनिवारी (ता. ७) नाशिक रोड पोलिसांनी शिंदे गावामध्येच आणखी एका कारखान्यावर छापा टाकला असता, सुमारे सहा कोटींचा पाच किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला.
शिंदे गावातील दोन्ही कारवाईमध्ये ज्या दोन कारखान्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे, ती जागा संशयित कांबळे नामक व्यक्तीने भाड्याने घेतल्याचे समोर येत आहे. परंतु संशयित कांबळे हा नेमका कोण, कुठला याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळू शकलेली नाही. या कांबळेचा संपर्क या गुन्ह्यातील सूत्रधार भूषण पानपाटील याच्याशी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. परंतु अद्याप ठोस अशी कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
कांबळेच्या अटकेनंतरच एमडी ड्रग्जचा पुरवठा आणि त्याची विक्री याबाबतची उकल होऊ शकणार आहे. त्यामुळे पोलिसांची विविध पथके संशयित कांबळेचा शोध घेत आहेत.
तपास गुन्हे शाखेकडे
गुन्ह्याची व्याप्ती पाहता शिंदे गावातील एमडी ड्रग्ज गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल असून, सध्या तपास पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिस करीत आहेत. परंतु गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी तो शहर गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार आहे.
"ड्रग्ज प्रकरणी द्याप ठोस असे काही हाती लागलेले नाही. कांबळे यास अटक केल्यानंतर अनेक माहिती मिळू शकेल. त्यामुळे सध्या त्याचा पोलिस शोध घेत आहेत." - मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.