नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या पथकांसह पोलिस ठाण्यांच्या पथकाने अवैध सुरू असलेल्या नऊ देशी दारूच्या गुत्त्यांविरोधात कारवाई करीत सुमारे ९० हजारांचा देशी- विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे मात्र दणाणले आहे.
एकलहरे रोडवरील भाजीपाला मार्केटच्या गेटजवळच अवैध मद्याची विक्री होत असल्याची खबर मिळाली असता, शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने छापा टाकत संशयित सन्नी राजेंद्र जाधव (२७, रा. सिन्नर फाटा, नाशिक रोड) यास अटक केली.
बुधवारी (ता. ११) दुपारी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ४ हजार ५५० रुपयांचा संत्रा देशी दारूच्या ६५ बाटल्या जप्त केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (Police raids on illegal country liquor hard Liquor stocks worth 90 thousand seized Nashik News)
तसेच, सातपूर परिसरातील केवल पार्क येथील हॉटेल संतोषच्या मागे आडोशाला अवैधरीत्या मद्याची विक्री केली जात असल्याची खबर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, बुधवारी छापा टाकून १४ हजार ६५ रुपयांच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या.
याप्रकरणी संशयित रमेश उत्तमराव चाटे (४६, रा. सातपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटीतील वज्रेश्वर झोपडपट्टीतही अवैधरीत्या देशी दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळताच, पंचवटी पोलिसांनी बुधवारी रात्री लामखेडा मळ्यालगत सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकला.
यावेळी पोलिसांनी १ हजार ६१० रुपयांचा बाटल्या जप्त करीत, संशयित सविता नीलेश शेवरे (३२, रा. वज्रेश्वरी झोपडपट्टी, पंचवटी) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाणेगाव रोडवरील शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैधरीत्या देशीदारुची विक्री सुरू असताना, देवळाली कॅम्प पोलिसांनी छापा टाकून ९१० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
गणेश त्र्यंबक शिंदे (३३, रा. कारखानारोड, नाणेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर, लॅम रोडवरील महालक्ष्मी रोडवर शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री अड्ड्यावर देवळाली कॅम्प पोलिसांनी छापा मारून ९८० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. संशयित पंकज एकनाथ आडके (३९, रा. लॅम रोड) याच्याविरुद्ध देवळाली कॅम्प परिसरात गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक रोड पोलिसांनी जेल रोडच्या मोरे चौकातील भंगाराच्या दुकानाच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री अड्ड्यावर छापा टाकून १२६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी संशयित गणेश बाळासाहेब (३५, रा. बालाजीनगर, मोरे मळा, जेलरोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवडी बनात शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने छापा टाकून दुचाकीसह गावठी दारू असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी आडगाव पोलिसात संशयित अर्जुन गमुलाल चव्हाण (३२, रा. पंचवटी), महावीर अरुण कौलकर (४७, रा. वाल्मीकनगर, पंचवटी), बेवडा बाबा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर, नाशिक रोड पोलिसांनी नाणेगाव चौफुली व नासाकाजवळ छापा टाकून देशी दारूचा साठा जप्त केला. ३१५० रुपयांचा साठा जप्त करून सागर ज्ञानेश्वर घुगे (२९, रा. मांगीरबाबा मंदिर, कोटमगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर, नाशिक साखर कारखान्याजवळच्या पत्र्यांच्या शेडच्या आडोशाला अवैधरीत्या देशी दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकून ३४३० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात संशयित संदीप पंडित गायधनी (४०, रा. पळसे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.