Nashik News : परिस्थिती, समाज, प्रशासन किंवा इतर कुठल्याही गोष्टींना दोष देण्यापेक्षा कष्टाने स्वतःचे विश्व उभारण्याची तयारी ठेवा. जागतिक स्तरावर नोकरी, व्यवसायाची मिळालेली संधी निःसंकोच स्वीकारा व नेहमी महत्त्वाकांक्षी राहताना आयुष्यात नावलौकिक मिळवा.
आपल्याला अपयश येईल, अशी चिंता कधीही करू नका. (Prataprao Pawar statement of Develop decision making skills in students nashik news)
आपले निर्णयच आपले आयुष्य घडवत असल्याने निर्णक्षमता विकसित करण्याचा सल्ला ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शनिवारी (ता. १०) विद्यार्थ्यांना दिला. शहरातील के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर, विभागप्रमुख डॉ. एस. एस. साने, सचिव डॉ. के. एस. बंदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, की करिअर घडविताना एखाद्या गोष्टीची माहिती नसेल, तर त्यासंबंधी ज्ञान आत्मसात केले पाहिजे. कष्ट करण्याची तयारी ठेवायला हवी. जबाबदारी स्वीकारल्यावर ती पार पाडायची, असा दृढनिश्चय करत वाटचाल केली तर हमखास यशस्वी होता येते. एखादी गोष्ट साध्य केल्यावर तेवढ्यावर समाधान न मानता, वाटचाल करत राहावी. नेहमीच नवनवीन गोष्टी शिकताना स्वतःला अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. तंत्रशिक्षणासोबतच औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षणक्रम संस्थेतर्फे उपलब्ध करून दिले आहेत. २१ हजार विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत असून, सोळाशेहून अधिक कर्मचारीवृंद कार्यरत आहेत. माजी विद्यार्थ्यांची संख्या ७० हजारांहून अधिक आहे.
संस्था, तसेच महाविद्यालयातर्फे उपलब्ध सुविधांचा आढावा त्यांनी घेतला. प्रा. डॉ. स्वाती पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. पी. जी. पवार यांनी आभार मानले. विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या कार्यशाळेला भेट देत विद्यार्थ्यांकडून साकारल्या जात असलेल्या प्रकल्पांची माहिती श्री. पवार यांनी जाणून घेतली. विद्यार्थी बनवत असलेल्या कार, बाइक तसेच थ्रीडी प्रीटिंगचे युनिट, एआयसीटीई आयडिया लॅब येथे भेट देताना त्यांनी मार्गदर्शनही केले.
आराम नको, अनुभवावर भर द्या
महाविद्यालयीन जीवनात शक्य तितके कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. वेळ नसल्याचे कारण न देता आयुष्यात प्राधान्यक्रम निश्चित करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः सुटीत आराम, मौजमजा, मनोरंजन करण्यापेक्षा प्रात्यक्षिकांवर आधारित अनुभव घेण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
अनुभवी लोकांशी चर्चा फायद्याची
प्रत्येक अपयशातून माणूस विचार करायला शिकतो. आपल्याला येत नसलेली गोष्ट आपल्यापेक्षा अनुभवी लोकांशी चर्चा करून समजून घ्यावी. आपल्या आयुष्याशी निगडित निर्णय घेण्याची जबाबदारी इतरांवर न टाकता, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. आयुष्यात आव्हाने नसतील, तर प्रगती साधता करता येणार नाही, हे नेहमी लक्षात घ्यावे, असे श्री. पवार यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी साधला संवाद
अपयश कसे पचवावे, स्टार्टअप उभारताना येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी, इथंपासून निरंतरपणे चांगली कामगिरी करायची असेल, तर काय करायला हवे, असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना श्री. पवार यांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.