National Youth Festival Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या मुख्य मैदानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. ११) पाहणी केली. उद्घाटनाची तयारी पूर्ण झाली असून, देशभरातील साडेसात हजार खेळाडूही शहरात दाखल झाल्याने पंचवटीत सर्वत्र महोत्सवाची वातावरणनिर्मिती झाली आहे.
तपोवनातील साधुग्रामच्या मैदानावर २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी (ता. १२) सकाळी दहाला होत आहे. (Preparations for National Youth Festival are complete in nashik news)
त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने या मैदानाचा बंदोबस्त सांभाळला आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवानिमित्त देशभरातील युवक-युवती नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी मैदानाची पाहणी करत सरावही केला. मुख्य सोहळ्यानिमित्त उद्घाटनस्थळी सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात येतील. देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी युवक आपल्या कलाकृती सादर करतील.
साधारणतः दोन तास चालणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यानिमित्त राष्ट्रीयस्तरावरील नेत्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये येतील. त्यांच्या स्वागताच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. या वेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तपोवनासही भेट
पंतप्रधान काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी जाणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी काळाराम मंदिरासह रामकुंड परिसराची पाहणी केली. पंतप्रधानांच्या हस्ते गोदाआरती करण्याचा मानस असला तरी त्याला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी न मिळण्याची शक्यता वाटते.
सांघिक भावनेने नटले शहर
राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्ताने शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावट केली आहे. मुख्य रस्त्याच्या दुभाजकांना रंगरंगोटी करून सुशोभित केले जात आहे. पंचवटीतील रस्तेही चकाचक झाले आहेत. युवा महोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी सांघिक भावना निर्माण करणारे झेंडे, डोम उभारण्यात आल्याने शहराच्या सुंदरतेत भर पडली आहे.
...असा असेल युवा महोत्सव
- शुक्रवार (ता. १२) उद्घाटनाचा मुख्य सोहळा - तपोवन
- शनिवार (ता. १३) ते सोमवार (ता. १५)
- यंग आर्टिस्ट कॅम्प, पोस्टर मेकिंग : उदोजी महाराज म्युझियम, गंगापूर रोड
- सांघिक लोकनृत्य आणि वैयक्तिक लोकनृत्य : कालिदास कलामंदिर, नाशिक
- फोटोग्राफी स्पर्धा : कालिदास कलामंदिर
- घोषणा आणि थिमॅटिक सादरीकरण : कालिदास कलामंदिर
- सांघिक व वैयक्तिक लोकगीत : रावसाहेब थोरात हॉल, गंगापूर रोड
- सुविचार, युवा संमेलन, सांस्कृतिक, युवा कृती, महाराष्ट्र यूथ एक्स्पो, फूड फेस्टिव्हल : ठक्कर डोम मैदान
- साहसी उपक्रम : अंजनेरी, ठक्कर डोम, केटीएचएम बोटक्लब, चामरलेनी
- मंगळवार (ता. १६) समारोप : विभागीय क्रीडासंकुल, पंचवटी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.