झोडगे : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आर. डी. निकम यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून तरीही शासनाने दखल न घेतल्याने श्री. निकम यांनी जोपर्यत मागणी मान्य होत नाही तोपर्यत उपोषण कायम राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान जुन्या पेन्शनसाठी सुरू असलेल्या या उपोषणाची चर्चा राज्यभर असून पाठिंबा वाढत आहे. दरम्यान उपोषण थांबविण्यासाठी अधिकारी दबाव आणत असल्याचेही निकम यांनी सांगितले.
जुनी पेन्शनच्या बेमुदत उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला असून शासनाने अजूनही दखल घेतली नाही. स्थानिक पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपली मागणी शासनाकडे आहे, त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाहीत.
मात्र उपोषण मागे घेण्यासाठी प्रशासकीय अधिकारी दबाव आणत आहे. उपोषणाबाबत शासन उदासीन असल्याने राज्यभरातील कर्मचारी संतप्त भावना व्यक्त करत आहेत.
२२ जानेवारीस महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, गोविंद उगलेसह सर्व राज्य पदाधिकारी, तमाम पेन्शन फायटर आर. डी. यांच्या समर्थनार्थ नाशिक येथे येणार आहेत.
राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने १९८२/८४ ची जुनी पेन्शन योजना जशी आहे, तशी लागू करावी या मागणीसाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. डी. निकम यांचे हे बेमुदत उपोषण १५ जानेवारीपासून सुरू आहे.
येन कडाक्याच्या थंडीत अन्नत्याग करून निकम रात्रंदिवस नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ बसून आहेत. राज्यभरातील शेकडो कर्मचारी त्यांना भेटण्यासाठी गर्दी करत आहेत.
नाशिक जिल्ह्यासह जळगाव, मुंबई, धुळे येथील कर्मचारी भेटून पाठिंबा नोंदवत आहेत. जुनी पेन्शन संघटनेचे आरोग्य विभागाचे राज्य प्रमुख संजय सोनार यांनी अगोदर निकम यांची भेट घेतली असून उपोषणाबाबत पुढील चर्चा करून गेले.
पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्यसचिव गोविंद उगलेस निकम यांच्या संपर्कात असून राज्य पातळीवर उपोषणासाठी कर्मचारी हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक नेते गोरख कुनगर, त्र्यंबक मार्कड, विजय बडे दररोज सकाळ संध्याकाळ भेटून उपोषणस्थळी निकम यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत.
येत्या सोमवारी राज्यभरातील कर्मचारी नाशिक येथे निकम यांचे मनोबल वाढवण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी जमणार आहेत. आतापर्यंत अनेक शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांचा पाठिंबा पत्र निकम यांना प्राप्त झाले.
मुंबईची राज्यबैठक नाशिक येथे
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने, जुनी पेन्शन लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी मुंबई येथे २१ जानेवारीला राज्यस्तरीय बैठक बोलविली होती.
मात्र आर. डी. निकम यांच्या बेमुदत उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सर्व राज्य पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांनी मुंबईऐवजी ही बैठक नाशिक येथे घेण्याची विनंती केल्याने संघटनेची राज्यस्तरीय बैठक नाशिक येथे २२ जानेवारीस दुपारी तीनला होणार आहे.
संघटनेच्या पुढील भूमिकेबाबत चर्चा करणे या उद्देशाला अनुसरून ही बैठक ठेवण्यात आल्याचे राज्यसचिव गोविंद उगले यांनी सांगितले आहे.
"बेमुदत उपोषणाची तीव्रता वाढत आहे. महाराष्ट्रभरातील सर्वच खात्यातील कर्मचाऱ्यांचा नाशिककडे येण्याचा ओघ वाढला आहे. विशेष करून महिला कर्मचारी येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहेत, तब्बेतीची काळजी घ्या असे सांगत आहेत. पेन्शन मिळेल पण आम्हाला तुमच्यासारखी माणसे मिळणार नाहीत असे कर्मचारी सांगत आहेत."
- आर. डी. निकम, उपोषणकर्ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.