नाशिक : देशात २००८ पासून सुरू असलेल्या ई-पासपोर्ट छपाईचा (E Passport Printing) मार्ग खुला झाला आहे. नाशिक रोडला प्रतिभूती मुद्रणालयात (Securities Press) पुढील तीन वर्षांत सुमारे तीन कोटी ६४ लाख ई-पासपोर्ट छापले जाणार आहेत. त्यासाठी अंतिम मान्यतेचे पत्र महामंडळाकडून मुद्रणालय प्रशासनाला प्राप्त झाल्याने यासंदर्भात लवकरच निविदा निघणार आहे. (Printing of 3 crore 64 lakh E Passports in 3 years nashik latest Marathi news)
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी (ता. १२) सुमारे साडेतीन कोटी ई-पासपोर्टच्या छपाईसाठी येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयाला पत्र देत ई-पासपोर्ट छपाईची मागणी नोंदविली. त्यात पहिल्या वर्षी ७० लाख ई-पासपोर्टच्या छपाईची मागणी नोंदविली.
त्यानंतर दुसऱ्या वर्षी एक कोटी ४० लाख, तर तिसऱ्या वर्षी एक कोटी ५४ लाख याप्रमाणे तीन वर्षांत तीन कोटी ६४ लाख पासपोर्ट छपाईचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे सौमित्र मंडल यांनी दिलेल्या पत्राद्वारे प्रेसकडे मागणी नोंदविली आहे.
१४ वर्षांचा पाठपुरावा
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या चलन व नाणे निधी विभागातर्फे २००७-०८ पासून देशात एटीएम कार्डाप्रमाणे चीप असलेल्या ई-पासपोर्ट छपाईचे नियोजन सुरू आहे. आनंदराव आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस मजदूर संघाचे तत्कालीन सरचिटणीस रामभाऊ जगताप व त्यांच्या मजदूर संघाच्या सहकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू झाले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात नाशिक रोड मुद्रणालयात ई-पासपोर्टसाठी स्वतंत्र लाइन टाकली जाऊन त्यासाठी यंत्रसामग्री आली.
पासपोर्टमध्ये वापरला जाणारा ‘इन ले़ चीप’ आयात धोरणावर केंद्रीय स्तरावर मंथन झाले. तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या कारकीर्दीत २५ जून २००८ ला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना चाचणी सॅम्पल पासपोर्ट वितरित झाले.
बन्सल पेलणार शिवधनुष्य
कालांतराने महाव्यवस्थापक सुधीर साहू यांच्या कारकीर्दीत तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज, अर्थ राज्यमंत्री अर्जुनराव मेघवाल, खासदार हेमंत गोडसे, सरचिटणीस जगदीश गोडसे, स्टाफ युनियनचे सरचिटणीस अभिजित आहेर आदींच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडील पाठपुराव्यानंतर मंगळवारी (ता. १२) अंतिम मान्यतेची मोहर उमटली.
त्यानंतर आता देवास येथे कामाचा ठसा उमटवलेले सध्याचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल आणि विद्यमान मजदूर संघाच्या मार्गदर्शनाखाली हे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.
तीन ठेकेदारांची तयारी
नाशिकच्या प्रतिभूती मुद्रणालयाकडून ई-पासपोर्टमध्ये वापरण्यात येणाऱ्या ई-चिप्सच्या तीन मंजूर पुरवठादारांशी संपर्क साधला आहे. निविदा अंतिम झाल्यानंतर वर्क ऑडर मिळालेल्या तारखेपासून चार महिन्यांपासून ई-पासपोर्टची निर्मिती सुरू होऊ शकेल.
त्यानुसार नाशिक रोडला प्रतिभूती मुद्रणालयात पहिल्या वर्षी ७० लाख, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षासाठी अनुक्रमे १४० लाख आणि १५४ लाख ई-पासपोर्ट छपाईचे उद्दिष्ट दिले जाणार आहे.
सुरक्षेसाठी महत्त्व
ई-पासपोर्टमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या सुरक्षेच्या अंगाने महत्त्व आहे. एटीएम आणि मोबाईल यांच्यात चीपच्या धर्तीवर पासपोर्टमध्ये ‘इन ले चीप’ असल्याने एका क्लिकवर कुठेही प्रवाशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. तसेच संशयास्पद प्रवाशांचे ट्रॅकिंग करणे त्यामुळे सोयीचे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.