नाशिक शहरात ग्रीन ट्रान्स्पोर्टला चालना

नगरसेवक दिनकर पाटील यांच्या कार्याचे फडणवीस यांच्याकडून कौतुक
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

नाशिक : भक्ती, सेवा भावी वृत्तीतून उभारलेल्या प्रकल्पांमध्ये तळमळ दिसून येते. असे प्रकल्प अविस्मरणीय ठरतात. दिनकर पाटील यांनी याच भावनेतून उभारलेले प्रकल्प अविस्मरणीय ठरणार असून कानेटकर उद्यान हे उत्तम उदाहरण आहे. शहरे वाढत असताना उद्याने ऑक्सिजन पार्क झाली पाहिजे. सतरा एकर जागेतील उद्यान प्रभागासाठी फुफ्फुसे ठरतील, असे गौरवोद्‌गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. निर्मल नाशिक संकल्पनेला चालना देण्यासाठी ग्रीन ट्रान्स्पोर्ट यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रभाग नऊचे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हॉस्पिटल, सतरा एकर जागेत (स्व.) वसंत कानेटकर उद्यान, राजमाता जिजाऊ महिला योगा हॉल, रस्ते डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन व ड्रेनेज कामांचे लोकार्पण व उद्‌घाटन सोहळा सातपूरच्या ध्रुवनगर मधील स्वातंत्र्यवीर सावरकर हॉस्पिटल येथे झाला. या वेळी उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, भाजप प्रभारी आमदार जयकुमार रावल, आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, उपमहापौर भिकूबाई बागूल, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सातपूर मंडळ अध्यक्ष भगवान काकड, नगरसेवक रवींद्र देवरे, नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव, रामहरी संभेराव, संजय राऊत आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, महापालिकेच्या मोकळ्या जागांवर खासगी बांधकामे होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडतात, परंतु लोकांसाठी जागा विकसित करून नगरसेवक पाटील यांनी आदर्श निर्माण केला आहे. वसंतराव कानेटकर उद्यान उभे करून नाशिककरांना ऑक्सिजन पुरवणारी फुफ्फुसेच दिली असून या विकासकामांना दिलेल्या नावामुळे समाज समाजात भक्ती सेवा, राष्ट्र गौरव जागा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाची ओळख करून दिली. १७६ देशांत योगाचा प्रचार होत आहे. त्याच धर्तीवर हे योगा हॉल निश्चितच नागरिकांच्या स्वास्थ्याचे रक्षण करील. दिनकर पाटील यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. नाशिकला भाजपची सत्ता येणार ती आली तर निर्मळ नाशिक तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिनकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. तीन महिन्यापूर्वी वीस एकर भूखंडावर कष्टकरी कामगारांच्या मुलांसाठी शाळेचे उद्‌घाटन केल्याचे अधोरेखित केले. शहरात भाजपने केलेल्या विकासकामांच्या आधारावर येत्या निवडणुकीत शंभर प्लस नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. पाहुण्यांचे स्वागत भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल पाटील व माजी नगरसेविका लता पाटील यांनी केले. आभार अमोल पाटील यांनी मानले.

महापालिकेत भाजपचीच सत्ता

शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहे. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, दिवाबत्ती बरोबरच आयटी पार्क साकारणारी नाशिक महापालिका राज्यात पहिली ठरली आहे. त्यामुळे विकासकामांच्या जोरावर महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. आरोग्य केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या हस्ते ध्रुवनगर येथील पाच एकर जागेतील (स्वा.) विनायक दामोदर सावरकर रुग्णालयाचे उद्‌घाटन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.