Nashik News : गंगा, हरिद्वार या पवित्र नद्यांवर होणाऱ्या महाआरतीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरीची नियमित आरती व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अद्यापही यश येताना दिसतं नाही.
आज, उद्यावर चालढकल होणारा आरतीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळघात पडला आहे. सिंहस्थाच्या पूर्वी तरी महाआरतीचा पायंडा पडावा अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करत आहे.
गंगा नदी स्वच्छ करण्याबरोबरचं भाविकांना दररोज सामूहिक प्रार्थनेसाठी दररोज सकाळ-सायंकाळ महाआरतीचा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला. (proposal is of government court of godavari river Maha Aarti nashik news)
जसे गंगेचे महत्त्व तसेच महत्त्व दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरीचे आहे. त्यामुळे गोदावरी नदीवर देखील महाआरती उपक्रम सुरू करावा अशी मागणी पुढे आली. सिंहस्थ कालावधीत दररोज आरती होते, परंतु त्या आरतीचे स्वरूप छोटे आहे.
भाविकांसाठी नियमित गोदावरी आरतीची मागणी तान संघटनेतर्फे करण्यात आली. त्यापूर्वी महापालिकेने नियमित आरतीचा निर्णय घेतला. मनसेच्या सत्ताकाळात आरती सुरू झाली. परंतु त्यात सातत्य राहिले नाही. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल व तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आरती सुरू झाली. पर्यटन विभागामार्फत तीस लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली परंतु त्या आरतीमध्येही सातत्य राहिले नाही.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत देखील एक आरती सुरू झाली, त्या आरतीलाही सातत्य राहिले नाही. राज्य शासनाने महाआरतीसाठी पाच कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव वर्षभरापूर्वी तयार केला, मात्र अद्यापही शासन दरबारी महाआरतीचा प्रस्ताव धूळखात पडला आहे. त्यावरील धूळ झटकली जावी अशी अपेक्षा नाशिककरांची आहे.
नाशिकच्या ब्रॅण्डींगसाठी...
पुरोहित संघातर्फे रोज सायंकाळी गोदावरीची आरती होते. तिचे स्वरूप अतिशय लहान आणि धार्मिक विधी एवढेच आहे. भारतात ऋषिकेश व वाराणसी येथे गंगेच्या आरतीला महाआरती असे संबोधले जाते. या दोन्ही शहरांना धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. हिमालयात गंगोत्रीला उगम पावलेल्या गंगेचा पृथ्वीवरचा पहिला स्पर्श ऋषिकेशला होतो.
त्यामुळे येथील अथांग, विस्तारित व नजर जाईल तिथे गंगाच दिसते. बॅरेज बांधून तिच्या अवखळ पाण्याला वळविण्यात आले. वाराणसीहून गंगा हिंदी महासागराकडे पूर्वेकडे कोलकत्याकडे प्रवाही होते. असेच महत्त्व गोदावरी पंचवटीत दक्षिणवाहिनी होत असल्याने आहे. त्यामुळे येथे महाआरती महत्त्वाची आहे.
नाशिकच्या धार्मिक पर्यटनात ब्रॅन्डिंग होण्यासाठी यापूर्वी अनेक उपक्रम झाले. सीतागुंफा येथील वडाची पाच झाडे पूर्वी नाशिकच्या प्रचारासाठी लोगो म्हणून वापरली जात होती. त्याचे संकल्पचित्र पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाली तेव्हा त्या गाडीच्या डब्यांवर होते. त्यात नाशिकचा धार्मिक, औद्योगिक प्रचार-प्रसार व्हावा हा हेतू होता. काळाच्या ओघात पंचवटीवरील तो लोगो गायब झाला. नाशिकचे ब्रॅन्डिंग म्हणून गांधी ज्योत आणि नारोशंकराची घंटा अनेक चित्रांमध्ये वापरला गेला.
गोदा आरतीच्या निमित्ताने नाशिकचे ब्रॅण्डींग होण्यासाठी महाआरती उपक्रमाची संकल्पना पुढे आली. सध्या स्वामी समर्थ केंद्राच्या संप्रदायातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेला एक लाख दिवे लावून गोदावरीची आरती होते. काही संस्था वर्षा अखेरीस दिवे लावतात.
सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदावरी आरतीचा उपक्रम सुरू झाला होता. परंतु सातत्य राहिले नाही. त्यानंतर गोदा महाआरतीच्या उपक्रमाची चर्चा झाली व आरतीला सरकारी अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न झाले. त्या प्रयत्नांना अद्यापही यश मिळताना दिसतं नाही.
असा आहे प्रस्ताव
देशातील सात पवित्र नद्यांपैकी गंगा गोदावरी एक असून, उत्तर प्रदेशातील गंगा व हरिद्वार येथील महाआरतीच्या पार्श्वभूमीवर रामकुंडावर महाआरती व्हावी, असे नियोजन आहे.
आरतीचे पात्र, साउंड सिस्टिम, उभे राहण्यासाठी स्टॅन्ड, मूव्हेबल बॅरिकेड्स पुरविणे, आरतीच्या ठिकाणी फुलांची सजावट, गोदा आरतीदरम्यान संगीत सामग्रीची व्यवस्था, अकरा पुजाऱ्यांना मानधन, बॅरिकेड्स, रामकुंडाच्या दोन्ही बाजूंना भाविकांना उभे राहण्यासाठी प्लॅटफॉर्म, नियमित पूजेत सहभागी होणाऱ्या पुजाऱ्यांना ड्रेसकोड, देणगी देणाऱ्यांना पूजेचा मान, देणगीचा हिशेब ठेवण्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते, रोज सायंकाळी आरती.
"राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्याचे फलित म्हणून गोदावरी महाआरतीचा प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. अंतिम मान्यतेसाठी श्री. फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच प्रस्ताव मंजूर करून गोदावरी महाआरती नियमित सुरू होईल." - अॅड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.
"गोदावरी महाआरतीसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. आरतीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे." - प्रा. देवयानी फरांदे, आमदार, मध्य नाशिक.
"गोदावरी आरती संदर्भात नियमित पाठपुरावा सुरू असून लवकरचं प्रस्ताव मंजूर होईल. गोदावरी संदर्भात तीन हजार निबंध संकलित झाले असून साठ हजार विद्यार्थ्यांपर्यंत समिती पोहोचली आहे." - जयंत गायधनी, अध्यक्ष, रामतिर्थ गोदा सेवा समिती.
"रामतिर्थ गोदावरी सेवा समितीला शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांचे पत्र दिले आहे. गोदावरी आरती संदर्भात काम सुरू आहे." - प्रफुल्ल संचेती, विश्वस्त, रामतिर्थ गोदा सेवा समिती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.