Nashik Police : पोलीस म्हटलं की फक्त गुन्हेगारी घटनांचा तपास करणारा, खोळंबलेली वाहतूक सुरळीत करणारा, गुन्हेगारांना वठणीवर आणणारा तर कधी खाकीचा धाक दाखवणारा असाच नजरेसमोर येतो.
परंतु, अन्यायाने पीडिताचे संरक्षण करण्याबरोबरच ‘रक्तदाना’च्या माध्यमातून सामाजिक आरोग्याला हातभार लावताना सामाजिक बांधिलकीही ‘पोलीस’ जपत आहेत. ऐकून नवल वाटेल परंतु खरे आहे.
नाशिकमध्ये असलेल्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात प्रशिक्षणासाठी येणाऱ्या पोलिसांनी ‘रक्तदाना’चा जणू वसाच घेतला आहे. ज्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणार्या रुग्णांना जीवदानच मिळते आहे. (protection also Blood donation social commitment also maintained by nashik police)
महाराष्ट्र पोलीस दलाअंतर्गत नाशिक येथे गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय (डीटीएस) फेब्रुवारी १९८१ पासून सुरू करण्यात आलेले आहे.
या प्रशिक्षण विद्यालयात महाराष्ट्रातील पोलीस दलातील पोलीस शिपाई, हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षकांना अद्ययावत शास्त्रोक्त गुन्हयांचा तपासासंबंधीत प्रशिक्षण दिले जाते.
या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात प्रत्येक महिन्यात दोन प्रशिक्षण सत्र घेतले जातात. दोन आठवड्यांच्या एका प्रशिक्षण सत्रामध्ये सुमारे १८० पोलीस कर्मचारी सहभागी होत असतात.
गेल्या वर्षभरात घेण्यात आलेल्या प्रत्येक सत्रासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिर घेण्याची संकल्पना या प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य तथा पोलीस उपायुक्त अशोक नखाते यांची होती.
त्यानुसार, गेल्या वर्षभरामध्ये १२०० पोलीस कर्मचार्यांनी रक्तदान केले आहे. रक्तदानासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रत्येक महिन्यातून दोनवेळा रक्तदान शिबिर याठिकाणी घेतले जाते.
यामुळे जिल्हा रुग्णालयास सर्वाधिक रक्तपुरवठा करणारी संस्था म्हणून नाशिक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे नाव अग्रस्थानी आहे.
४२ वर्षांतील उच्चांक
नाशिक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाची स्थापना १९८१ मध्ये झाली आहे. गेल्या ४१ वर्षात याठिकाणी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातून अवघ्या ६०० जणांनी रक्तदान केल्याची नोंद होती.
मात्र, प्राचार्य अशोक नखाते यांच्या संकल्पनेतून गेल्या ऑगस्ट २०२२ ते ऑगस्ट २०२३ या वर्षभरात नियमितपणे महिन्यातून दोन वेळा रक्तदान शिबिर घेण्यात येऊन तब्बल १२०० जणांनी रक्तदान केले आहे, जे गेल्या ४२ वर्षांतील उच्चांक नव्हे तर विक्रमच आहे. रक्तसंघटक म्हणून या संस्थेची आरोग्य विभागात नोंद झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असाही होतो लाभ
रक्तदानाचे अनेक शारीरिक फायदे असले तरी बहुतांशी रक्तदान करण्यास अनुत्सुक असतात. प्राचार्य अशोक नखाते प्रत्येक सत्रात रक्तदानाचे महत्त्व विशद केल्याने अनेकजण रक्तदान करतात.
या रक्तदान शिबिरामुळे अनेकांची आरोग्याची तपासणीही होऊन जाते. यातून हिमोग्लोबिन (रक्ताची मात्रा), रक्तदाब, शुगर यासह विविध व्याधींची माहितीही मिळते. या शिबिरात रक्तदान केल्याने अनेकांना त्याचा लाभच झाला आहे.
सिव्हिललाच रक्तदान
जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून गोरगरिब रुग्ण दाखल होतात. विशेषत: प्रसुतिसाठी येणार्या आदिवासी गरोदरमाता आणि सिकलसेलच्या विद्यार्थ्यांसह शस्त्रक्रियेसाठी मोठ्याप्रमाणात रक्ताची आवश्यकता असते.
ही बाब हेरून नाशिक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँकेकडून नियमित शिबिर घेत रक्त संकलित केले जाते. जिल्ह्यातील सर्वाधिक रक्तदान करणारी संस्था म्हणून या संस्थेची नोंद झाली आहे.
"रक्तदान केल्याचे अनेक शारीरिक फायदे असतात. हे प्रत्येक सत्रातील प्रशिक्षणार्थींना सांगितले जाते. त्यातून इच्छुक प्रशिक्षणार्थी रक्तदान करतात. मी स्वत: आत्तापर्यंत किमान २० वेळा रक्तदान केले आहे. ही संकल्पना संस्थेमार्फत अविरहित सुरू राहील."
"गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात महिन्यातून दोन वेळा रक्तदान शिबिर होते. एकूण प्रशिक्षणार्थींपैकी किमान ७० टक्के रक्तदान करतात. प्रारंभी प्रशिक्षणावेळी रक्तदानाबाबत माहिती दिल्यानंतर शंका व गैरसमज दूर होतात. जिल्हा रुग्णालयासाठी सर्वाधिक रक्तसंकलन असणारे हे सर्वात मोठी संस्था आहे. ज्यामुळे जिल्हा रुग्णालयास मोठा आधार मिळतो आहे."
- डॉ. अहिल्या धडस, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय ब्लड बँक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.