नाशिक : दीड वर्षांपासून गाजत असलेल्या मायको सर्कल व सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपूल रद्द केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात दोन्ही पुलांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Provision in NMC Budget despite cancellation of both flyovers nashik news)
मायको सर्कल येथील उड्डाणपुलासाठी १३२ कोटी ६८ लाख रुपये, तर त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलासाठी १२३ कोटी ५४ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. दोन्ही कामे एकाच कंत्राटदाराला देण्यात आली.
त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलासाठी कार्यारंभ आदेशदेखील दिले. उड्डाणपूल तयार करण्यासाठी वाहतूक सर्वेक्षण आवश्यक असते, ते झाले नाही. तसेच, विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविण्याचा आरोप झाला.
सिमेंटच्या दर्जाची प्रतवारी वाढविण्याच्या नावाखाली ४४ कोटी रुपये एवढी किमतीत वाढ करण्यात आली. स्टार रेट लावून दर वाढविणे यामुळे उड्डाणपुलाचे काम वादात सापडले. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश दिले व तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनीदेखील मायको सर्कल येथील उड्डाणपूल मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला.
सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाची गरज तपासण्यासाठी आयआयटी पवईला ट्रॅफिक सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. आयआयटी पवईने जुलै २०२२ मध्ये उड्डाणपुलाची आवश्यकता नसल्याचा अहवाल दिला.
त्यानुसार उड्डाणपूल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारी २०२३ मध्ये संबंधित ठेकेदार कंपनीने बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करून नवीन तंत्रज्ञानानुसार दोन्ही पूल दर्जेदार करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार काम करण्याचीदेखील तयारी दाखवली. परंतु वादात अडकण्याची भूमिका प्रशासनाकडून घेतली गेली नाही.
मात्र, २०२३ व २४ व्या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना मायको सर्कल येथील उड्डाणपुलासाठी चार कोटी ७५ लाख, तर त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
"मायको सर्कल व त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपूल रद्द करण्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मायको सर्कल उड्डाणपुलासाठी वर्कऑर्डर दिले नव्हते. त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलासाठी मात्र ऑर्डर होती. पुलाचे काम अद्याप रद्द झालेले नाही. अंदाजपत्रकात नाममात्र तरतूद करण्यात आली आहे."- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.