Nashik Fraud Crime : मौजे तळेगावातील (ता. दिंडोरी) कुळ कायद्याची शेतजमीन खरेदी करताना नाशिकमधील संशयिताने स्वत:चा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून शेतीचा बनावट सातबारा जोडून शेतजमीन खरेदी केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, २००४ मधील सदरचा व्यवहार असला, तरी त्याबाबत अलीकडेच तक्रार आली.
संबंधित तलाठ्याने ऑनलाइन सातबारा तपासला असता सदरील बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत शेतकरी असल्याचा बनावट सातबारा पुरावा म्हणून देणाऱ्या संशयिताविरोधात फसवणुकीसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
नरेश बाबूलाल शहा (रा. शिव सोसायटी, झंकार हॉटेलसमोर, गंजमाळ, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. मौजे तळेगावचे तलाठी शरद सांडूगीर गोसावी (रा. नवीन आडगाव नाका, नाशिक) यांनी या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत फिर्याद दिली. (Purchase of agricultural land by adding fake Satbara by suspect as proof that he is farmer nashik fraud crime news)
दिंडोरी तालुक्यातील तळेगाव, पिंपळनारे या गावांसाठी तलाठी म्हणून गोसावी यांची नियुक्ती आहे. जुलै २०२३ मध्ये त्यांच्याकडे मौजे तळेगावातील दीड एकर जमिनीच्या झालेल्या व्यवहारासंदर्भात कागदपत्रे तपासणीसाठी अरुण त्र्यंबक विधाते यांच्यामार्फत तक्रार अर्जान्वये आले होते.
मौजे तळेगावातील दीड एकर कुळकायद्यातील शेतजमीन संशयित नरेश शहा याने २००४ मध्ये खरेदी केली आहे. सदरील व्यवहारात दोन्ही पक्षकार हे शेतकरी असणे आवश्यक होते. त्यासंदर्भातील दस्तावेज संशयित शहा याने खरेदीवेळी दुय्यम उपनिबंधक कार्यालयाकडे नोंदणीसाठी दिले. त्यानंतर विधाते यांच्याकडून खरेदीखत करून सदरील जमीन संशयित शहा याने खरेदी केली.
सदरचा व्यवहार करीत असताना संशयित शहा याने जे दस्तावेज दिले, त्यात शेतकरी असण्याचा सिद्ध करणारा शेतीचा सातबारा दिला, तोच बनावट असल्याचे तलाठी गोसावी यांनी केलेल्या तपासणीत समोर आले आहे. यासंदर्भात तक्रार अर्ज दिंडोरी पोलिसांनाही देण्यात आला असता त्यांच्याही तपासात तीच बाब समोर आली.
यामुळे संशयित शहा याने बनावट दस्तावेज सादर करीत शासनाचीही फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक निरीक्षक विकास ढोकरे तपास करीत आहेत.
ऑनलाइनमुळे उकल
२००४ मध्ये महसूल विभागाची कोणत्याही दस्ताची माहिती मिळण्याची कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया नव्हती. मात्र, अलीकडे कोणत्याही ठिकाणचा सातबारा ऑनलाइन पाहता येतो. जुलै २०२३ मध्ये तक्रारदार विधाते यांनी तक्रार केली असता तलाठी गोसावी यांनी व्यवहारातील शहा याच्या दस्ताची तपासणी केली. त्यात शहा याचा शेतकरी असल्याचा सातबारा पुरावा जोडला होता.
सातबारा बाळद बुद्रुक (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील होता. त्या गावातील ४६७/२/२ असा गट असलेल्या शेतीचा सातबारा शहाने सादर केला होता. प्रत्यक्षात बाळद गावात या क्रमांकाचा गटच अस्तित्वात नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदरचा सातबारा बनावट व त्यावर तहसीलदारांसह संबंधितांचे सही-शिक्केही बनावट असल्याचे समोर आले. हीच बाब दिंडोरी पोलिसांनीही तपासली. त्याबाबत पाचोरा तहसीलदारांकडून आलेल्या अहवालातही शहा याचा सातबारा बनावट असल्याचेच सिद्ध झाले आहे.
"मौजे तळेगावातील दीड एकर जागेच्या व्यवहारात संशयित नरेश शहा याने त्याचा शेतकरी असल्याचा पुराव्यासाठी दिलेला सातबारा बनावट आहे. तसा अहवालच पाचोरा तहसील विभागाने दिला. शहा याने यासाठी बनावट सही-शिक्के वापरले असून, यातून त्याने अनेक ठिकाणी अशा रीतीने व्यवहार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही." - शरद गोसावी, तलाठी, मौजे तळेगाव (ता. दिंडोरी)
"या गुन्ह्यातील संशयित शहा याने सादर केलेला सातबारा हा पुरावाच बनावट असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या २० वर्षांत त्याने असे आणखीही कृत्य केल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस तपासातून या बाबी समोर येतील." - विकास ढोकरे, सहाय्यक निरीक्षक, दिंडोरी पोलिस ठाणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.