नाशिक : दसरा सणाचे औचित्य साधत बुधवारी (ता. ५) ग्राहकांनी विविध स्वरूपाची खरेदी केली. मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, महात्मा गांधी मार्ग परिसरासह विविध बाजारपेठांच्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी झाली होती. वाहन खरेदीचाही योग साधला गेल्याने ऑटोमोबाईलक्षेत्रात मोठी उलाढाल झाली. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने खरेदीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य संचारले होते. ग्राहकांचा संभाव्य प्रतिसाद लक्षात घेता व्यावसायिक, कंपन्यांच्या दालनाची आकर्षक सजावट केली होती.
बुधवारी सकाळपासूनच ग्राहकांनी बाजारपेठेकडे आपली पावले वळविताना जोरदार खरेदी केली. प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहन, यासह सोने खरेदीचा समावेश होता. शहरातील विविध मॉल्स तसेच कॉर्पोरेट कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या दालनांमध्येही ग्राहकांची गर्दी बघायला मिळाली. यातून सायंकाळी उशिरापर्यंत खरेदीची लगबग सुरू राहिली. (Purchases from customers on occasion of Dussehra 2022 Latest Marathi News)
झेंडूच्या फुलांनी खाल्ला भाव
आवक घटलेली असल्याने झेंडूच्या फुलांना यंदा चांगला दर मिळाला. किरकोळ बाजारपेठेत १०० ते १२० रुपये शेकडा या दराने फुलांची विक्री सुरू होती. तर, क्रेटला २५० रुपयांपर्यंत भाव मिळाला. बुधवारी दुपारी उशिरापर्यंत फुलांची खरेदी सुरू राहिली. अनेकांनी तयार हार खरेदीला पसंती दिली. ३० रुपयांपासून, तर हजार रुपयांपर्यंतचे हार विक्रीसाठी उपलब्ध होते. फूल विक्रीतून सुमारे ३० ते ४० लाख रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रात 200 कोटींची उलाढाल
अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी दसऱ्याचा सण सकारात्मक राहिला. ग्राहकांकडून आगाऊ बुकिंग करताना दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यात आली. कंपन्यांच्या दालनांमध्ये औक्षण करण्यासाठी पूजेचे ताट, पेढे, नारळ उपलब्ध करून दिले जात होते. तसेच ढोल-ताशांचा गजर करताना ग्राहकांना वाहनाची चावी सूपूर्द केली जात होती. ऑटोमोबाईलक्षेत्रात सुमारे दोनशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये प्रामुख्याने सुसज्ज अशा चारचाकी वाहनांच्या खरेदीचा मोठा वाटा राहिला, तर दुचाकी वाहनांचीही जोरदार खरेदी बघायला मिळाली. दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रिकल वाहनांना ग्राहकांची पसंती लाभल्याचे बघायला मिळाले.
लॅपटॉप, स्मार्टफोनला मागणी
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेतही तेजी बघायला मिळाली. महात्मा गांधी मार्गावरील मोबाईल विक्रेते व इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ कायम राहिली. प्रामुख्याने स्मार्टफोन, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज यांसह होम अप्लायंसेस, वॉशिंग मशिनची खरेदी करण्यात आली. या क्षेत्रात सुमारे शंभर कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी शून्य टक्के व्याजदर, ई-कॉमर्सवरील दरांमध्ये वस्तूंची विक्रीसह अन्य विविध योजना उपलब्ध करून दिलेल्या होत्या.
मिठाईची कोटीच्या घरात उलाढाल
दसऱ्याच्या सणाचा गोडवा वाढविण्यासाठी नाशिककरांनी जोरदार मिठाई खरेदी केली. पक्का पेढा व मिठाईचे अन्य विविध प्रकार खरेदी करण्यात आले. ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता, व्यावसायिकांनी आगाऊ तयारी करून ठेवलेली होती. त्यानुसार वाढीव मागणीनुसार मिठाई विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. या क्षेत्रात सुमारे एक कोटी रुपयांच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
"कोरोना महामारीनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना, सणउत्सवात यंदाच्या दसऱ्याला सर्वाधिक बुकिंग होत्या. ग्राहकांच्या मागणीनुसार सणाच्या दिवशी वाहनाची डिलिव्हरी देण्यात आली. सेमिकंडक्टरच्या तुटवड्यामुळे वाहनांचा प्रतीक्षा कालावधी एक वर्षापर्यंत वाढलेला होता. परंतु आता परिस्थितीत सुधारणा होताना प्रतीक्षा कालावधी कमी होतो आहे. आगामी दिवाळीतही चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे."
-ईश्वर बोरगावकर, टीम लीडर, किया मोटर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.