परिस्थितीला नमवत पुष्पाताईंचा भांडेविक्रीचा प्रवास पोहोचला शोरुममध्ये

Pushpatais Small utensils bussiness turned into Showroom Success story
Pushpatais Small utensils bussiness turned into Showroom Success story esakal
Updated on

वेळ जरी वाईट असली तरी काळ मात्र वाईट नसतो. कष्टाची तयारी, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर परिस्थिती कशीही असली तरी तिला बदलण्याची ताकद आपल्यात आहे, या सकारात्मक विचारांची वाट भक्कम करत रस्त्यावर बसून भांडेविक्री करत यशाला गवसणी घालत आज प्रशस्त शोरुमच्या मालकीणबाई बनल्या त्या लासलगावच्या पुष्पाताई वाकचौरे...

आयुष्यात आलेल्या प्रसंगांतून खचून न जाता त्यावर मात करत पुष्पाताई यांनी खेचून आणलेलं यश नक्कीच प्रेरणादायी आहे. पुष्पाताई बाळासाहेब वाकचौरे... वय ५८... शिक्षण फक्त दहावी... माहेर निफाड तालुक्यातील कसबेसुकेणे येथील तर सासर लासलगावचे... वडील बाबूराव एकनाथ पाटील यांचे पत्नी, पाच बहिणी व एक भाऊ असा परिवार... परिस्थिती फारशी चांगली नाही... शेती हाच मुख्य आधार असल्याने पुष्पाबाई यांनाही पुढचे शिक्षण इच्छा असूनही घेता आले नाही. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावरच सोडून पुष्पाताईंचा विवाह झाला. सासरी बाळासाहेब वाकचौरे यांचीही परिस्थिती जेमतेम... पती बाळासाहेब यांचे शिक्षण वाणिज्य शाखेतील पदवीधर... त्या काळात ते कारखान्यावर हंगामी कामगार म्हणून नोकरी करत होते. मात्र कुटुंबाने मजुरी करत दिनक्रम सुरू ठेवला होता. वाकचौरे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी सर्वांसोबतच पुष्पाताईंचेही प्रयत्न सुरू होते.

Pushpatais Small utensils bussiness turned into Showroom Success story
यश नक्की काय असते..!

काहीतरी करण्याची जिद्द पती- पत्नीमध्ये होती. मात्र परिस्थितीमुळे सर्व प्रयत्न अपुरे पडत होते. पुष्पाताईंच्या जिद्दीची जाणीव असल्याने त्यांचे वडील बाबूराव पाटील आणि मेहुण्यांनी मदतीचा हात देत व्यवसाय सुरू करण्यासाठी सरसावले. बाळासाहेब आणि पुष्पाताई यांनी थेट येवला तालुक्यातील पाटोदा गाठले. पाच हजार रुपयांच्या भांडवलावर गावात भांडेविक्रीचा व्यवसाय सुरू केला. ग्रामीण भाग आणि त्यातच दुष्काळी परिस्थिती...जेमतेम भांडवलावर उभा राहिलेला भांडेविक्रीचा व्यवसाय पुढे नेत असताना अनेक अडचणींना तोंड दिले. मात्र परिस्थिती कधीही बसून राहत नाही, या विचारांतून पुष्पाताई खचल्या नाहीत. दुकान टाकल्यानंतर आठ दिवसांनी १५० रुपयांची भांडी विकली गेली. येथूनच पुष्पाताईंचा प्रवास सुरू झाला. याच काळात मुलगा स्वराज आणि धनंजय यांच्यानिमित्ताने वाकचौरे कुटुंबाचा विस्तार चौकोनी झाला.

Pushpatais Small utensils bussiness turned into Showroom Success story
स्वाभिमानी लढा...!

परिस्थितीलाच दिले आव्हान...

दोन मुलांची जबाबदारी आणि पती बाळासाहेब यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पुष्पाताईंनी आपल्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेतली. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ या उक्तीप्रमाणे आपल्या प्रयत्नांनी त्यांनी पंचक्रोशीत महिलांमध्ये आपली ओळख उभी केली. यामुळेच त्या गुरुदत्त स्टील सेंटरच्या माध्यमातून परिवारासाठी मोठा आधार बनल्या. दुकानाकडेच लक्ष देताना त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होवू दिले नाही. मुलगा स्वराज यांनी पदवीपर्यंतचे तर धनंजय यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात मुलांचा व्यवसायाकडे असलेला कल पाहून वाकचौरे कुटुंबाने मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मदत करत मुलांना पिकअप व्हॅन खरेदी करून दिली.

Pushpatais Small utensils bussiness turned into Showroom Success story
यश : सकारात्मक दृष्टिकोन

या काळात कुटुंबाला अनेक अडचणींना सामना करावा लागला. प्रसंगी घरात एक वेळ खायची भ्रांत असल्याने भेळ खाऊन कुटुंबाने दिवस काढले. पाच वर्षे भांडेविक्री करत असतानाच लासलगाव परिसरातील बाजारपेठेची गरज लक्षात घेता लासलगावमध्ये प्रशस्त साई कलेक्शन या नावाने कपड्यांचे शोरूम उभे केले. पती बाळासाहेब यांचे पाठबळ, मुले स्वराज आणि धनंजय तसेच सुना मनीषाताई व शुभांगी यांची मिळालेली साथ यामुळे पुष्पाताई यांनी आज येवला आणि निफाड तालुक्यात आपली यशस्वी उद्योजिका म्हणून उभी केलेली ओळख नक्कीच आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच दाखवून दिलंय. माहेरच्या मंडळींनी दिलेल्या जेमतेम पाच हजारांच्या तुटपुंज्या भांडवलावर भांडेविक्रीतून सुरू झालेला पुष्पाताईंचा प्रवास आज प्रशस्त शोरूममध्ये येऊन ठाकलाय. याशिवाय वाकचौरे कुटुंबाने

पाटोदा येथे फर्निचरचे दुकान तसेच आंबेगाव येथे मंगल कार्यालय उभे करतानाच बांधकाम व्यवसायातही आपली ओळख लासलगाव शहरात उभी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.