जुने नाशिक : धुमाळ पॉइंट ते नेहरू चौकापर्यंत स्मार्टसिटींतर्गत (Smart City) करण्यात आलेल्या कामाची पावसाने (He avy Rains) चांगलीच पोलखोल केली. बुधवारी(ता. २२) झालेल्या पावसाचे पाणी धुमाळ पॉइंट ते नेहरू चौक येथील परिसरात मोठ्या प्रमाणावर साचल्याने नवीन स्मार्टसिटींतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यास तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे खरेदीसाठी आलेले नागरिक आणि दुकानदारांना मोठा मानस्ताप सहन करावा लागला. (quality deficiency of smart city works open in first rain Nashik Monsoon news)
दर वर्षी पावसाळ्यात विविध भागांतील पाणी धुमाळ पॉइंट येथून दहीपूल आणि सराफ बाजार परिसरात वाहून येते. शिवाय त्या ठिकाणी साचलेले पाणी यामुळे दहीपुलासह सराफ बाजार परिसरास नदीचे स्वरूप येते. दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरून व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते. असे प्रकार थांबविण्यासाठी स्मार्टसिटींतर्गत या ठिकाणी पाइपलाइन टाकून नवीन रस्त्याची कामे करण्यात आली. यामुळे भविष्यात पाणी साचणार नाही किंवा व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही असे वाटत होते; परंतु बुधवारी झालेल्या पावसाने कामांचे पितळ उघडे पाडले. संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते.
दुकानांमध्येदेखील पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले. रस्त्यावरील उभी असलेली वाहने पाण्याखाली गेली. अनेकांना वाहने ओढून बाहेर काढावी लागली. व्यावसायिकांचा पाण्यास मार्ग मोकळा करून देण्याचा खटाटोप सुरू होता. नियोजनशून्य कामे असल्याने परिसरातील व्यावसायिक तसेच नागरिकांना आजही पावसामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर स्मार्टसिटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी नवीन चेंबर तयार करणे तसेच तयार चेंबरवर लोखंडी जाळी टाकण्याचे आश्वासन दिले होते, जेणेकरून पावसाचे पाणी साचणार नाही.
पाऊस थांबला आणि कर्मचाऱ्यांची त्या कामांकडे पाठ फिरली. त्यामुळे पुन्हा एकदा बुधवारी झालेल्या पावसाने परिसरास नदीचे स्वरूप आले. पावसाळ्याचे दिवस आहेत. सतत पाऊस सुरू राहिल्यास येथील दुकानांमध्ये तसेच परिसरात पाणी साचण्याचे प्रकार दैनंदिन घडतील. त्यामुळे मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागेल, अशा प्रतिक्रिया परिसरातील व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. सध्याच्या परिस्थितीतून स्मार्टसिटीच्या अधिकारी, अभियंता यांनी बोध घ्यावा. पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याचे कायमस्वरूपी नियोजन करण्याची मागणी व्यावसायिक तसेच नागरिकांनी केली. दूध बाजार परिसरातदेखील पावसाच्या पाण्याने वाहने वाहून जाण्याचे प्रकार घडले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.