Nashik Rain Crisis : तालुक्याच्या पूर्व भागात देवपूर, फरदापूर, वडांगळी, मेंढी, धारणगाव, पंचाळे, धनगरवाडी आदी परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले. दुष्काळसदृश परिस्थिती पाहता शासनाने त्वरित जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, पंचायत समितीचे सदस्य विजय गडाख, गोवर्धन रानडे, ज्ञानेश्वर गडाख, सुखदेव गडाख, दिनेश गडाख, महाळू खोले यांच्यासह मेंढी, धारणगाव, वावी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे. (rain Crisis in Sinnar taluka Demand to start fodder depot in eastern area Nashik)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आता अधिक महिना संपण्याच्या मार्गावर असून, १७ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. असे असताना पावसाचा या भागात पत्ताच नाही.
त्यामुळे या भागात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचा धीर खचला असून, सर्वसामान्य जनताही हवालदिल झाली आहे.
परिसरात पावसाने दडी मारल्याने सहा महिन्यांपासून शेतकरी आणि पशुपालक टंचाईग्रस्त परिस्थितीचा सामना करीत आहेत. जनावरांचा चारा, पाणी व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत.
हा परिसर कायमच दुष्काळग्रस्त भाग असल्याने पशुधनाला चारा नाही, तसेच शाश्वत पाण्याची सोय नाही.
पशुपालक हवालदिल झाले असून, या भागात शेतीच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अशी मागणी सरपंच जयश्री गिते, उपसरपंच योगेश पाटील-गिते, सुरेश गिते, अनिल गिते, किशोर गिते, सागर गिते, सोमनाथ गिते, नितीन गिते, प्रवीण गिते व शेतकऱ्यांनी केली आहे.
पाण्याचे सर्व स्रोत कोरडेठाक
पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम पूर्ण धोक्यात आला असून, परिसरातील विहिरी, ओढे, नाले, कूपनलिका कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. दुष्काळाने त्रस्त झालेल्या या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कधी दुष्काळ, तर कधी ओला पावसाळा
‘मला कळतंय तसं मह्या आयुष्यातले दुष्काळाचे चार साल की पाहिले नाईत. गावात पावसाने दडी मारल्याने दोन महिन्याअगुदर पेरायपुरता पाऊस झाला. पुढं टीपकाबी पडला नाही. पेरलेले सारे जळून जातय का, असं झालंय.
पिकांना बाहेरून टॅंकरने पाणी भरले. शिवारात फक्त सुकलेले पीक दिसू लागले आहे,’ अशी व्यथा सत्तरी ओलांडलेले काळू पाटील-साळवे यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या ठळक मागण्या
- चारा छावण्या किंवा चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे
- संपूर्ण कर्जमाफी करावी. सर्व कर्जांची वसुली तातडीने थांबवावी
- कृषी संजीवनी योजनेतून पूर्ण वीजबिल माफी मिळावी
- वाया गेलेले बियाणे व खतांचे पैसे मिळावेत
- विद्यार्थ्यांची फी माफ करावी
- रोजगार हमीची कामे प्रत्येक गावात तातडीने सुरू करावीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.