नाशिक : श्रीलंकन (srilankan onion) सरकारने आयात शुल्क लागू केल्याने भारतीय कांद्याची निर्यात थांबली आहे. पाकिस्तानमधील (pakistan) पंजाब प्रांतातील नवीन कांद्याची आवक या महिन्याच्या अखेरीपासून सुरवात होईल. अशातच, राजस्थानमधून पुढील महिन्यात बाजारात येणाऱ्या कांद्याचे पावसाने (onion news) नुकसान झाले आहे. शिवाय दक्षिण भारतातील कांद्याबद्दल ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. ग्राहकांची जुन्या उन्हाळ साठवलेल्या कांद्याला पसंती मिळू लागली आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारपेठेत साठवलेल्या उन्हाळ कांद्याची मागणी वाढल्याने त्याचे पडसाद भावावर उमटले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या घाऊक बाजारपेठेत किलोला सर्वसाधारणपणे दीड ते दोन रुपयांची वाढ झाली आहे.
किलोला भाववाढ
कांद्याचे आजचे क्विंटलचे सर्वसाधारण भाव रुपयांमध्ये असे : मुंबई- दीड हजार, नगर- एक हजार ४५०, येवला- एक हजार ६५०, नाशिक- एक हजार ३५०, लासलगाव- एक हजार ६५०, मनमाड- एक हजार ६००, सटाणा- एक हजार ६५०, पिंपळगाव बसवंत- एक हजार ७५१, देवळा- एक हजार ७००, उमराणे- दीड हजार, नामपूर- एक हजार ८५०.
आतापर्यंत २८० कोटींच्या कांद्याचा जिल्ह्यात वांधा
वरुणराजाने यंदाच्या पावसाळ्यात वेळापत्रक बिघडलेले असताना शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने यंदाच्या खरिपामध्ये कांद्याची २९ हजार हेक्टरवर लागवड केली. पण, अतिवृष्टीने आठ हजार हेक्टरवरील कांद्याला फटका बसला. त्याचवेळी पोळ्यापासून पोळ कांद्याच्या लागवडीला सुरवात झालेली असताना एक हजार हेक्टरवरील रोपांचे नुकसान झाले. अशा एकूण आतापर्यंत २८० कोटींच्या कांद्याचा जिल्ह्यात वांधा झालाय.
पावसाचा दणका
कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील खरीप कांद्याचे सर्वसाधारण क्षेत्र २० हजार हेक्टर इतके आहे. गेल्या वर्षी २३ हजार हेक्टरवर खरीप कांद्याची लागवड झाली होती. यंदा २९ हजार ३३८ हेक्टरवर खरिपाची लागवड झाली असली, तरीही हेक्टरी २० टन उत्पादन देणाऱ्या कांद्याचे पावसाने ८० हजार टन कांद्याचे नुकसान केले आहे. खरिपाच्या लागवडीसाठी पाच हजार ६३१ हेक्टरवर रोपे तयार करण्यात आली होती. याखेरीज पोळ तथा रांगड्या कांद्याच्या लागवडीसाठी तीन हजार ६१४ हेक्टरवर नव्याने रोपे तयार करण्यात आली आहेत. मात्र, पावसाने दहा हजार हेक्टरवर उपलब्ध होणाऱ्या रोपांचे नुकसान झाले आहे. पोळ तथा रांगडा कांद्याच्या लागवडीखालील जिल्ह्यातील क्षेत्र ५७ हजार हेक्टरपर्यंत आहे. ही सारी परिस्थिती पाहिल्यावर एक बाब प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे शेतकऱ्यांनी पावसाची साथ नसतानाही गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला. पण, पावसाने दणका दिल्याने गेल्या वर्षी इतक्या क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन मिळण्याची शक्यता दिसते आहे.
यंदा कालावधी पंधरा दिवसांनी पुढे
खरीप कांद्याचे जिल्ह्यात उत्पादनाचे प्रमाण वर्षभरातील कांदा उत्पादनाच्या तुलनेत १८ टक्के असून, त्यासाठी मे-जूनमध्ये रोपे टाकली जातात. त्या रोपांची पुनर्लागवड जुलै-ऑगस्टमध्ये होत असते. पावसाने यंदा त्याचा कालावधी पंधरा दिवसांनी पुढे गेला आहे. या कांद्याची काढणी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत होत असते. लेट खरीप तथा रांगडा कांद्याचे उत्पादन २२ टक्के असून, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये त्यासाठी रोपे टाकली जातात. रोपांची पुनर्लागवड सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केली जाते आणि हा कांदा जानेवारी-मार्चमध्ये काढला जातो. रब्बी तथा उन्हाळी हंगामातील कांद्याचे उत्पादन ६० टक्के असून, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रोपे टाकली जातात. रोपांची पुनर्लागवड डिसेंबर-जानेवारीमध्ये करण्यात येते आणि एप्रिल-मेमध्ये उन्हाळ कांदा विक्रीसाठी बाजारात येतो.
पावसाने ओढ दिल्याने विहिरींना अद्याप पाणी उतरलेले नाही. त्यामुळे खरिपाच्या कांद्याला पाणी देणे कठीण झाले आहे. पोळ कांद्याची लागवड उपलब्ध पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी केली असली, तरीही हे क्षेत्र कमी झाले आहे. आता रांगड्या कांद्याच्या लागवडीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. त्याचवेळी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लवकर उन्हाळ कांद्याची लागवड करता यावी म्हणून काही शेतकऱ्यांनी रोपे टाकण्यास सुरवात केली आहे.
-यशवंत पाटील, कांदा उत्पादक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.