नाशिक / सटाणा : सटाणा ग्राहक संघाचे माजी सभापती आणि सम्राट म्युझिकल्सचे संचालक राजेंद्र सरदार यांच्या निर्घूण खून प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासात छडा लावण्यास सटाणा पोलिसांना मोठे यश आले आहे. दरम्यान, या खून प्रकरणी शहरात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
असा केला खून...महिलेनी दिला जबाब
संशयित आरोपी महिला हर्षदा सोनवणे हिने पोलिस चौकशीत दिलेल्या जबानीनुसार तिचे टॅक्सीचालक रवी सुरेश खलाले यांच्याशी सन २०१३ पासून अनैतिक संबंध होते. दरम्यान, (कै.) राजेंद्र सरदार यांचा गेल्या चार महिन्यांपूर्वी माझ्याशी संपर्क आला. आम्हा दोघांचे मोबाइलवर तासनतास संभाषण व व्हाट्सअप चॅटिंग सुरू झाले. याचकाळात (कै.) सरदार हे माझ्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करून मानसिक त्रास देत होते. ही गोष्ट मी रवीला सांगितली. त्यानुसार बुधवार (ता.१३ मे) रोजी रात्री राजेंद्र सरदार यांना संपविण्याचा कट आखला. त्यानुसार माझ्या भाच्याच्या मोबाइलवरुन मी त्याला रात्री साडे दहा वाजता नामपुर रोडवरील बागलाण अॅकेडमी जवळ गाडी घेऊन येण्यास सांगितले. इकडे रवीला सुद्धा याच ठिकाणी येण्यास सांगितले. तो त्याच्या मोटरसायकलने तेथे आला. दरम्यान मी राजुला आपण पुढे निर्जनस्थळी जाऊ असे सांगून त्यांच्या टाटा मांझा कारमध्ये बसून निघाली. कारच्या मागे रवी मोटारसायकलने येत होता. कोळीपाडा जवळ रस्त्याचे काम चालू असल्याने गाडी थांबली. याचवेळी रवी मागून आला. राजेंद्रने गाडी खाली उतरून मागून येत असलेल्या रवीला हा रास्ता बंद आहे का, असे विचारले असता, रवीने मला काहीच माहीत नसल्याचे सांगितले व आपल्या पाठीमागे लपवलेल्या कटणी या लोखंडी हत्याराने राजेंद्रच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने राजेंद्र सरदार रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्याला तसेच त्याच्या गाडीत बसवून रवीने टाटा मांझा कार तर हर्षदाने स्वत: रवीची मोटारसायकल चालवित दोधेश्वर घाटात आले. तेथे आम्ही राजेंद्रचा मृतदेह असलेली कार न्यूट्रल करून तिला घाटात ढकलून दिले आणि मोटारसायकलने परतीच्या मार्गाने आमच्या घरी पोहोचलो.
पोलीसांनी २४ तासात लावला छडा
याबाबत माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड म्हणाले, काल गुरुवार (ता.१४) रोजी सकाळी सात वाजता शहरापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री दोधेश्वर (ता.बागलाण) येथील घाट रस्त्यावर राजेंद्र सरदार यांचा त्यांच्याच गाडीत निर्घुण खून झाल्याचे त्यांच्या डोक्यावरील गंभीर जखमांना पाहून निश्चित झाले होते. त्या दिशेने तपसाची तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सरदार यांना रात्री अकरा वाजता आलेल्या शेवटच्या मोबाइल कॉल वरुन आरोपी महिलेचा इयत्ता दहावीत शिकत असलेल्या भाच्याचा नंबर मिळाला. त्याला विश्वासात घेतले असता, रात्री साडेदहा वाजता त्याची मामी संशयित आरोपी हर्षदा अरुण सोनवणे (वय २६) हिने त्याच्याकडून घेतला आणि घराबाहेर निघून गेली. तर थेट रात्री दीड वाजता घरी परतली. यावरून पोलिसांनी चौकशीसाठी हर्षदा सोनवणे हिला ताब्यात घेतले.
चौकशीत हर्षदाने आपला प्रियकर टॅक्सीचालक रवी सुरेश खलाले (वय ३६, रा.मंगलनगर, सटाणा) याच्यासोबत राजेंद्र सरदार यांचा खून केल्याचे कबुल केले. पोलिस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटील, पोलिस निरीक्षक राहुल गवई, पोलिस नाईक जिभाऊ पवार, नवनाथ पवार, योगेश गुंजाळ, सागर चौधरी, विजय वाघ, अनुप्रीती पाटील, जागृती वळवी आदींनी या प्रकरणाचा तपास लावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.