Makar Sankranti 2024 : कर, भोगी आणि मकरसंक्रांत हे तीन दिवस जणू येवला शहरात अघोषित संचारबंदीच असते. ‘गल्ल्या ओस अन् गच्या फुल’, हे अनोखे दृश्यासाठी निमित्त ठरते ते पतंगोत्सवाचे.
यंदाही हटके ठरणाऱ्या उत्सवासाठी येवलेकर सज्ज झाले आहेत. (Ram Mandir Modi Thackeray spotted on kite makar sankranti 2024 nashik news)
येथील काही कारागीरांनी जगभर चर्चा असलेल्या अयोध्याचे राममंदिरासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रतिमाही पतंगावर उमटविल्याने त्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
तब्बल २५० वर्षांची परंपरा असलेल्या पतंगोत्सवाला येथील नवी पिढीही अधिक हर्षोल्हासाने साद घालत पुढे नेत आहे. संगणकीकरणाच्या युगात आबालवृद्धांचा सहभाग व उत्साह अधिकच वाढत आहे. यंदाही उत्सवासाठी पतंग, आसारी खरेदीची अन् मांजा खरेदी झाली आहे. आता फक्त ‘ढील दे रे ढील’, ‘वक्काट-वक्काट’चा सूर निनादण्याची प्रतीक्षा आहे.
पतंगोत्सवाची झलक रविवार ते मंगळवारदरम्यान येथे पाहायला मिळणार आहे. बेधुंद होऊन सप्तरंगी पतंगाला भरारी देताना आकाशाला कवेत घेण्याचे दृश्य अवघ्या काही तासांनी दिसेल. मुस्लिमबांधवही या उत्सवात सहभागी होत आहेत. आजी-आजोबा, आई-वडील, मुलगा-सून अन् नातूही, अशा चार पिढ्यांच्या सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग नजरेत भरणारा असतो.
पतंगाची अवकाशात गवसणी घालतानाच काटाकाटीचा खेळही रंगतो. दोर कापल्यानंतर ‘वक्काट’, ‘कटी रे’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून जातो. जोडीला ‘डीजे’ची साद अन् तरुणाईचा जल्लोष असतोच.
पतंग, आसारी अन् मांजा होममेड
पतंग व आसारी येथे बनविलेली असते. पतंग उडविण्यासाठी मांजाही होममेड असतो. शहरात पतंग बनविणारे जवळपास १५, विक्री करणारे पन्नासवर, आसारी बनविणारे १५ वर कारागीर आहेत. प्रत्येक शौकीन २००-३०० पतंग एकावेळी खरेदी करतात. मोठे कुटुंबीय पाचशेपर्यंत पतंग खरेदी करतात. यातून होणाऱ्या उलाढालीमुळे हा उत्सव जगण्याचा भाग बनला आहे.
नेत्यांच्या चित्रांचे लक्षवेधी पतंग
बाजारात अनेक आकारात, रंगात व चित्र असलेले पतंग उपलब्ध आहेत. मात्र येथील महिला पतंग कारागीर शिल्पा भावसार व राहुल भावसार यांनी पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे, मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबरच श्रीराम, युवा नेते कुणाल दराडे, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके आदींचे छायाचित्रे असणारे पतंग बनविले आहेत.
''आम्ही पाच ते सहा महिन्यांपासून मकरसंक्रांतीनिमित्त पतंग बनविण्यास सुरवात करतो. यंदा पतंगाची मागणी वाढली आहे. तयार झालेले पतंग संपत आले असून, प्रत्येक घरात दहा ते १५ डझन पतंग खरेदी झाली आहे . गेल्या १५ वर्षांपासून पतंग व्यवसाय करतो. प्रत्येक वर्षी लोकप्रिय घटना, विशेष बाबी पतंगावर दर्शवतो. यंदा अयोध्याचे श्रीराम मंदिर, देशासह राज्याचे विविध नेतेमंडळीच्या चित्रांच्या पतंग तयार केल्या आहेत.''-राहुल भावसार, पतंग कारागीर, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.