नाशिक : गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दुप्पट गतीने वाढत आहे. ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण महिन्याभरात ४०० हून थेट १५ हजार ९०० पर्यंत वाढले आहे. तसेच, कोरोना संसर्गाचा दरही चारवरून थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. टेस्टिंगचे प्रमाण कमी असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव गंभीर आहे. कोरोनाचा संसर्ग दुप्पट वाढत असताना नियंत्रणासाठी दुप्पट गतीने काम करा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात साप्ताहिक कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे या वेळी उपस्थित होते. कोरोना आढावा बैठक ऑनलाइन स्वरूपात झाली. त्यात, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संथ लसीकरण यावर जोरदार चर्चा झाली.
‘कामाचा वेग दुप्पट करा’
श्री. भुजबळ म्हणाले, की मागील आठवड्यात उच्चांकी संख्या होती. त्याच्या दुप्पट संख्या पुढील आठवड्यात होते आहे. सलग चार आठवड्यांपासून हे चित्र आहे. सुदैवाची बाब एवढीच, की यात फक्त ८०५ रुग्ण रुग्णालयात आहे. त्यात १२० जण ॲक्सिजनवर, तर २० जण व्हेंटिलेटरवर आहेत. टेस्टिंगचे प्रमाण कमी असताना हे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्याची सूचनाही त्यांनी केली. कोरोनाचा संसर्ग दुप्पट गतीने वाढत असल्याने कोरोना नियंत्रणाचे कामही दुप्पट गतीने करावे, असेही ते म्हणाले.
‘शाळा सुरू, पण काळजी घ्या’
जिल्ह्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्या, तरी शाळांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी. रुग्णसंख्या वाढत असतील अशा ठिकाणी तालुक्यातील अधिकाऱ्यांना शाळा आपत्कालीन स्थितीत बंद ठेवण्याचे अधिकार आहेत, असे स्पष्ट करीत भुजबळ म्हणाले, की पालकांनी आजारी मुलं शाळेत पाठवू नयेत. शिक्षण संस्थांनी शाळेत तापमान तपासणी, सुरक्षित अंतर ठेवण्याचे निकष पाळावेत.
दुसऱ्या डोसकडे पाठ
जिल्ह्यात पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याकडे अनेकांनी पाठ फिरविली असल्याचे पुढे आले. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवावा. लक्षण नसलेल्या रुग्णांची तपासणी करू नये असे निर्देश आहेत. मात्र, जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढीचा वेग ज्या गतीने वाढतो आहे, ते लक्षात घेता नाशिक महापालिकेने टेस्टिंग वाढवाव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. ‘नो व्हॅक्सिन- नो एन्ट्री’ या नियमाची कडक अंमलबजावणी करावी. प्रसंगी निष्काळजीपणा करणाऱ्या आस्थापना बंद करण्याचे अधिकार आपत्ती व्यवस्थापन विभागाने वापरावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.