लखमापूर (जि. नाशिक) : चंडीकापूर येथील एका मुलाच्या जन्म दाखल्यात जन्माऐवजी मृत्यूची नोंद असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकाराने पालकांनी संताप व्यक्त करत संबंधित ग्रामसेविकेवर कारवाईची मागणी केली आहे. (Record of death in birth registration in Chandikapur Demand for action against Gram Sevika Nashik News)
वणी येथील रहिवासी रियाज अमीनखान मुल्ला यांचा मुलगा अली रियाज खान याचा जन्म चंडीकापूर येथे झाला असून ग्रामपंचायत कार्यालयात त्याच्या जन्माची नोंद केली होती. तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाचा जन्म दाखला घेण्यासाठी चंडीकापूर ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज दिला असता त्यांना सहा-सात दिवस ग्रामसेविका यांनी दाखल्यासाठी फिरवले.
त्यानंतर तक्रारदार यांना संबंधित ग्रामसेविकेने त्यांच्या सही व निबंधकांचा असलेल्या शिक्यासह जन्मदाखला घेतला. परंतु, मुलगा हयात असताना देखील जन्मदाखल्यात जन्माऐवजी मृत्यूची नोंद झाल्याचे निदर्शनास आल्याने पालकाने संताप व्यक्त करत गटविकास अधिकारी श्री. मेढे यांना निवेदन दिले.
मुलगा अली रियाज खान हा वणी येथील महाविद्यालयात सध्या शिक्षण घेत आहे. चंडीकापूर येथील ग्रामसेविकेने बनावट मृत्यूचा दाखला बनवला असून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा दिंडोरी न्यायालयात जाण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
"माझा मुलगा अली खान हयात असून तो सध्या वणी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मी त्याचा जन्म दाखला मागितला असून त्यांनी मला जन्म दाखला न देता मृत्यू दाखला दिला. याबाबत संबंधित ग्रामसेविकेवर गुन्हा दाखल करून निलंबित करावे."
- रियाज अमीनखान मुल्ला, तक्रारदार
"चंडीकापूर येथील ग्रामसेविका यांचे विरोधात माझ्याकडे रियाजखान मुल्ला यांची लेखी तक्रार आली आहे. संबंधित ग्रामसेविका यांना नियमाने नोटीस काढली असून नोटीसचा लेखी खुलासा आल्यानंतर कायदेशीर कारवाई होण्यासाठी वरिष्ठस्तरावर अहवाल पाठविण्यात येईल."
- विनोद मेढे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, दिंडोरी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.