Nashik News: महापालिकेत यापूर्वी मानधनावरील कर्मचारी कायम करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर डॉक्टरांनादेखील महापालिकेच्या सेवेत कायम करून घेता येईल, या नावाखाली महापालिका मुख्यालयाबाहेर डॉक्टर झालेल्या व महापालिकेच्या सेवेत काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक वसुली सुरू असल्याची चर्चा असून, या प्रकरणात काही नवोदित डॉक्टर बळी पडल्याचे ऐकिवात आहे.
दरम्यान, टीसीएसमार्फत शासनाने रिक्त पदांची भरती करण्याचे स्पष्ट आदेश दिले असल्याने मानधनावरील डॉक्टर कधीच कायमस्वरूपी होऊ शकत नाही, असा खुलासा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. (Recovery from doctors on emoluments under permanent name nashik news)
महापालिकेमार्फत पाच मोठ्या रुग्णालयांसह ३० शहरी आरोग्य केंद्र चालविले जातात. तसेच नव्याने १०५ दवाखाने सुरू केली जाणार आहेत. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून, आरोग्यसेवेवर मोठा ताण येत आहे. तर दुसरीकडे महापालिकेत अन्य पदांसह डॉक्टरांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागात विशेष तज्ज्ञांसह डॉक्टरांची सध्या १८९ पदे मंजूर आहेत.
त्यापैकी सध्या ६५ डॉक्टर कार्यरत असून, तब्बल १२४ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ६१ पदांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहे. त्यामुळे रुग्णालयावर अपुऱ्या मनुष्यबळाचा ताण निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी नव्याने ५४ डॉक्टरांसह ९६ पदे मानधनावर भरण्याचा निर्णय घेतला.
एमबीबीएस, बीएएमएस, डेंटिस्ट, शल्यचिकित्सक, स्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. गेल्या महिनाभरापासून भरतीप्रक्रिया सुरू आहे. अद्यापपर्यंत भरती झाली नसली तरी उमेदवारांची निश्चिती झाली आहे. भरती करताना अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमार्फतच भरतीप्रक्रिया राबविली जात आहे.
भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना भरतीप्रक्रियेत नवा ट्विस्ट आला आहे. महापालिकेत यापूर्वी बाराशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले आहे. त्याच आधारे डॉक्टरांनादेखील महापालिकेच्या सेवेत कायम करता येईल, यासाठी सहा महिन्यांसाठी मानधनावर नियुक्ती करण्यासाठी लाखो रुपये वसूल केले जात असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात वैद्यकीय विभागानेदेखील चर्चेला दुजोरा दिला असून, अशा प्रकारची भरती होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
"महापालिकेची गरज म्हणून मानधनावर भरती केली जात आहे. याचा अर्थ कायमस्वरूपी भरती होईल, असे नाही. शासनाने टीसीएसमार्फत भरती करण्याच्या सूचना दिल्या आहे. जोपर्यंत टीसीएसमार्फत भरती होत नाही तोपर्यंत मानधनावरील डॉक्टर काम करतील. उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये." - डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक महापालिका
...अशी आहेत पदे
पद रिक्त संख्या
शल्यचिकित्सक २
अस्थिरोगतज्ज्ञ ४
भूलतज्ज्ञ २
स्रीरोगतज्ज्ञ ५
रेडिओलॉजिस्ट २
बालरोगतज्ज्ञ ५
नाक-कान-घसातज्ज्ञ २
दंतशल्यचिकित्सक - ३
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) - १०
वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) - २०
स्टाफ नर्स - २०
एएनएम - २०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.