पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : राज्य शासनाच्या (State Government) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने (Department of Food, Civil Supplies and Consumer Protection) स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातून करण्यात येणाऱ्या गहू वाटपात कपात (Reduction) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब लाभार्थ्यांना आता गहू कमी मिळणार असून, त्याच्या परिणाम सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती कमी होऊ शकते. शासनाने लाभार्थ्यांना गहू वाटपाचे प्रमाण कमी केले असले तरी तांदळाचे (Rice) वाटप मात्र वाढविले आहे. (Reduction in the amount of wheat from Ration Shops Nashik News)
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत निफाड तालुक्यात कष्टकऱ्यांना अनुदानित दराने धान्याचे वाटप करण्यात येते. त्यामध्ये शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचा समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना अंत्योदय व प्राधान्य गटातील हजारो पात्र रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येते. संबंधित धान्य हे लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात मिळत असल्याने त्याचा लाभ हजारो लाभार्थ्यांना होतो. अनेक लाभार्थी कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह याच धान्यातून होतो. त्यामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात सवलतीच्या दरातील धान्य वाटपाला अतिशय महत्त्व आहे.
या धान्य वाटपाचे प्रमाण शासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार अंत्योदय कार्डधारकांना २० किलो गहू व १५ किलो तांदूळ, तर प्राधान्य गटातील प्रत्येक लाभार्थ्याला तीन किलो गहू व दोन किलो तांदळाचे वाटप करण्यात येते. परंतु त्यामध्ये आता शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने बदल केला आहे. त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या हिस्स्यातील गव्हाला कात्री लावण्यात आली असून, त्याबदल्यात लाभार्थ्यांना तितकाच तांदूळ मिळेल. त्याचा परिणाम सामान्यांच्या ताटातून चपाती कमी होईल.
अशी आहे तालुक्याची स्थिती
निफाड तालुक्यात एकूण १५४ रेशन दुकानांतून १० हजार ५१० अंत्योदय कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येते. त्यानुसार यापूर्वी कार्डधारकांना २० किलो गहू व १५ किलो तांदूळ वाटप करण्यात येत होते. परंतु यानंतर लाभार्थ्यांना १५ किलो गहू व २० किलो तांदळाचे वाटप करण्यात येईल.
निफाड तालुक्यात दोन लाख ८५ हजार एवढे प्राधान्य गटात लाभार्थी आहेत. त्यांना या आधी प्रतिलाभार्थी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ, या प्रमाणात धान्याचे वाटप करण्यात येत होते. परंतु आता त्यात दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ, असा बदल करण्यात आला आहे. धान्य वाटपाचा बदल हा जून २०२२ ते मार्च २०२३ पर्यंतच्या काळासाठी लागू राहील.
उत्पादन घटल्याने वाटपावर कात्री
देशात गव्हाचे उत्पादन घटल्याने भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशात गव्हाचे संकट असल्याने ही बंदी घालण्यात आल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. सरकारी योजनांसाठीही गहू कमी करण्यात आला असून, लाभार्थ्यांना तांदळाचे वाटप अधिक करण्यात येत आहे. खुल्या बाजारातसुद्धा याचा परिणाम दिसून येत आहे.
"जून महिन्यापासून लाभार्थ्यांना रेशन दुकानांतून गव्हाचे वाटपात कपात होईल. तर तांदूळ वाढवून देण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत."
- उल्हास टर्ले, पुरवठा अधिकारी, निफाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.